नांदेड: ज्येष्ठ वन्यजीव तज्ज्ञ मारुती चितमपल्ली आणि पद्मविभूषण स्व.डॉ सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त गुरूवार, 5 नोव्हेंबर रोजी नांदेडच्या गोदावरी तीरावर पक्षी सप्ताहाचा शुभारंभ पक्षी निरीक्षणाने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपवन संरक्षक राजेश्वर सातेलीकर, परिविक्षाधीन वन अधिकारी मधूमिता आणि सहायक वनसंरक्षक डी.एस. पवार यांच्यासह निसर्ग, पक्षी प्रेमी नागरीक, छायाचित्रकार उपस्थित होते.
राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकांचे महत्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील आहे. राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल, फुलपाखरू, कांदळवन वृक्ष, अशी मानचिन्हे शासनाने घोषित केली आहेत. पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. जगभरातील पक्षांची जैवविविधता झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत असून अनेक पक्षी प्रजाती दुर्मिळ श्रेणीत समाविष्ट होत आहेत. राज्यातील पक्षांचे महत्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या संरक्षणाप्रती जबाबदारी स्पष्ट व्हावी ह्यासाठी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात पक्षी संवर्धन आणि संशोधनाच्या क्षेत्रात व्यापक काम झालेले आहे. भारतीय पक्षीविश्व व पक्षी अभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहोचविणारे पद्मविभूषण स्व.डॉ. सलीम अली आणि पक्षी अभ्यासक व लेखक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा काळ पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आज नांदेड येथील गोदावरी नदीच्या काठावर, पक्षीमित्र, वन्यजीव छायाचित्रकार विजय होकर्णे नांदेड यांच्या पुढाकारातून आणि निसर्ग मित्र मंडळ आणि पक्षी मित्रांच्या सहकार्यातून या पक्षी सप्ताहाचा शुभारंभ झाला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी पक्षी सप्ताहाचे महत्त्व विशद केले. पक्षी सप्ताहाच्या आयोजनाची भूमिका मांडतांना पक्षीप्रेमी वन्यजीव छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी शासकीय यंत्रणा व पक्षीमित्र, संशोधकांच्या माध्यमातून बर्ड्स ऑफ नांदेड ची निवड करण्याचा मनोदय व्यक्त केला. यासाठी नांदेड जिल्ह्यात अधिवास असलेल्या पक्षांचे निरीक्षण, अभ्यास करून याबाबत अभ्यासू तज्ज्ञ पक्षीमित्र नागरिकांची मते जाणून घेऊन नांदेडचा पक्षी जाहीर करण्यात यावा, अशी सूचना मांडली आणि नांदेड व विदर्भाच्या सीमेवर पैनगंगा नदीतीरावर असलेल्या पक्षी अभयारण्याचे जतन करून संरक्षण करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वन विभागाच्या वतीने या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर यांनी दिली. या निमित्ताने मारुती चितमपल्ली व डॉ. सलीम अली यांच्या कार्याचा गौरव करून उपवन संरक्षक राजेश्वर सातेलीकर म्हणाले की, नांदेड परिसरातील पक्षाची आवासस्थाने शोधून संरक्षण करण्याची जबाबदारी पक्षीमित्रांनी घ्यावी, परिविक्षाधीन अधिकारी मधूमिता यांनी लइस्लापूर चे हरणखरब सुंदर विकसित केल्याबद्दल ची माहिती दिली. या प्रसंगी सहायक वनसंरक्षक डी. एस. पवार, परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती मधूमिता यांचीही भाषणे झाली. त्यानंतर गोदेकाठी पक्षीनिरीक्षण करण्यात आले.
या सप्ताहात सर्व पक्षी अभ्यासकांच्या सहकार्याने पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल’, असे सांगून संयोजक विजय होकर्णे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आज जन्मदिवस असलेल्या पक्षीअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आलेख व त्यांच्या नांदेडमधील काही आठवणी सांगून उपस्थितांचे आभार मानले, या कार्यक्रमास सुरेश जोंधळे, हर्षद शहा, दिलीप ठाकूर, रवी डोईफोडे, डॉ.जगदीश देशमुख, पंकज शिरभाते, शिरीष गीते, प्रा शिवाजी जाधव, रवी डोईफोडे, सौ.सुषमा ठाकूर, सदा वडजे, सारंग नेरलकर, डॉ.अनिल साखरे, डॉ.शैलेश कुलकर्णी, बालाजी वडजकर, संदीप सरसर, अविनाश हंबर्डे, दत्तदर्य फटाले यांच्यासह नांदेड व परिसरातील पक्षीतज्ज्ञ, अभ्यासक, हौशी निसर्ग व पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष्यांची छायाचित्रे प्रमुख पाहुण्यांना भेट:
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन पक्षीमित्र छायाचित्रकार विजय होकर्णे यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमास भारत व महेश व सौ.अरुणा होकर्णे तसेच उमाकांत जोशी, लक्ष्मण संगेवार, निसर्गप्रेमी डॉ.प्रमोद देशपांडे, आनंदीदास देशमुख, महेश शुक्ला यांनी केले. यावेळी महेश होकर्णे यांनी काढलेली महाराष्ट्राचे मानचिन्ह असेलेला शेकरू पक्षी, हरोळी (ग्रीन पीजन) दुर्मिळ होत चाललेल्या माळढोक पक्षी व तांबट पक्ष्यांची छायाचित्रे प्रमुख पाहुण्यांना भेट देण्यात आली.