-डॉ.प्रविण धनवडे यांनी वाचविले पक्षाचे प्राण
पुणे: फलटण शहरातून पुण्याकडे कारने येत असताना लोणंद गावाजवळ रस्त्याच्या मधोमध जखमी ब्लॅक विंग काईट पडलेला होता. डॉ. प्रविण धनवडे यांनी भरधाव वेगात असलेल्या कारचे ब्रेक दाबले आणि जखमी पक्षाला जवळ घेतले. हा पक्षी आकाराने मोठा असून 260 ग्रॅम वजनाचा आहे. उंची सव्वाफूट आहे. धारदार चोच, लालभडक डोळे, पायाची नखे मोठी व धारदार, आतल्या अंगाचा रंग पांढराशुभ्र तर पंख राखाडी रंगाचे, असा हा सुंदर पक्षी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पक्षीप्रेमी प्रविण धनवडे व त्यांचा मुलगा निशांत व मुलगी साक्षी व पत्नी अश्विनी यांनी पक्षाची सुश्रुषा केली. पक्षाच्या पंखाच्या आतील बाजूस जखम झालेली होती. त्यामुळे त्या जखमेवर मलमपट्टी केली. ड्रापरने पाणी पाजले तर खायला मासा दिला. त्यामुळे पक्षाला तरतरी आली.
घरात तो सर्वाच्या अंगाखांद्यावर खेळू लागला. काही दिवस त्याला घरी ठेवून पूर्ण बरा होताच त्याला कात्रजच्या उद्यान निरीक्षकांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ.धनवडे यांनी दिली. पक्षी सप्ताहातच एका दुर्मिळ पक्षाचे प्राण वाचविता आले. याचा मनस्वी आनंद झाल्याचे धनवडे कुटुंबियांनी सांगितले.
ऐन दिवाळीत आला पाहुणा: हा पक्षी नेमका कोणता याची माहिती डॉ.धनवडे यांना नव्हती, वरकरणी हे घुबड आहे की घारीचा प्रकार हे कळत नव्हते. गुगल लेन्सवर या पक्षाचा हुबेहूब सापडला व सविस्तर माहिती सापडली. हा पक्षी दिसायला जरी अत्यंत देखणा, पांढरा व राखाडी रंगाचा असला तरी त्याचे नाव ब्लॅक विंग काईट असे आहे. हा पक्षी मुख्यत: ऑस्ट्रेलियात सापडतो. हिवाळा सुरू होताच तो बहुधा विदेशातून स्थलांतर करून लोणंद आणि परिसरात आला असावा.