# पायपीटीला कृतिशील विचारांची जोड म्हणजे पन्नालाल -डॉ. बाबा आढाव.

आयुष्यात व्यक्तिगत जीवनापेक्षा सार्वजनिक जगण्याला प्राधान्य दिलं गेलं, की व्यक्तिगत असं फारसं काही उरत नाही. अशा जगण्याची कहाणी सांगणारी पन्नालाल सुराणा यांची आत्मकथा ‘पायपीट समाजवादासाठी’ या पुस्तकाद्वारे लवकरच वाचकांच्या हाती ठेवत आहोत. ९ जुलै, पन्नालाल सुराणा यांचा वाढदिवस. वयाची ८७ वर्षे पूर्ण करून त्यांनी ८८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त मनोविकास प्रकाशनाच्या या आगामी पुस्तकासाठी समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी प्रस्तावनेचा हा संपादित भाग खास आपल्यासाठी…

‘पायपीट समाजवादासाठी’ हे पन्नालाल सुराणा यांनी लिहिलेलं आत्मचरित्र. खरं म्हणजे पन्नालाल यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणं ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. याचं कारण पन्नालाल आणि मी खूप जुने आणि जवळचे मित्र आहोत. गेली 50-60 वर्षे आम्ही एकमेकांचे सोबती आहोत. चळवळीतले अनेक प्रसंग आम्ही एकत्र अनुभवले आहेत. कित्येक सामाजिक लढ्यात आम्ही एकमेकांना साथ केली आहे. प्रत्येक ठिकाणी उल्लेख येईलच असे नाही, पण या पुस्तकात शब्दबद्ध केलेल्या बहुतांश प्रसंगात आम्ही एकत्र होतो. राष्ट्र सेवा दल या संघटनेसह इतरही अनेक कारणांमुळे आमचे मैत्रीचे संबंध आज वयाची नव्वदी पार केल्यावरही टिकून आहेत. त्यामुळे पन्नालाल यांचं आत्मचरित्र येणं आणि तेही समाजवादासाठी केलेल्या पायपीटीच्या अंगानं येणं हा खरोखरच आनंदाचा भाग आहे.

या आनंदातच मी हे पुस्तक वाचून काढलं. पन्नालाल यांच्या या पायपीटीबद्दल सांगायचं झालं तर, गमतीनं असंही म्हणता येईल की, त्यांच्या आजवरच्या आयुष्यातल्या बहुतांश रात्री ह्या कोणत्यातरी सार्वजनिक वाहानातून प्रवास करताना गेल्या असतील. त्यांनी पायी केलेला प्रवास असो, त्यांनी एसटीने केलेला प्रवास असो अथवा रेल्वेने केलेला प्रवास असो हा साराच प्रवास अफाट आहे. पायाला भिंगरी लावून हा माणूस सतत फिरत असतो. आजही नव्वदीच्या घरात शिरतानाही त्यांची ही पायपीट थांबलेली नाही. हस्तीरोगासारख्या विकाराने पाय बंब झालेले असतानाही ते फिरणं थांबवत नाहीत. प्रवासाने कधी थकतही नाहीत. जणू प्रवासातून ते नवी ऊर्जा मिळवतात की काय अशा जोमाने नवनवी कामं हाती घेताना दिसतात.

ज्या समाजवादी चळवळीचा उल्लेख ते या पुस्तकात करतात त्या चळवळीत पन्नालाल यांच्यासह बापू काळदाते, भाई वैद्य आणि मी असे चौघेही अगदी तरुण असल्यापासून अखंड बुडालेलो आहोत. नानासाहेब गोरे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं वर्णन ‘हरळीची मुलं’ असं करायचे. म्हणजे काय तर, कोणत्याही परिस्थितीत कोणीही यांना नष्ट करू शकणार नाही. कारण ती मूळ धरून, जमिनीत घट्ट रोवून उभी आहेत. पन्नालाल यांनी आजवर केलेली अन् अद्याप सुरू असलेली पायपीट ही मूळाला- समाजवादी विचारला धरून केलेली आहे. म्हणूनच ती महत्त्वाची आहे.

