अंबाजोगाई: मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे बुधवार, २ जून रोजी अंबाजोगाईत आले होते. यावेळी पञकार परिषदेत त्यांनी वरील मत मांडले.
दरम्यान, डॉ.संजय लाखे पाटील यांनी मराठा समाज बांधव व विविध संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी आयोजित बैठकीतून संवाद साधला. लाखे पाटील हे आपल्या दौऱ्याची सुरूवात मराठवाड्यापासून करीत आहेत. ते या विषयांवर संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. यानिमित्ताने ते अंबाजोगाईत बुधवारी आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, महाराष्ट्र राज्य कापूस पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष महादेव आदमाने, बालाजी शेळके, शरद देशमुख आदींची उपस्थिती होती.
डॉ.संजय लाखे पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून विविध दाखले देत मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार व काँग्रेस पक्षाने केलेले प्रयत्न याची तपशीलवार व मुद्देसूद माहिती दिली. लाखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. भाजपाचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजपचे मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ही वस्तुस्थिती समाजाला माहित करून देण्यासाठी मी राज्यभरात दौरा करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील मोदी सरकारने १०२ वी बोगस घटनादुरूस्ती अत्यंत घाईत मंजूर केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना एसईबीसी प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार नसताना देखील १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर तब्बल १०६ दिवसांनी मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणाचा कायद्याचा शासन आदेश काढून मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. ही वस्तुस्थिती स्पष्ट असताना आता विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा मराठा समाजाची दिशाभूल करून कोविड असतानाही मोर्चे काढण्यास समाजाला प्रवृत्त करीत आहेत. छञपती शिवरायांच्या नावाने मते मिळवून केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आता छञपतींचा विसर पडला आहे. महाराष्ट्रासाठी आदरस्थानी असणारे खासदार छञपती संभाजी महाराज यांना मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी व हा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदी भेटत नाहीत, वेळ देत नाहीत. हा महाराष्ट्राचा घोर अवमान आहे. भाजपाच्या दिशाभूल व अपप्रचाराला मराठा तरूणांनी व समाजाने समजून घ्यावे असे डॉ.लाखे पाटील म्हणाले.
आमदार मेटे राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करीत आहेत
आमदार मेटे यांनी मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी असे लाखे पाटील यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले की,”ईडब्लूएस” आरक्षणाचा मराठा विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीमध्ये लाभ न मिळण्या मागचे खरे सूत्रधार हे आ.मेटेच असल्याचा आरोप करून लाखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने या बाबत जो शासन आदेश काढला तो सुस्पष्ट असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो काढावा लागला आहे. मेटे कसलीही याचिका न करता एकीकडे त्याचेही श्रेय लाटत असून दुसरीकडे शासन आदेश सुस्पष्ट नसल्याचे सांगत आहेत. ते राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करीत आहेत. या प्रश्नी ते सरकार आणि अशोकराव चव्हाण यांची विनाकारण बदनामी करीत आहेत. ती मराठा समाजाची दिशाभूल करणारी आहे असेही संजय लाखे पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांचे आदेशानुसार एसईबीसी आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करीत आहेत. या दौऱ्याची सुरूवात २ जूनपासून होत असून ५ जू पर्यंत ते मराठवाड्याचा दौरा करीत आहेत. पञकार परीषद आणि बैठकीतून ते मराठा समाज बांधव, काँग्रेसचे नेते, लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मराठा समाजातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून बैठकीतून संवाद साधत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी ते महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयामधील मराठा आरक्षण प्रकरणामध्ये निकाल मराठा समाजाच्या विरोधात जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा धांदांत खोटा प्रचार व दिशाभूल राज्यभरात भाजपा नेते करीत असून, विषेशतः मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका, पत्रकार परिषद आणि मराठा समाजातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन कोविडच्या संकटकाळात मराठा समाजाला रस्त्यावर येण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत हे दुर्दैवी आहे. लवकरच राज्यभरात असे मेळावे भाजपाच्या व्यवस्थापन आणि आर्थिक तंत्राच्या मदतीने घेतले जाणार आहेत.