मानवाने आजवर अनुसरलेल्या अर्थनिर्मितीच्या प्रक्रियेतून भूरळ पाडणारा विकास घडवलेला असला तरी, या प्रक्रियेने बेरोजगारी प्रचंड वाढवली. गरीबी-श्रीमंती यातली दरी वाढवली. त्यातून प्रचंड विषमता निर्माण केली. त्याचबरोबरीने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास घडवून आणला. त्याचा कळत-नकळत मानवाच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम होऊ लागला. किंबहुना सार्स, स्वाइन फ्लू, इबोला, झिका आणि आता आलेला कोरोना ही याच परिणामाची काही उदाहरणे आहेत. कोरोनाने तर मानवी जीवनावर चहुबाजूने हल्ला चढवला आहे. त्यामुळे कोरोनानंतर किंवा त्यासह पुढील वाटचाल करताना प्रत्येक गोष्टीची नव्यानं सुरूवात करावी लागणार आहे. अशा पार्श्वभूमीवर शाश्वत भविष्यासाठी पर्यायी अर्थव्यवस्था कशी असावी आणि त्यात आपलं स्वतःचं योगदान काय असायला हवं हे जाणून घेऊन पुढची पावलं उचलावी लागतील. त्यासाठी मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं डॉ. गुरूदास नूलकर याचं ‘अनर्थशास्त्र’ हे पुस्तक वाचलंच पाहिजे. निसर्गाला साजेशी भूमिका घेण्याची स्फूर्ती देणाऱ्या या पुस्तकाविषयी…
‘अर्थशास्त्र हे आपल्या गरजा ठरवण्याचं शास्त्र आहे. जेमतेम कुडीने प्राण धरून ठेवण्याची पातळी ओलांडली, की गरज आणि चैन यांच्यातला फरक करावा लागतो आणि तो विचार स्वतःपुरता न करता सर्व समाजाचा करावा लागतो. म्हणजे नीतिमूल्यांचा विचार लागतो. मात्र, माणूस आज धडपडून उद्याची सोय करून ठेवतो. तो आपला वस्तूंचा वापर वाढण्याला सुबत्ता म्हणतो. आता उद्या म्हणजे किती दूरचे भविष्य, सुबत्ता किती असावी वगैरे ठरवायला खूप शहाणपण लागतं. ते नेहमीच अपुरे पडताना दिसतं, आणि माणूस सहजच अधाशी होतो…’ असं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ विचारवंत, लेखक नंदा खरे यांनी म्हटलेलं आहे.
माणसाचा हा जो काही अधाशीपणा आहे तोच आजच्या भयावह बनलेल्या प्रश्नांच्या मुळाशी आहे. विशेष म्हणजे हा अधाशीपणा भांडवलदारांनी पसरवलेल्या सुबत्तेच्या चुकीच्या कल्पनेतून वाढत गेलेला आहे. मुख्य म्हणजे या अधाशीपणाचे भांडवलदार आणि अर्थनिर्मिती प्रक्रियेतील इतरही घटक बळी आहेत. म्हणूनच चैन हीच गरज समजून अनावश्यक वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. मोबाईल फोन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. स्मार्ट फोन्स ही प्रत्येकाची गरज नाही. तरीदेखील आज प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन दिसतो. इतकंच नाही, तर नवं मॉडेल बाजारात आलं की ते आपल्या हती हवंच असं प्रत्येकाला वाटतं आणि अनेकजण आपला पहिला कार्यक्षम असणारा फोन रद्दी ठरवून नवा फोन घेतात. यात फोनची गरज किती आणि चैन किती? कोणी याचा विचार करत नाही. परिणामी ई कचरा वाढत जातो.
असं प्रत्येक क्षेत्रात घडताना आपल्याला दिसेल. अनेक खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. लोकांना त्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. असे असताना पेप्सी, कोका कोला यासारख्या कंपन्यांना भूगर्भातले पाणीसाठे वापरण्याला परवाने दिले जातात. यातून भूगर्भातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होतो. त्याचवेळी प्रदूषित पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात सोडलं जातं, ज्यामुळे आजुबाजूचे पाणीसाठे प्रदूषित होतात. अशी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं घेत अर्थनिर्मितीच्या सदोष क्रियेमुळे आपण कसे विनाशाकडे निघालो आहोत याचं वास्तवदर्शी चित्रण डॉ. गुरूदास नूलकर यांनी आपल्या या पुस्तकात मांडलं आहे.
अर्थशास्त्र, पर्यावरण आणि विषमता यांचा एकमेकांशी असणारा संबंध लक्षात न घेतल्यामुळे आपली वाटचाल अनर्थाकडे सुरू असून अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र कसे बनले हे “अनर्थशास्त्र” या पुस्तकात डॉ. गुरुदास नूलकर यांनी उत्कृष्टपणे समजावून सांगितलं आहे. ते सांगतानाच व्यापाराच्या उगमापासून ते आधुनिक अर्थव्यवस्थेपर्यंतचा मानवी प्रवास त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत दिला आहे. तो मांडताना वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या संकल्पना कोणत्या परिस्थितीतून उपजल्या ते सांगताना लेखक मानवाचा इतिहासही आपल्या समोर मांडतो.
“प्राचीन मानव आणि व्यापार” या पहिल्या प्रकरणापासून औद्योगिक क्रांती, आधुनिक अर्थशास्त्र, महायुध्दं आणि त्यांची पर्यावरणीय किंमत, अर्थव्यवस्थेच्या मर्यादा अशा प्रकरणांमध्ये लोकसंख्या, अन्नपुरवठा, कुपोषितता, कचरा आणि इ-कचरा, चंगळवाद, बाजारपेठ आणि जाहिरातबाजी, खाजगीकरणाचे फायदे तोटे, धार्मिक विचार, भांडवलशाही आणि कम्युनिझम, मुक्त बाजारपेठ, शेती आणि बदलती शेती या विषयांमधल्या अनेक संकल्पना लेखकानं छोट्याछोट्या उदाहरणासकट मांडल्या आहेत. त्यामुळे संकल्पना समजायला मदत होते. उदाहरणार्थ, “हॅमबर्गर इफेक्ट” म्हणजे काय हे सांगताना, अमेरिकेतल्या हॅमबर्गरच्या प्रचंड मागणीमुळे अॅमेझॉनमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी जंगलतोड कशी झाली आणि त्यातून पर्यावरणावर कसा आघात झाला हे थोडक्यात दिलं आहे.
एकूण काय तर आर्थिक वृद्धी म्हणजे विकास हे गृहीत धरल्याने अनेक पातळ्यांवर गल्लत झाली आहे. हे वास्तव या पुस्तकातून वारंवार पुढे येत राहातं. उदाहरणार्थ डॉ. नूलकर एके ठिकाणी लिहितात, ‘भारताच्या इंधन आयातीतून आपल्या आर्थिक अंदाजपत्रकात तोटा वाढत चालला असताना देखील मोटारगाड्यांची विक्री वाढणे हे आपल्या अर्थव्यवस्थेला कसे पोषक आहे यावर लेख प्रसिद्ध होत असतात. दिल्लीतील प्रदूषणाने भयानक रुप धारण केलेले असतानाही दिल्लीकरांचा मोठ्या गाड्यांचा शौक वाढतच आहे आणि सामाजिक वाहतूक सुधारण्याचा सरकारचा इरादा अजूनही शंकास्पद आहे. आपल्या नागरिकांसाठी मोटारगाड्या बनवून प्राप्त होऊ शकणारी आर्थिक वृद्धी महत्त्वाची आहे, की शुद्ध हवा महत्त्वाची आहे, या वैचारिक लढाईत आतापर्यंत आर्थिकवृद्धीच जिंकत आली आहे. अर्थव्यवस्थेच्या झगमगाटात जीवनावश्यक वस्तू आणि अर्थवृद्धीला आवश्यक परंतु जीवनावश्यक नसणाऱ्या वस्तू यात कमालीची गल्लत आपण करून बसलो आहोत. म्हणूनच भारतातील भयंकर विषमतेला न जुमानता या वर्षात मुकेश अंबानीला ७ अब्ज रुपये उत्पन्न कसे झाले ही बातमी आपल्या माध्यमांना महत्त्वाची वाटते. सार्वजनिक संपत्तीला श्रीमंतांच्या तिजोरीत आकर्षित करण्याची शक्ती आजच्या अर्थव्यवस्थेत आहे आणि कोणालाच यात काही गैर वाटत नाही, हे एका निर्ढावलेल्या समाजव्यवस्थेचं लक्षण आहे.’’
आकडेवारीसह आणि व्यवहारातील उदाहरणातून पुढे येत राहाणारं हे विश्लेषण, विवेचन वाचताना जगाने स्वीकारलेल्या अर्थव्यवस्थेच्या आधारे आपल्याला शाश्वत विकासाच्या मार्गावर जाता येईल का, असा प्रश्न आपल्या मनात उभा राहातो. अर्थात त्याचं उत्तर शेवटच्या प्रकरणात आपल्यासमोर येतं.
“शाश्वत विकासाकडे वाटचाल” या शेवटच्या प्रकरणात शाश्वत भविष्यासाठी पर्यायी अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे याविषयीचं सविस्तर विवेचन केलं आहे. ते करताना स्पर्धात्मक वातावरण आणि आर्थिकवृद्धीच्या पाठलागाचा ध्यास हे आजच्या अनेक समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे त्याला फाटा देत सजीवसृष्टी आणि भावी मानवी पिढ्या यांच्या भवितव्याचे ध्येय समोर ठेऊन एकत्रित काम करणे गरजेचं आहे. त्यासाठी राष्ट्राची संकल्पना बाजूला ठेऊन पृथ्वीचा विचार झाला पाहिजे अशा आशयाची मांडणी ते करतात. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या यूएनडीपी या संस्थेने २०३० सालासाठी शाश्वत विकासाची १७ ध्येय ठरवली आहेत. त्यात “गरिबी नष्ट करणं, भूक संपवणं, मानवी स्वास्थ्य आणि सौख्याचा पाठपुरावा करणं, सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणं, लैंगिक भेदभाव संपवणं, सर्वांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि शौचालयं उपलब्ध करुन देणं, परवडणारी आणि प्रदूषण न करणारी उर्जा उपलब्ध करुन देणं, सभ्य रोजगाराची उपलब्धता आणि आर्थिक वृध्दी, उद्योग, नावीन्याला वाव आणि पायाभूत सुविधा, समाजातील विषमता घटवणं, शाश्वत शहरं आणि सुरक्षित सामाजिक व्यवस्था, जबाबदारीनं उपभोग आणि उत्पादन, हवामान बदलाच्या बाबतीत कृतिशील रहाणं, पाण्यातील सजीवांची दक्षता, जमिनीवरील जैववैविधता जोपासणं, जागतिक शांती, न्यायव्यवस्था आणि सबल संस्था पुरवणं आणि जागतिक भागीदारीचं आवाहन” अशा ध्येयांचा समावेश आहे. ही ध्येयं कशी साध्यं करता येतील याबद्दलही सविस्तर लिहिलं आहे. त्याचबरोबर सरकारच्या पातळीवर कोणत्या जबाबदाऱ्या असतील आणि सरकारने त्या कशा पार पाडल्या पाहिजेत याबाबतही मांडणी केली आहे.
अर्थात आपण अनर्थ घडण्याच्या इतक्या जवळ पोहोचलो आहे की, सारंच सरकारवर ढकलून मोकळं होता येणार नाही. प्रत्येक नागरिकाचीही काही एक जबाबदारी आहे. ती त्याने पार पाडली पाहिजे. त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. पर्यावरणपूरक, निसर्गाला साजेशी भूमिका प्रत्येकाला घ्यावी लागेल. त्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची उत्पत्ती, त्याचा इतिहास यावर सविस्तर चर्चा करतानाच अर्थशास्त्राची सांगड निसर्गस्वास्थ्य, समाजस्वास्थ्य यांच्याशी घातली आहे. मानवीसौख्यात नैसर्गिक परिसंस्था आणि संसाधनांचे स्थान व अर्थशास्त्रात त्यांना हातळण्याची पद्धत याचाही विचार लेखकाने सामान्य वाचकांना समजेल या पद्धतीने या पुस्तकात मांडला आहे. त्यामुळे शाश्वत विकासात आपलं स्वतःचं योगदान काय असायला हवं हे आपल्यासमोर येत राहातं आणि त्यासाठीची प्रेरणा आणि स्फूर्ती हे पुस्तक देत राहातं.
-समर निंबाळकर
aksharsamwad@gmail.com
पुस्तकाचे नाव- अनर्थशास्त्र
लेखक- डॉ. गुरूदास नूलकर
प्रकाशक– मनोविकास प्रकाशन
पृष्ठ संख्या– १६५, मूल्य- १६० रुपये.