विचारांसाठी पायपीट करणारा हा कार्यकर्ता हाडाचा लेखकही आहे. हे पन्नालाल यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्यांच्या पायपीटीला लेखनीची मजबूत जोड आहे. एखादं पुस्तक, पेन, एक छोटी डायरी किंवा पोस्ट कार्ड आणि व्हिक्सचं इनहेलर जवळ असलं की त्यांचा प्रवास अत्यंत सुकर होतो. पण यातली एखादीही गोष्ट जवळ नसेल तर त्यांचं डोकं दुखायला लागतं. यासंदर्भातली एक आठवण मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. राजस्थानमधील कोटा येथून संयुक्त सोशलिस्ट पार्टीचं एक अधिवेशन संपवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. स्टेशनवर गाडीची वाट बघत बसलेलो असताना पन्नालाल मला म्हणाले,

‘माझं डोकं फार जड झालंय. काही सुधरत नाही.’

‘एखादी गोळी वगैरे घेऊयात का?’ मी म्हणालो. त्यावर ते म्हणाले, ‘पोस्ट कार्ड आहे का?’ मी आश्‍चर्याने त्यांच्याकडे बघत राहिलो. मग माझी बॅग तपासून पाहिली. एक कार्ड सापडलं. ते त्यांच्या हाती दिलं. त्यांनी लागलीच त्यावर काहीतरी मजकूर लिहिला. स्टेशनवरच्याच पोस्टाच्या पेटीत ते टाकले आणि म्हणाले, ‘आता बरं वाटतंय. डोकं मोकळं झालं.’

सांगायचा मुद्दा इतकाच की, पन्नालाल यांच्या पायपीटीला विचारांची, लेखनाची एक बैठक आहे. त्याच बैठकीची, कृतिशील विचारांची झलक मला या पुस्तकात पाहायला मिळाली. म्हणून माझ्या दृष्टीने ‘पायपीट समाजवादासाठी’ हे पन्नालाल यांचं आत्मकथन एक महत्वाचा दस्तऐवज आहे. अर्थात समाजवादी चळवळीला पुढे नेताना, काही मूल्य समाजामध्ये जाणीवपूर्वक रुजवताना आम्ही कार्यकर्त्यांनी जे लढे दिले, जे काही जगलो त्याचा विचार करता पन्नालाल यांनी शब्दबद्ध केलेली पायपीट त्रोटक वाटते. याचं कारण समाजवादी चळवळ लोकमानसात रुजावी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा ही मूल्य रुजावीत म्हणून आम्हाला सनातन मूल्यांशी खूप मोठा झगडा सातत्याने करावा लागला. त्या लढाईची पुरेशी नोंद यात पन्नालाल यांनी घेतलेली नाही असं मला वाटतं.

उदाहरणच सांगायचं झालं तर पंढरपुरात विश्‍वशांती यज्ञाच्या विरोधात केलेल्या धरणे आंदोलनाचं देता येईल. तनपुरे महाराजांनी त्यांच्या मठात या यज्ञाचं आयोजन केलं होतं. वास्तविक पाहता वारकरी सांप्रदायाने यज्ञसंस्था नाकारलेली असताना अशा स्वरुपाचा यज्ञ पंढरपुरात आयोजित करणं ही वैचारिक दिवाळखोरी होती. यज्ञाच्या माध्यमातून पुन्हा जनमानसात सनातन मूल्य रुजनं हे चळवळीच्या दृष्टीनं धोक्याचं होतं. म्हणून पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला बट्टा लावणार्‍या या घटनेच्या विरोधात पन्नालाल यांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं. त्यानुसार तनपुरे महाराज मठासमोर आम्ही धरणे आंदोलन केलं. त्यावेळी माझ्यासह अनेकांची भाषणे झाली. पण जेव्हा पन्नालाल उभे राहिले तेव्हा दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि पटवर्धन थिअटरमध्ये नेलं. चिडलेल्या सनातनी लोकांनी ते थिअटर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आम्ही वाचलो. त्यांनी आम्हाला थिअटरच्या मागच्या दारातून बाहेर काढत थेट सांगोल्याला नेलं. यासह अशा काही महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख या पुस्तकात आलेला नाही. त्यामुळे तो मी या ठिकाणी मुद्दाम करतो आहे.

