# बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बुधवारी भूमिपूजन.

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवार, दि.३१ मार्च २०२१ रोजी सायं. ५.३० वाजता महापौर निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई येथे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्य शासनाने २०१७ मध्ये तत्कालिन मुख्य सचिव  स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या स्थाननिवड समितीने मुंबईतील अनेक जागांची पहाणी करून शिवाजी पार्क नजिकच्या महापौर निवास या स्थानाची निवड केली. देवेन्द्र फडणवीस यांच्या शासनाने उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त समितीची नियुक्ती केली.

स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. २०१९ मध्ये उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागून रस्त्यालगतचा भूखंड महापालिकेकडे व पर्यायाने स्मारकासाठी उपलब्ध झाल्यामुळे मूळ आराखड्यात बदल करावे लागले. शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती करुन रु.४०० कोटी निधीही मंजूर केला.

प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन न्यूनतम बोली लावणाऱ्या मे.टाटा प्रोजेक्टस लि. या कंत्राटदारांकडे प्रकल्प उभारणीची जबाबदारी दिली. प्रकल्पात प्रवेश इमारत, स्मारक वस्तुसंग्रहालय इमारत व प्रशासकीय इमारत अशा तीन बैठ्या व सुबक वास्तुंचा समावेश असून या संपूर्ण भुखंडावरील विद्यमान वृक्षांचे जतन करण्याचे ठरविण्यात आले आहे. भू वापर व पर्यावरणासंबंधीचे सर्व परवाने घेण्यात आले असून वास्तुउभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवतीर्थ मैदान एका बाजुस तर दुसऱ्या बाजुस अथांग अरबी समुद्र अशा जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी होणाऱ्या या स्मारकाची जगभरातील बाळासाहेबांचे चाहते करीत असलेली प्रतिक्षा लवकरच पूर्ण होईल. मात्र, सध्याच्या कोरोना संसंर्गवाढीला रोखण्यासाठी असलेली गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ पार पडेल. इतर सर्वांसाठी ऑनलाईन प्रेक्षपणाची सोय करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *