# जयंती विशेष: महानायक वसंतराव नाईक यांच्या विचारांची प्रासंगिकता -डॉ.अशोक श. पवार.

 

‘‘एक छोर यशवंत तो दूजा छोर वसंत’’ महाराष्ट्राच्या विकासाचा पाया यशवंतरावांनी रचला त्याला 16 योजनांचे कळस वसंतरावांनी चढविले. महाराष्ट्र शासनाने 2012-13 ला यशवंतराव चव्हाण यांची 100 कोटीची तरतूद करुन व 2013-14 वसंतराव नाईक़ यांचा एका वर्षाच्या फरकाने 100 कोटीचीच तरतूद करुन जन्मशताब्दी वर्ष साजरे केले. एका वर्षाच्या फरकाने जन्मशताब्दी वर्ष साजरा होणे हा एक निर्मिकाने घडवून आणलेला योगायोगच म्हणावा लागेल हे विशेष. नियतीने ‘जिवेत् शरद शतम्’ या प्रमाणे 100 वर्ष या महानायकांना जगविले असते तर ते आज हयात राहिले असते. त्यातून महाराष्ट्र व राष्ट्र आणखी प्रगतीच्या उंच शिखरावर राहीले असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील असे एकमेव विद्यापीठ आहे की ज्याने वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून वसंतराव नाईक अध्यासन केद्रांची निर्मिती केली. विद्यापीठ परिक्षेत्रातील चार जिल्ह्यातील विद्यार्थी संख्येचे सर्वेक्षण करुन तौलनिक अभ्यास सादर केला असता अभ्यासात असे लक्षात आले की, चार लाख तीस हजार विद्यार्थी संख्येपैकी 74 हजारापेक्षा(17.33 टक्के) संख्या विमूक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील आहे. या अभ्यासावरुन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने चारशे मुलांची चार वसतिगृहे काढण्याचे ठरले, त्या संबंधीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आले आहे. परंतु सदरील व्यवस्था ही हायस्कूलपर्यंतच आहे. तसेच समाजासाठी निवासी शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय शासकीय व विद्यापीठ स्तरावर अस्तित्वात आणण्याचा मानस आहे. यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या मैत्रीचे मर्मबंध इतके मजबूत होते की जातीपातीचा विचार न करता ‘यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रीय सत्तेला वसंतराव नाईकांच्याच हाती महाराष्ट्र सुरक्षित असे असा निर्वाळा दिला‘‘ खंबीरपणे शेवटपर्यंत एकमेकास साथ दिली. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच नव्हेतर राष्ट्राचे नेतृत्व करते असे म्हटले तरी वावगे होणार नाही. नाईक साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सहकार्यातून महाराष्ट्राला अनेक योजना दिल्या. ज्या आजतागायत राष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. म्हणून दोन्ही व्यक्तीमत्वे आधुनिक महाराष्ट्र तथा राष्ट्राचे शिल्पकार आहेत.

वसंतराव नाईक यांचा जन्म ‘यवतमाळ’ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील ‘गहुली’ या मागासलेल्या खेडेगावी झाला. त्यांनी खेड्यातील जीवन जवळून अनुभवलेले होते. खेड्यातील अडी-अडचणी व समस्यांची जाणीव त्यांना होती. त्यामुळे खेड्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘ग्रामसुधारणा’ कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमाअंतर्गत अनेक आदर्श योजना राबवून अत्यंत अल्पावधीत गहुली हे गाव आदर्श करुन दाखवले.’’ या गावाबरोबरच गहुलीच्या आसपासची 12 गावे सुधारणेच्या कार्यक्रमात निवडली. या गावातील पूर्वीची वेडीवाकडी वसाहत प्रमाणबद्ध बसवली. गावातले रस्ते रेखीव केले, तालुक्याशी ही गावे पक्क्या रस्त्याने जोडली. या गावात साक्षरतेची मोहीम राबवली. ज्या ठिकाणी शाळा नाहीत त्या ठिकाणी शाळा सुरु केल्या. बंजारा समाजातील स्त्रियांच्या पोशाखात बदल करण्याबद्दल ते नेहमी आग्रही होते. पूर्वीचा बंजारा समाज म्हणजे रानामाळात तांडा करुन राहणारा समाज. या समाजातील स्त्रिया परंपरेनुसार चालत आलेला लेहंगा पध्दतीचा पेहराव वापरत. यामध्ये फेटिया, काचळी, अंटी-चोटला जो की वजनदार असल्यामुळे त्यांना तो दररोज बदलणे शक्य नव्हते ते आरोग्याच्या दृष्टीने घातक होते. यामुळे वसंतराव नाईक यांनी आपल्या जातीतील या रुढीविरुध्द आवाज उठवला. या त्यांना महाराष्ट्रीय पध्दतीचा नववारी साडी-चोळी हा पोषाख वापरण्यास प्रवृत्त केले. या बदलाची सुरुवात वसंतरावांनी स्वत:च्या घरापासून केली. दारुबंदीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांनी आपल्या गावापासून केला. महिला परिषदेचे आयोजन करुन त्यांनी महिला विषयक धोरण स्पष्ट केले. ‘‘घरातील माणूस शिकतो तेव्हा घरात तो एकटाच शिकलेला असतो. पण घरातली स्त्री शिकलेली असले तेव्हा सारे घर शिकते.’’ हे वसंतराव नाईक यांनी हेरले होते. त्यामुळे वसंतराव यांनी त्यांच्या शिक्षणावर भर दिला होता. यासाठी समाजातील संपूर्ण महिलांना एकत्र बोलावून उपदेश देण्यास सुरुवात केली होती. वसंतराव नाईकांनी बंजारा समाजातील महिलांची गहुली (ता. पुस, जि. यवतमाळ) या ठिकाणी 1937 रोजी महिला परिषद बोलावली. या परिषदेत अनेक तांड्यातून बंजारा समाजाच्या महिला हजर राहिल्या या परिषदेस वसंतराव नाईक यांनी बंजारा भाषेत स्त्रियांना मार्गदर्शन केले. अस्पृश्यता निवारणाची सुरुवातही त्यांनी आपल्या गावापासून केली.

महाराष्ट्राला एकच कृषी विद्यापीठाची केंद्राकडे तरतूद असतांना चार विभागासाठी चार कृषी विद्यापीठे देवून प्रादेशिक असमतोल दूर करण्यासंदर्भात त्यांची भूमिका किती पारदर्शक होती हे स्पष्ट होते. इतकेच नव्हेतर चार औष्णीक विद्युत केंद्र, नवीन औरंगाबाद, सिडको-हडको योजना, महाबीज, एम.आय.डी.सी., हरित क्रांती, मराठी भाषेला दिलेला राज भाषेचा दर्जा, रोजगार हमी योजना, आश्रम शाळा इत्यादी योजनांचा जनक म्हणून त्यांच्याकडे आजही जग पाहते.

भूदान चळवळीमधील योगदान करुन त्यांनी समाज सुधाराची सुरुवात केली. आचार्य विनोबा भावे यांच्या मते, ‘‘ स्वेच्छेने भूमीचे दान करणे म्हणजे भूदान होय’’ विनोबा भावेंनी सुरु केलेली भूदानाची चळवळ वसंतराव नाईक यांच्या मनावर फार मोठा प्रभाव पाडून गेली. ‘‘ भूदान त्यांना शांततामय मार्गाने होणारी क्रांती वाटली.’’ त्यामुळे वसंतराव नाईकांनी विनोबा भावे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजातील भूमीहिन वर्गासाठी कार्य केले. या कार्याची सुरुवात स्वत:च्या हिश्यातील जमिनीतून सहावा हिस्सा जमीन भूदानासाठी देवून सुरुवात केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शेतजमीनीचे राष्ट्रीयकरण करण्यासंदर्भातील भूमिका वसंतराव नाईकांनी कृतीत उतरविली.’’ कसेल त्याची जमीन, कुळ कायदा, शेत जमीनीचे सपाटीकरण, जल संधारण, मृद संधारण इत्यादी योजना शेतकर्‍यांसाठी जीवनदायी ठरल्या. त्यांच्या योजनांची अंमलबजावणी झाली असती तर कदाचीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तेवढीच प्रसंगोचित्त आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.


-प्रा.डॉ. अशोक पवार
लेखक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.
मोबाईल: 09421758357
ईमेल: pawarashok40@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *