चंदीगड: शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपा देशातील खरी तुकडे-तुकडे गँग असून शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे.भाजपाने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावले आहे. आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असे करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजपा जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भाजपावर निशाणा साधला.
अलीकडेच सुखबीर सिंग बादल यांनी आंदोलनात खलिस्तानी असल्याच्या अफवांवरून आक्रमकता दाखविली होती. या आंदोलनात अनेक वयस्कर महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या खलिस्तानी दिसतात का? देशातील शेतकऱ्यांना असे संबोधित करण्याची काही पद्धत आहे का? हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले होते. तसेच ते म्हणाले होते की, “त्यांची आमच्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिम्मत कशी झाली? शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याचा हक्क भाजपाला किंवा इतर कोणाला कुणी दिला? शेतकऱ्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले आहे आणि आपण त्यांना देशद्रोही म्हणत आहात? जे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत, ते स्वत: गद्दार आहेत.