आर्थिक बरोबरच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समता प्रस्थापित करणं हे समाजवादी चळवळीचा मुख्य उद्देश. त्याच उद्देशाने पन्नालाल वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत राहिले आहेत. रायगडच्या माणगाव तालुक्यातील वडघर या गावात साने गुरुजींच्या नावाने एक संस्था सुरू केली आहे. मुंबईपासून अत्यंत जवळ असलेली आणि सुमारे 36 एकर जागेवर वसलेली ही संस्था पाहून कोणालाही हेवा वाटेल अशी आहे. संस्थेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावावीत अशी सूचना उद्घाटन समारंभात शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार झाडं लावून ती वाढवण्याचं काम तर तिथे सुरू आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संविधानातील मूल्य रुजवण्याचं काम ही संस्था अत्यंत जोमाने करत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, समाजवाद, लोकशाही या मूल्यांचा विसर पडलेला आहे की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ही सारी मूल्य लोकमानसात रुजावीत म्हणून संस्था प्रयत्न करते आहे. विशेषत्वाने सांगण्याची बाब म्हणजे संस्थेच्या या कामात पन्नालालांचा वाटा खूप मोलाचा राहिलेला आहे.

जे काम हाती घेईल त्या कामात सर्वस्व झोकून देणं हे पन्नालाल यांच्या कामाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. भ्रष्टाचार निर्मूलन हा समाजवादी चळवळीच्या कामाचाही महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांनी जेव्हा भ्रष्टाचार निर्मूलनाचं काम चळवळ म्हणून हाती घेतलं तेव्हा आम्ही सारी मंडळी त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झालो. त्यासंदर्भातल्या चर्चांमधून त्यावेळी एक मुद्दा प्रकर्षानं पुढे आला. तो म्हणजे कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा. भ्रष्टाचार निर्मूलनाचं काम नीटपणे व्हायचं असेल, तर या चळवळीत कार्यकर्ता म्हणून कोणालाही मुक्त प्रवेश असू नये आणि जे सहभागी होतील त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे असं या चर्चेतून ठरवण्यात आलं. तेव्हा या कार्यकर्ता प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पन्नालाल यांनी घेतली आणि ती अत्यंत जबाबदारीने पारही पाडली. खऱं म्हणजे हा त्यांच्या आत्मचरित्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी हा उल्लेख इथं करतो आहे.

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे जॉर्ज फर्नांडिस अध्यक्ष होते तेव्हा पन्नालाल या संघटनेचे कार्याध्यक्ष होते. हे आजच्या बहुतेक कार्यकर्त्यांना माहिती नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे मुखपत्र म्हणून ज्या वृत्तपत्राने एक वेगळा दबदबा निर्माण केला होता त्या ‘दैनिक मराठवाडा’चे संपादकपदही त्यांनी भूषवलेलं आहे. या कुठल्याच कामची नोंद त्यांनी घेतली नाही. पण माझ्या दृष्टीने ही सारी कामं, जबाबदार्‍या या पायपीटीत महत्त्वाच्या आहेत.

परांडा तालुक्यातील आसू या गावी त्यांनी जे शेतीचे प्रयोग चालवले आहेत, त्याचीही नोंद सविस्तरपणे यायला हवी होती. कारण कोणाही व्यक्तीसाठी चांगला थाटलेला संसार मोडून, गुंडाळून जिथं नव्यानं सारं उभं करायचं आहे अशा ठिकाणी जाणं सोपं नसतं. पण पन्नालालांनी ते धाडस केलं. बार्शी हे त्यांचं मूळ गाव. तिथं त्याचं घर होतं. वीणाचा दवाखाना चांगला चालत होता. सावित्रीबाई फुले पतपेढीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आधार देण्याचं काम उभं केलं होतं. हमालांचं संघटन केलेलं होतं, कामगारांचं संघटन केलेलं होतं. असं सारं त्यांनी एका क्षणी गुंडाळलं आणि आसूसारख्या खेड्यात शेतावर ते राहायला गेले. तिथं जमीन घेण्यापासून त्याद्वारे शेतीचे वेगवेगळे प्रयोग यशस्वी करण्यापर्यंत अनेक पातळ्यांवर त्यांना कष्ट घ्यावे लागले आहेत. प्रसंगी संघर्ष करावा लागला आहे. बरं या सार्‍याला समाजवादी विचार, त्यातली मूल्य समाजमानसात रुजवण्याच्या मूलभूत कामाची एक किनार आहे. त्यामुळे एकूण जगणं अधिक संवेदनशील होऊन जातं. पण पन्नालाल यांनी हे सारं निष्ठेनं, धैर्यानं केलं. आजही ते करत आहेत. आसूचं त्यांचं शेतीविषयक प्रयोग आणि त्यामाध्यमातून केली जाणारी समाजवादी विचारांची, मूल्यांची पेरणी हे खूप मोठं काम आहे.

या देशातली अस्पृश्यता, स्त्री-पुरूष असमता, एक गाव अनेक पाणवठे ही सारी माणसामाणसात भेद करणारी जी विषमता आहे, ती नष्ट केल्याशिवाय खर्‍या अर्थाने मानवी विकास साध्य होऊ शकत नाही. त्यासाठी आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक समता प्रस्थापित होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही लोकशाही समाजवादाचा मार्ग स्वीकारला. सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून सामाजिक मूल्य रुजवण्याचं काम हाती घेतलं. त्यासाठी लोकांशी संपर्क, संवाद, सत्याग्रह आणि संघर्ष अशा मार्गाने पुढे जात राहिलो. त्यात माझ्यासारखा कार्यकर्ता हमालांचं, कष्टकर्‍यांचं संघटन करत त्यांच्या प्रश्‍नांवर काम करत राहिला. समाजवादी चळवळीतल्या इतरही अनेकांनी आपापली कार्यक्षेत्रे निवडून त्यात जीव ओतला. पन्नालालांनी मात्र जे जे म्हणून काम समोर येईल ते ते आपलं कर्तव्य म्हणून केलं. कोणत्याही एका कामात ते गुंतून पडले नाहीत. पण हाती घेतलेलं प्रत्येक काम त्यांनी तडीस नेलं आहे. म्हणूनच समाजवादी चळवळीतलं त्याचं योगदान हे नेहमीच मोठं राहिलेलं आहे.

अभ्यास, लेखन, प्रबोधन असा त्यांचा पींड आहे. पण म्हणून ते संघटनात्मक, रचनात्मक कामापासून दूर राहिले आहेत असं झालं नाही. जिथे ठामपणे भूमिका घेण्याची गरज असते तिथेही ते मागे हटले नाहीत. बहुतांशवेळा आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं असल्याने हे मी ठामपणे सांगू शकतो. आम्ही नामांतराच्या चळवळीत एकत्र होतो. 1980 साली बार्शीला गं. बा. सरदार यांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झालं, त्याच्या आयोजनाची मोठी जबाबदारी पन्नालालांनी घेतली होती. तिथं आम्ही एकत्र होतो. मी हमालांचं राज्यव्यापी संघटन उभं केलं. त्यात बार्शीच्या हमाल संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत तिथं मोठं संघटन त्यांनी उभारलं. तिथल्या हमालांचे अनेक प्रश्‍न सोडवण्याचं काम केलं.त्याचबरोबर कामगारांचं संघटन त्यांनी तिथं उभारलं.

राष्ट्र सेवादलाचा सुवर्णमोहोत्सव ही या पायपीटीतली एक ठळक कामगिरी. सेवादलाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा ते अध्यक्ष होते. या निमित्ताने त्यांनी संपूर्ण देशभर दौरे केले आणि राष्ट्र सेवा दलाला नवसंजीवनी मिळवून दिली. सेवा दलाच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने मोठा निधी उभा केला. किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा तो भूकंपग्रस्तांच्या मदतीला लागलीच धावून गेला. तिथं मदतीचं काम करत असताना अनाथ झालेल्या मुला-मुलींचा एक वेगळाच प्रश्‍न समोर आला. या मुलांना आधाराची गरज होती. ती मिळाली नाही तर एक पिढी बरबाद होईल हे दिसत होतं. त्यातूनच नळदूर्गचं ’आपलं घर’ उभं राहीलं. आज त्याचं फळ पाहायला मिळतंय. इथं वाढलेली बहुतांश भूकंपग्रस्त मुलं आज शिक्षण घेऊन आपापल्या पायावर उभी राहिलेली आहेत. पण म्हणून या आपलं घरचं काम थांबलेलं नाही. उलट ते आणखी जोमानं सुरू झालं आहे. समाजातल्या अनाथ, गरीब, गरजूंना आधार देण्याचं काम ते करत आहे. आणि यापुढेही ते अत्यंत चांगल्या प्रकारे करत राहावं म्हणून पन्नालालांनी या वयात पायपीट करून दीड कोटींचा निधी जमा करून दिला आहे.

केवढं हे मोठं काम आहे. समाजवादी तत्वज्ञान, त्यातील मूल्य आजच्या एकूण राजकीय परिस्थितीत सर्वांनीच ऑप्शनला टाकलेली दिसतात. अशा काळात समाजवादी विचाराचा, मूल्यांचा आग्रह धरत एवढी मोठी रक्कम उभी करणं सोपी गोष्ट नाही. पन्नालालांनी ते करून दाखवलं. त्यांचं आजवरचं चळवळीतलं योगदान जेवढं मोठं आणि व्यापक आहे तेवढाच व्यापकपणा त्यांच्या राहणीमानातील साधेपणातही आहे. अत्यंत साधा आणि सरळमार्गी असा हा माणूस आहे. संसदीय लोकशाहीच्या आघाडीवर त्याला कुठेही यश मिळालं नाही. नगराध्यक्षपदापासून खासदारकीपर्यंतच्या अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या. पण मतदारांनी त्यांना सतत नाकारलं. तरी ते खचले नाहीत. काम करत राहिले. समाजवादासाठी पायपीट करत राहिले. अद्यापही ही पायपीट थांबलेली नाही. मला वाटतं आता त्यांनी मागे वळून पाहायला हवं. सुटलेले धागे जोडायला हवेत. नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन आणि दिशादिग्दर्शन करायला हवं. लोकशाही सत्याग्रही समाजवादी चळवळ खेडोपाडी गेली पाहिजे यादृष्टीने त्यांनी काही विचारमंथन सुरू केलं पाहिजे. त्यातून दिशा दाखवली पाहिजे, असं मनापासून वाटतं.

गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ खेडोपाडी नेली. त्यापूर्वी महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ खडोपाडी पोहोचवली होती. असाच एक प्रयत्न पन्नालालांनी बार्शी तालुक्यातल्या चिखर्डे गावात केला होता. समाजवाद हा शब्द खेडोपाडी जावा. खेड्यातल्या लोकांमध्ये तो रुजावा म्हणून त्यांनी एक मशाल दिंडी काढली आणि त्याला नाव दिलं ‘समाजवादी ज्योत’.खरं म्हणजे ही समाजवादी ज्योत गावागावातून खेड्यापाड्यातून फिरायला हवी होती. पण ती चिखर्डे गावातच सुटली.

खरं पाहिलं तर गोरगरीब जनतेचं भलं करायचं असेल, तर लोकशाही समाजवादाला पर्याय नाही. पण आज तोच बाजूला फेकला गेला आहे. त्यामुळे आता मागे वळून बघण्याची गरज आहे. चिखर्डेचा प्रयोग व्यापक स्वरुपात पुन्हा राबवण्याची गरज आहे. सविनय कायदेभंगाच्या दिशेनं जाण्यासाठी सत्याग्रहाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याची गरज आहे. असं नवं काही घडवण्यासाठी विचारांना दिशा देण्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे. मला वाटतं, पन्नालाल यांच्यासारखा विचारवंत ते करू शकतो. त्यांच्याकडे ती दृष्टी आहे. मार्गदर्शक, नवे विचार मांडणारी लेखणी आहे. त्यांनी हे काम यापुढे हाती घ्यावं. माझ्यासारखे कार्यकर्ते अगदी आनंदाने त्यांच्या पाठिशी उभे राहातील.

स्वतःबद्दल काही बोलणं किंवा सांगणं हा पन्नालाल यांचा स्वभाव नाही. त्यामुळेच कदाचित त्यांनी या पुस्तकात जे मांडलं आहे ते चळवळीच्या अंगानं अधिक आहे. व्यक्तिगत फारसं नाही. तरी देखील मनोविकास प्रकाशनाने मनावर घेऊन ‘पायपीट समाजवादासाठी’ ही आत्मकथा प्रकाशित करण्याचं मोठं काम केलं आहे. त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो.

पुस्तकाचे नाव:-  पायपीट समाजवादासाठी: एका निष्ठावंताचं आत्मकथन
लेखक: पन्नालाल सुराणा
पृष्ठ संख्या: २९६ + ८ रंगित पाने, मूल्य: ३५० रुपये
प्रकाशनपूर्व सवलतीत पुस्तकाची नोंदणी करण्यासाठी
https://manovikasprakashan.com/index.php?  या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *