# गांधी का मरत नाही: हत्येनंतरही जिवंत असलेल्या गांधींचं नवं अकलन.

 

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे शेवटचे पर्व आपल्या कार्यकर्तृत्वाने भारून टाकणारा महात्मा कोणाच्या हितसंबंधाआड आला असेल? बरं खुनानंतरही आत्यंतिक प्रेम, भक्ती आणि तेवढाच टोकाचा व्देष, असा परस्परविरोधी भावनातिरेक त्यांच्या वाट्याला का यावा? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न म्हणजे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले चंद्रकांत वानखडे लिखित ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक होय. महाराष्ट्रांच्या सामाजिक जीवनात चंद्रकांत वानखडे, हे अभ्यासू शेतकरी आंदोलक, संपादक, लेखक म्हणून ओळखले जातात. गांधी, आंबेडकर व्हाया जयप्रकाश नारायण, असा प्रवास करणाऱ्या या लेखकाने, सामाजिक चळवळींत झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक संवेदनशील कार्यकर्त्यांचे जाळे महाराष्ट्रभर उभे केले आहे. गांधी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गांधी हा डोक्यावर घेऊन नाचायचा नव्हे, तर डोक्यात ठेऊन तो आपल्या जगण्याला जोडण्याचा विषय असल्याची त्यांची भूमिका. याच भूमिकेतून त्यांनी गेल्या दशकभरात व्याख्यानांच्या माध्यमातून गांधीचं नेमकं रुप लोकांपर्यंत पोहोचवलं. गांधी ऐकताना एरवी कंटाळणारा वर्ग चंद्रकांत वानखडेंच्या या व्याख्यानानंतर गांधी खरंच वेगळ्या पद्धतीने समजावून घ्यायला हवा, अशी भावना व्यक्त करत आहे. खरे तर, ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक म्हणजे त्यांच्या अशाच भारावून टाकणाऱ्या मांडणीचे दस्तऐवजीकरण आहे. त्याविषयी…

स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात मोठी, धक्कादायक आणि खळबळजनक घटना म्हणून गांधीहत्येकडे पाहिलं जातं. भारतीय समाजमनावर या घटनेने दीर्घकाळ परिणाम केले आहेत. त्यामुळे नथूराम गोडसेकडून गांधीजींची हत्या का आणि कोणी घडवून आणली. त्यापूर्वीही गांधीजींच्या खुनाचे प्रयत्न का आणि कोणी केले याचा शोध अनेकांनी घेतला आहे. अनेकजण अद्यापही तो घेत आहेत. त्याच शोधाचा अत्यंत वेगळा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय. जात, वर्ण, धर्म आणि यातून येणारी अस्पृश्यता या भोवती होणारं सांस्कृतिक राजकारण हा भारतीय सत्ताकेंद्राचा पाया होता आणि आजही तो कायम आहे. हे सूत्र समोर ठेवून लेखक गांधीहत्येचं मूळ सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या कुटील राजकारणात असल्याचं इतिहासातील दाखले देत मांडतात.

इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीशांनी पेशव्यांच्या हातून महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केली. खरे तर ही सत्ता चित्पावन ब्राम्हणांच्या हातातून निसटल्याने चित्पावन ब्राम्हणांनीच ती सत्ता पुन्हा हस्तगत केली पाहिजे आणि भोगली पाहिजे, असा स्वातंत्र्याचा मर्यादित अर्थ घेणा·या महाराष्ट्रातील तत्कालीन नेतृत्वाने जो अहंकार जोपासला होता, त्या अहंकार गंडाला नख लावण्याचे कार्य म. गांधीनी केले. म्हणजे १९२० नंतर गांधींचा भारतीय राजकारणात प्रवेश होताच काँग्रेसच्या व्यासपीठावर अस्पृश्यतेच्या प्रश्नाची चर्चा होते. मग लोकशाहीत शेतकरी हा राज्यकर्ता असला पाहिजे. इतकंच नव्हे, तर अस्पृश्य वर्गातली मुलगी जोपर्यंत भारताच्या सर्वोच्चपदी बसत नाही, तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही कारण तोच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे, असे गांधींजी थेट भूमिका घेऊ लागतात. तेव्हा हळूहळी काहींना गांधींचे अस्तित्व धोक्याचे वाटू लागते. म्हणूनच ते त्यांच्या द्वेषाचे धनी ठरले असावेत, अशी मांडणी अनेक उदाहरणे देऊन लेखकाने केली आहे. महाराष्ट्रातील या वर्गाला म. गांधीचे नेतृत्व कधीच मान्य होऊ शकले नाही, अशी नोंदही लेखक ठिकठिकाणी अधोरेखित करतात.

गांधीजींच्या लोकशाहीवादी, सर्वव्यापी भूमिकेने भयकंपित झालेला वर्गच गांधीचा मोठ्या प्रमाणात दुस्वास करीत राहिला त्यातून म. गांधी यांना अगतिक, असाह्य, केविलवाणा सिद्ध करण्यासाठी येथील कुजबुज मोहिमेने, मजबुरी का नाम म. गांधी, गांधीची बकरी, काजू-बदाम शिवाय काही खात नव्हती, एका गालावर मारली, तर दुसरा गाल पुढे करावा, असे अनेक गौरसमज समाजात पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वीही झाले. अशा अनेक लांच्छनांचा उहापोह लेखकाने या पुस्तकात केला असून, त्यांचा सोदाहरण समाचार घेतला आहे. एका गालावरचा संदर्भ देताना लेखक लिहितात, ‘हरिजन यात्रेदरम्यान गांधींनी ते वाक्य वापरले होते. हरिजनांवर सर्वजनांनी आतापर्यंत इतका अन्याय अत्याचार केला आहे, की हरिजनांनी माझ्या एका गालावर जरी थापड मारली तरी मी दुसरा गाल समोर करेल आणि तरी देखील त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार नाही. महात्म्याचे महात्म्य समजून घेतांना त्यांची सुटी वाक्य समाजात पसरवून गैरसमज निर्माण करण्यापेक्षा त्यातील संदर्भ लक्षात घेतल्यास, त्या महात्म्याची ऊंची अधिकच वाढलेली जाणवते. अशा अनेक संदर्भांची पेरणी चंद्रकांत वानखडे यांनी, ‘गांधी का मरत नाही’,मध्ये केलेली आहे. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीत कसे वौर होते? हे ठळकपणे सिद्ध करण्याचा प्रयत्न इथे सतत चाललेला असतो. समकालीन असलेल्या या महामानवांचे आणि म. गांधींचे संबंध कसे सौहार्दपूर्ण होते आणि त्यांच्या कार्याविषयीचा कळवळा म. गांधींच्या मनात कसा वसत होता, याची अनेक अदाहरणे या पुस्तकात दिली आहेत.

गांधी जातीयवादी, वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते, सनातनी हिंदू होते, असे अनेक आरोप त्यांचेच सुटे सुटे संदर्भ देऊन अनेकदा केले जातात. एकीकडे गांधी, आपल्याला वर्णव्यवस्था मान्य असल्याचे म्हणतात, स्वत:ला सनातनी हिंदू असल्याचे सांगतात, हे खरे असले तरी, तेच गांधी १९२० च्या नागपूरच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारण्याचा ठराव मांडतात. श्रम न करता खातो, तो चोर आहे, असे म्हणतात. शुद्रांना वेद शिकण्याबाबत मनाई करणे मला स्वत:ला कधीच मान्य हाणार नाही, असे म्हणतात. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करतात, आपल्या कोणत्याच आश्रमात कोणत्याही देवाचे मंदिर स्थापन होऊ देत नाहीत. कोणत्याही देवाच्या मुर्त्या आणि कसल्याही धार्मिक पूजेत स्वत:ला अडकवून घेत नाहीत. ईश्वर हेच सत्य मानणाऱ्या समाजात, सत्य हेच ईश्वर, हे तत्त्व बिंबविण्याचा प्रयत्न करतांना, अनेक उच्चवर्णीय सहकार्यांना मृत जनावरांची चामडी सोलणे, संडास साफ करणे , यांसारख्या कामासाठी प्रेरणा देतात. कोणता सनातनी हिंदू व्यक्ती ज्याच्या मनात वर्ण व्यवस्थेची चौकट तशीच टिकावी अशी अभिलाषा आहे, त्यांना वरील विचार आणि वर्तन पटेल? गांधी ते सहज करतात. लेखकाने या पुस्तकात अनेक उदाहरणे देऊन धर्माचा वापर धर्मसुधारणेसाठी करणे, हाच गांधीच्या मनातील उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. धर्माचा आधार सोडला तर आपले म्हणणे येथील जनमानस गंभीरतेने घेणार नाही, याची त्यांना पुरेपुर जाणीव होती, हेही लेखक लक्षात आणून देतात.

