आजच्या चंगळवादाला शह देण्यासाठी गांधीजींच्या जीवनशैलीखेरीज संयमाचं, निर्धाराचं दुसरं साधन नाही. शिक्षण याचा अर्थ आयुष्यातले कष्ट नाहिसे होणं असा घेतला जातो. परंतु भारतापुढचा प्रश्न लोकांना आराम पुरवण्याचा नाही, तर त्यांचा रिकामा वेळ उपयोगात आणण्याचा आहे, असं गांधीजी म्हणत. म्हणून पुस्तकी शिक्षणाबरोबरच मुलांना उत्तम स्वयंपाक आणि सफाई करायला शिकवलं तर ती खरी आदर्श शाळा असं ते मानत. इतकंच नाही, तर ते स्वतः सर्व कष्टाची कामं आनंदानं आणि मनापासून करत. प्रत्येक कामाकडे बघण्याची त्यांची एक वेगळी जीवनदृष्टी होती. हे बहुरूप गांधी या अनु बंदोपाध्याय यांच्या पुस्तकातून दिसून येतं. एखाद्याची जीवनशैली मुळापासून बदलण्याची ताकद या पुस्तकात आहे. मनोविकास प्रकाशनाने मराठीत आणलेल्या या पुस्तकातील शेतकरी गांधी हे प्रकरण आजच्या गांधी जयंतीच्या निमित्ताने खास आपल्यासाठी…
गांधीजींनी एक कविता वाचली. त्यात शेतकर्याला जगाचा पिता म्हटलं होतं. परमेश्वर जगाचा दाता आहे तर शेतकरी त्याचा हात आहे. भारताचं स्वातंत्र्य शेतकर्यांच्या दारिद्य्रातून आणि अज्ञानातून मुक्तीमध्ये दडलेलं आहे यावर त्यांचा विश्वास होत. “75 टक्क्यांच्यावर जनता जमिनीत राबणारी आहे. जमीन कसणाराच खरा जमिनीचा मालक आहे, गैरहजर जमीनमालक नाही. सब भूमी गोपालकी. जर आपण शेतकर्यानं निर्माण केलेलं सगळंच त्यांच्यापासून हिरावून घेणार असलो, तर आपलं सरकार निर्माण होण्याची आशा सोडावी लागेल. शेतकरीच आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात. वकील, डॉक्टर्स, श्रीमंत जमीनदार ते सुरक्षित ठेवू शकत नाहीत.
राज्याच्या एकूण करापैकी 25 टक्के कर शेतकर्यांकडून वसूल केला जाई. जमिनीवरच्या कराचं ओझं मोठं होतं. शहरात जेव्हा राजवाड्यांसारख्या खर्चिक इमारती बांधल्या जाताना दिसत, तेव्हा गांधीजी दु:खानं म्हणत, “शेतकर्यांनी मिळवलेल्या पैशातून हे सगळं चाललं आहे.’’ शहरी समृद्धीची अशी प्रतीकं बघितली, की त्यांना कराखाली दडपलेले शेतकरी, बेकायदेशीर मागण्या, कधीही परत न फेडली जाणारी कर्ज, निरक्षरता, अंधश्रद्धा, रोगराई हे सगळं डोळ्यांपुढे उभे राहत असे.
गांधीजी जन्मानं शेतकरी नव्हते; पण शेतकरी होण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. शाळकरी वयात त्यांना फळांची झाडं लावायला आवडत. रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर ते पाण्याच्या बादल्या घेऊन गच्चीत जात आणि झाडांना पाणी घालत. 36व्या वर्षी त्यांनी शेतावर शेतकर्याचं जीवन जगायला सुरुवात केली. आश्रमासाठी जागा शोधताना फळझाडं असलेली एक एकर जागा त्यांना पसंत पडली. त्यांनी ती विकत घेतली आणि तिथे त्यांच्या परिवारासह आणि मित्रांसह राहायला गेले. हळूहळू त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि पांढरपेशा व्यवसाय सोडून दिला. शेतावरच्या त्यांच्या सहकार्यांनी झोपड्या बांधल्या. गांधीजी जमीन नांगरत असत, पाणी काढत, भाज्या आणि फळांची लागवड करत, लाकूड तोडत. लवकरच त्यांनी त्या जमिनीचं फळबागेत रूपांतर केलं.
दक्षिण आफ्रिकेत दहा वर्षं ते शेतावर राहिले. त्यातून त्यांना शेतीचा चांगला अनुभव आणि ज्ञान मिळालं. त्यांनी मधमाश्यापालनाची नवीन पद्धत शोधून काढली आणि लोकप्रिय केली. ती अहिंसक होती आणि अधिक शास्त्रीयही होती. त्यात मधमाश्या किंवा पोवळं उद्ध्वस्त होत नसे. शेतीच्या किंवा फळांच्या, भाज्यांच्या शेताजवळ जर मधमाश्यापालन केलं तर जास्त उत्पादन कसं मिळतं हे ते समजावून सांगत. मधमाश्या मध गोळा करायला जेव्हा फुलांवर जातात तेव्हा त्यांचे परागकण त्यांच्या पायाला चिकटून दुसरीकडे जातात आणि त्यातून उत्पादनाचा दर्जा उंचावतो आणि उत्पादन वाढतं.
जमीन नापीक आहे, पाणी पुरेसं नाही, चांगली अवजारं नाहीत, या सगळ्या तक्रारी गांधीजींनी निकालात काढल्या. आपल्या श्रमांचा कल्पकतेनं वापर करणं ही शेतकर्याची सर्वांत मोठी शक्ती होती. शेतकरी उत्साही, कल्पक आणि स्वावलंबी असायला हवा. एकदा एका ‘नई तालीम’च्या संयोजकानं तक्रार केली, की त्यांना दिलेली जमीन शेतीयोग्य नाही. तेव्हा गांधीजी म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेत कशा प्रकारची जमीन आम्हाला मिळाली होती हे तुला माहीत नाही. मी तुझ्या जागी असतो तर मी सुरुवातीला नांगर वापरला नसता. मी मुलांच्या हातात खुरपी दिली असती आणि त्यांना ती वापरायला शिकवली असती. ती कला आहे. बैल नंतर वापरता येतील. माती आणि कंपोस्ट खताचा लहानसा जरी थर असला तरी तो आपल्याला भाज्या काढायला उपयोगी पडेल. मानवी विष्ठेपासून 15 दिवसांत खत निर्माण होऊ शकतं. त्यासाठी चर खणावे लागतील. आपल्या मुलांना शेतीकाम हे मोठं सन्मानाचं काम आहे हे शिकवायला हवं. शेतीत काम करणं कमी दर्जाचं तर नाहीच, उलट तो मोठा मानाचा व्यवसाय आहे.’’ मूलोद्योग शिक्षणाच्या योजनेत शेतीचा भाग फार मोलाचा आहे हा गांधीजींचा विचार होता.
भारताची फाळणी होण्यापूर्वी थोडंसंच आधी नोआखलीतल्या हिंदूंनी त्यांना विचारलं, “आम्ही इथे कशाच्या आधारावर राहायचं? मुसलमान शेतकरी आम्हाला सहकार्य करत नाहीत. त्यांचे बैल, नांगर आम्हाला देत नाहीत.’’ गांधीजी म्हणाले, “काही कुदळ, फावडी जमवा आणि खणायला सुरुवात करा. कुदळींनी खणलेल्या जमिनीतून कमी पीक येतं असं काही नाही.’’
1943 या वर्षी गांधीजी जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा बंगालमध्ये लाखो भूकबळी झाले. त्या भयंकर आठवणी लोकांच्या आणि सरकारी अधिकार्यांच्या मनात ताज्या होत्या. 1947 या वर्षी जेव्हा पुन्हा दुसर्या दुष्काळाची लक्षणं दिसू लागली. तेव्हा व्हाइसरॉयनं गांधीजींचा सल्ला घेण्यासाठी आपल्या सचिवांना सेवाग्रामला विमानानं पाठवलं. गांधीजी जराही विचलित झाले नाहीत आणि त्यांनी जनतेला सांगितलं, की दुष्काळाची भीती मनातून काढून टाका. बंगालमध्ये भरपूर सुपीक जमीन आहे. पुरेसं पाणी आहे आणि काम करणार्या हातांचा तुटवडा मुळीच नाही. अशा परिस्थितीत अन्नाचा दुष्काळ कसा पडेल? लोकांना स्वावलंबी बनण्याचं शिक्षण द्यायला हवं. दोन दाणे खाणार्यानं चार उगवले पाहिजेत. प्रत्येकानं खाण्याजोगं काही स्वत: निर्माण करायला हवं. यासाठी सर्वांत सोपा मार्ग म्हणजे स्वच्छ माती घ्या, त्यात नैसर्गिक खत मिसळा, थोडंसं वाळलेलं शेणही चांगल्या खताचं काम करतं, एखाद्या मातीच्या कुंडीत किंवा पत्र्याच्या डब्यात ते घाला आणि काही भाज्यांच्या बिया त्यात पेरा. रोज पाणी घाला. सर्व दिखाऊ समारंभ बंद करायला हवेत. बियाणं निर्यात करणं बंद करायला हवं. गाजरं, रताळी, बटाटे, सुरण, केळी यांच्यापासून पुरेसे पिष्टमय पदार्थ मिळतील. यामागची कल्पना अशी, की सध्या जेवणातून धान्य आणि डाळी वगळून साठवून ठेवायच्या. त्यांच्या स्वावलंबनाच्या आवाहनात लोकांनी निर्धारानं काम करणं, शिस्त पाळणं आणि कष्ट करणं, नवीन प्रकारच्या खाण्याच्या सवयींशी जुळवून घेणं आणि परदेशातून भीक न मागवणं हे अपेक्षित होतं.
जेव्हा अन्न आणि वस्त्रावर निर्बंध होते तेव्हा गांधीजींना सरकारी कोट्यातून धान्य मागण्याची गरज नव्हती. ते गहू, तांदूळ, डाळी आणि साखरेशिवाय राहू शकत होते आणि स्वत:चं कापड स्वत: तयार करत होते.
‘हरिजन’मध्ये त्यांनी आजूबाजूला उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूंमधून कंपोस्ट खत कसं तयार करावं याबद्दल तपशीलवार सूचना दिल्या होत्या. गाईचं शेण, माणसांचं मल-मूत्र, भाज्यांच्या साली, पाण्यावर उगवणारी हायसिन्थ ही वनस्पती या सर्वांचा उपयोग करता येतो. कंपोस्ट खत कुठल्याही भांडवलाशिवाय स्वत:चे श्रम आणि कल्पकता वापरून करता येतं. आश्रमात मल-मूत्रापासून खत तयार करण्यासाठी जमिनीत उथळ खड्डे केलेले असत. जमिनीच्या वरच्या एक फुटापर्यंतच्या थरातले जंतू मल-मूत्राचं खत तयार करतात. जर हा कचरा खोल खड्ड्यात पुरला तर त्यातून दूषित वायू बाहेर पडतात आणि हवेत प्रदूषण पसरवतात. उथळ खड्ड्यांमध्ये काही दिवसांतच त्याचं चांगलं खत होतं. या कामाला शेतकरी भंगी-कम-शेतकरी काम म्हणत. ते त्यांना फारसं आवडलं नाही. गांधीजींना रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक खतं जास्त पसंत होती. पीक लवकर मिळावं म्हणून रासायनिक खतांचा वापर त्यांच्या मते धोकादायक होता. त्यांच्यामुळे जादूसारखा परिणाम दिसण्याऐवजी जमीन कायमची नापीक होण्याची शक्यता जास्त होती.
त्यांना बैलांनी ओढण्याच्या नांगराच्या जागी ट्रॅक्टरही मान्य नव्हता. साबरमती आश्रमात त्यांनी सर्व सुधारित नांगर वापरून पाहिले, पण जुना बैलांचा नांगरच सर्वांत सोयीचा ठरला. तो मातीचं रक्षण करत असे; कारण तो बी पेरण्याइतकंच खोलवर खणत असे, पण त्याखाली जाऊन नुकसान करत नसे. त्याहूनही ट्रॅक्टरमुळे शेकडो माणसांची शेतीच्या कामातून हकालपट्टी होईल हे त्यांना मुळीच आवडणारं नव्हतं. त्यांना माणसं उत्पादनाच्या कामात गुंतलेली हवी होती. यांत्रिक अवजारं शेतकर्यांमधल्या सृजनक्षमता बोथट करतील, अशी त्यांना भीती होती. प्रत्येकानं आपली लहान लहान शेतं नांगरत बसायची पारंपरिक पद्धत त्यांना पसंत नव्हती, कारण “शंभर कुटुंबांनी एकत्र शेती करून आलेलं उत्पन्न वाटून घेणं, जमिनीचे शंभर लहान लहान तुकडे करण्यापेक्षा केव्हाही चांगलं होतं. गावात प्रत्येकाकडे बैल आणि बैलगाडी असणं यात फार नुकसान होतं.’’ त्यांनी सहकारी पद्धतीनं पशुपालनाचाही पुरस्कार केला. या एकत्रित पद्धतीनं सर्व जनावरांना योग्य ती वैद्यकीय मदत मिळेल, सर्वांचं मिळून एक चराई कुरण राखता येईल आणि अनेक गाईंसाठी योग्य तो वळू निवडता येईल. सामान्य शेतकर्याला या सोयी मिळू शकत नाहीत. गुरांच्या चार्यालाच त्यांच्यापासूनच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च येतो. गुरांची संख्या वाढली, की गरिबीच्या ताणांमुळे शेतकरी वासरं विकतो, खोंडं मारून टाकतो किंवा त्यांना उपाशी मारतो. तो गुरांना नीट वागवत नाही आणि क्रूरपणे त्यांच्याकडून मेहनत करून घेतो.
गाईच्या संरक्षणावर गांधीजींनी विशेष भर दिला. गाय ही शेतीच्या अर्थव्यवस्थेत सर्वांत मूल्यवान असते. जेव्हा गांधीजी भारतभर यात्रा करत, तेव्हा शेतकर्यांचे मलूल डोळे आणि गाईंची दयनीय अवस्था पाहून ते निराश होत, “भारतात गाईला आदरानं गोमाता म्हणतात; पण तिला इतकं वाईट वागवणारा दुसरा कुठलाही देश नसेल. मुसलमान लोक गाई मारतात म्हणून त्यांच्याशी वैर करणं हा आता त्या आदराचा भाग झाला आहे आणि तिच्या स्पर्शानं स्वत:ला पवित्र करून घेणं हाही त्याचाच भाग आहे. अनेक पांजरपोळ आणि गोशाला गाईंच्या छळाच्या छावण्या झाल्या आहेत.’’ पांजरपोळांनी भाकड आणि आजारी जनावरांची देखभाल करावी आणि पशुपालनाचं मार्गदर्शन करावं, अशी त्यांची अपेक्षा होती. गाईचं दूध आणि लोणी म्हशीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं असतं म्हणून त्यांना ते जास्त पसंत होतं. त्याशिवाय गाय मेल्यानंतरही तिची कातडी, हाडं, मांस यांचा उपयोग होतो.
आश्रमातल्या गोशाळेला गांधीजींनी चांगला वळू ठेवला होता आणि एक कमी खर्चाचा तरीही आदर्श गोठा तयार केला होता. गोशाळेच्या प्रत्येक बारीकसारीक कामांत त्यांचं लक्ष असे. सर्व नवजात वासरांना ते प्रेमानं थोपटत. एकदा एका वासराला असाध्य रोगानं पछाडलं. कोणताही वैद्यकीय उपाय उपलब्ध नव्हता. गांधीजींनी त्याचं आयुष्य संपवायचं ठरवलं आणि डॉक्टरांनी जेव्हा त्याला कायमच्या झोपेचं इंजेक्शन दिलं, तेव्हा गांधीजी त्याचा खूर हातात धरून बसले होते. अहिंसेच्या पुजार्यानं ही हिंसा करावी याचा अनेकांनी निषेध केला. एका जैनानं तर हे पाप गांधीजींच्या रक्तानं धुण्याची धमकी दिली. गांधीजींनी शांतपणे या वादळाला तोंड दिलं.
माकडं जेव्हा आश्रमातली पिकं, फळं, भाज्या यांची नासाडी करत, तेव्हा त्यांना मारून टाकण्याचा प्रस्ताव गांधीजींनी मांडला आणि आणखी एकदा अहिंसेच्या अंध पुजार्यांना धक्का दिला. ते म्हणाले, “मी स्वत: शेतकरी आहे. त्यामुळे पिकं वाचविण्यासाठी मला कमीत कमी हिंसेचा मार्ग स्वीकारणं भाग आहे. माकडांचा त्रास आता गळ्याशी आलेला आहे. माकडं आता बंदुकीच्या गोळ्यांनाही घाबरत नाहीत. उलट बंदुकीचे बार ऐकून अधिकच ओरडा करतात. जर इतर काही मार्गच उरला नसेल, तर मी खरोखरच त्यांना मारून टाकण्याचा विचार करतो आहे.’’ एरवी कधीही माकडांना आश्रमात कुणी मारत नसे.
गरीब शेतकर्याचं उत्पन्न कसं वाढवायचं हीच गांधीजींना सततची चिंता होती. वर्षातून चार ते दहा महिने त्यांना काम नसायचं. नुसत्या शेतीवर भागत नसे. तीस कोटी लोकांचा हा निरुद्योगी वेळ कामी लावण्यासाठी त्यांनी स्त्रियांना घरात चरखा देऊन आणि पुरुषांना हातमाग देऊन प्रयत्न केला. त्यांना या अशिक्षित, अर्धनग्न, कुपोषित शेतकर्यांचं उत्पन्न वाढवायचं होतं आणि त्यांना अशा पातळीवर आणायचं होतं, की जिथे त्यांना चौरस आहार, राहण्याजोगतं घर, अंगभर कपडे आणि योग्य शिक्षण मिळेल. त्यांच्यात प्रतिकाराची शक्तीही निर्माण व्हायला हवी. शेतकरी-कामकरी प्रजा रक्षणासाठी ते उभे राहिले आणि म्हणाले, “जेव्हा शेतकर्यांना आपल्या सामर्थ्याची जाग येईल आणि जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या ‘नशिबानं’ त्यांना या हतबल अवस्थेत लोटलेलं नाही, तेव्हा तो कायदेशीर काय अन् बेकायदेशीर काय याचा विचार करणार नाही. स्वराज्याचा खरा अर्थ जेव्हा शेतकर्यांना कळेल, तेव्हा त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचं धाडस कोणीही करणार नाही.’’
गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी असहकाराची चळवळ सुरू केली, कायद्यानं बंदी असूनही मीठ बनवलं, सार्वजनिक सभांमधून स्वातंत्र्याची शपथ घेतली. सरकारी कर न भरण्याच्या आंदोलनात त्यांच्या जमिनी, मालमत्तेवर जप्ती आली, त्यांचं पैशांचं नुकसान झालं; पण त्यांची नैतिक उंची वाढली.