गांधी – आंबेडकर संबंधांचे काही पदर यात उलगडून दाखविण्याचा प्रयास लेखकाने केला आहे. पुणे-करार या अत्यंत संवेदनशील विषयावर लेखकाने दिलेली माहिती निश्चितच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत, गांधी आणि येथील सामाजिक व्यवस्थेवर अत्यंत कठोरात कठोर टीका केली. आंबेडकरांच्या टीकेला हजारो वर्षे दलितांच्या जगण्याला तुच्छ, प्राणीवत बनविणाऱ्या येथील सामाजिक व्यवस्थेबद्दलची चीड होती. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या घणाघाती टीकेला उत्तर देतांना म.गांधी म्हणतात, आमच्या देशातील उच्चवर्णीयांनी अस्पृश्यावर पिढ्यानपिढ्या एवढा अन्न्याय केला आहे, की तो पाहता बाबासाहेब काहीच बोलेल नाहीत. आमच्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार त्यांना आहे. मी त्यास पात्र आहे. म गांधीचे हे बोलणं तोंड देखलं नव्हतं, हे पुणे करार आणि त्या काळात म.गांधींनी केलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यावरून स्पष्ट होते. पुणे कराराबाबत लेखकाने सविस्तर माहिती आणि म.गाधींची नेमकी भूमिका यावर सविस्तर भाष्य करायला हवे होते असे वाटते. ३० जानेवारी १९४८ला नथुराम गोडसे याने गांधींची हत्या केली. गांधी हे मुस्लिम धार्जिणे, पाकिस्तानप्रेमी, देशाच्या फाळणीला जबाबदार , पाकिस्तानला पंचावन्न कोटी सरकारला द्यायला भाग पाडणारे, म्हणजेच देशद्रोही होत आणि या देशद्रोहाची शिक्षा म्हणजेच गांधी वध होय, असे नथुरामवंशीय लोक सतत सांगून, ती हत्या न्याय्य असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न करतात. खरे तर पाकिस्तान निर्मितीच्या आणि पंचावन्न कोटीच्या अगोदरही १९३४ मध्ये पुण्यात गांधी हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यावेळी त्यांची हरीजनयात्रा सुरू होती. तो प्रयत्न यशस्वी झाला असता, तर मग, गांधी भंगी, न्हावी व वकीलाला एका स्तरावर आणू इच्छितात आणि आमच्या ब्राम्हणी महत्त्वाकांक्षेच्या आड येतात म्हणून ही हत्या केली, असे ते म्हणू शकले असते काय? यांसारखे बिनतोड प्रश्न लेखकाने उपस्थित करून गांधी हत्येसाठी, गांधींचा वर्णव्यवस्थाधारित समाज व्यवस्थेतील उच्च निचतेच्या संकल्पनेला उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा इथल्या उच्चवर्णीय लाभार्थी व्यवस्थेला भयंकपित करीत होता, यातूनच ही हत्या झाली असे अधोरेखित करतात.

गांधींच्या हत्येला ७० वर्षे झाली असली तरी ते अद्याप जिवंत आहेत. जोपर्यंत समाजाला चांगुलपणाचे आकर्षण आहे, तोपर्यंत गांधींना मृत्यू नाही, कारण मानवी जीवनातील चांगुलपणाचे प्रतिबिंब लोक गांधींत पाहतात, नथुरामात नाही, असे सांगून गांधीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल समाजात निर्माण केल्या गेलेल्या भ्रमाला दूर सारण्याचे महत्वाचे कार्य हे पुस्तक करते.

-समर निंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *