# बुकशेल्फ: ‘निसर्गाची हाक ऐकायला येत नसेल, पण मुलांची किंचाळी जरूर ऐका!’.

 

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी पोषक वातावरण तयार करणे या हेतूने ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण साजरा केला. कोरोणाचं गहिरं सावट असताना तो जगभरात साजरा केला गेला. परंतु वरील उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने आपण किती पावलं पुढे टाकली याचं उत्तर नकारार्थी येतं. कारण निसर्गाची हाक आपण ऐकूनच घेत नाही. म्हणून स्वीडनच्या सतरा वर्षीय ग्रेट थुनबर्ग या मुलीने आपल्याला हाक दिली आहे. तिची हाक आता ऐकायलाच हवी, नसता पर्यावरणाबरोबरच मानवाचा ऱ्हास अटळ आहे. याचीच जाणीव करून देणारं अतुल देऊळगावकर यांचं ‘ग्रेटाची हाक – तुम्हाला ऐकू येतेय ना’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलं आहे. ५ जून रोजी साजरा केला गेलेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी…

‘ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना’ या पुस्तकाविषयी प्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी यांनी अतिशय समर्पक आणि मार्मिक असा अभिप्राय नोंदवला आहे. तो पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिलेला आहे. तो संक्षिप्त स्वरुपात असा आहे…

“हे पुस्तक पर्यावरणऱ्हासाचा वर्तमान सांगायला सुरूवात करतं खरं पण विषयाच्या खोलात जाण्याच्या अपरिहार्यतेचा रेटाच इतका विलक्षण आहे, की लेखक आपल्याला पर्यावरणचिंतेच्या इतिहासाच्या मुळाशी आणि भविष्याच्या टोकाशी घेऊन जातो… अभ्यासपूर्ण रितीनं…

हे पुस्तक सतत सांगत राहतं, की ग्रेटा निमित्त आहे, पण ती आपली संधी देखील आहे. शेवटची संधी. …आणि विचारत राहतं, की आपण तिच्या आर्त हाकेला उत्तर देणार आहोत, की जशा आजवरच्या हाका आपण ऐकूनही न ऐकल्यासारखं वागलो, तसंच परत एकदा करणार आहोत? पृथ्वीबरोबर स्वतःही नष्ट होणार आहोत…?

पण, पुस्तकं फक्त प्रश्न विचारू शकतात… उत्तर सुचवू शकतात… घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतात…”

खरंच आहे. घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम पुस्तकं करतात. पाणी प्यायचं की नाही हे घोडा ठरवतो. बहुतांशवेळा घोडे पाणी पीतच नाहीत. त्यामुळेच जागतिक पर्यावरण दिन एखादा सण साजरा करावा तसा परंपरेनं साजरा केला जातो. परिणामी त्यातून जे घडायला हवं ते काहीच घडत नाही. उलट पृथ्वीचं फुप्फुस अशी ख्याती असलेलं अमेझॉनचं सदाहरीत जंगल वारंवार आगीच्या भक्षस्थानी पडतंय. भारतासारख्या देशात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो लोक मरतायत आणि अब्जावधी रुपयांचं नुकसान होतंय. नेमका ऋतू कोणता हा प्रश्न एका क्षणी पडावा, तर दुसऱ्या क्षणी त्याचे अतिरेकी रुप पाहून भीतीने गाळण उडावी, अशी ऋतूंची दहशत जगभर पसरत चालली आहे. तरी देखील आपल्याला जाग येत नाही. पाण्याकडे घोडा आकर्षित होत नाही. कारण तहान लागल्यावर विहिर खोदू ही आपल्या जगण्याची रीत बनली आहे. पर्यावरणाच्या बाबततीत तर तहान लागून घशाला कोरड पडली आहे, तरी देखील विहिर खोदायला आपण घेतली नाही.

अशा पार्श्वभूमीवर अतुल देऊळगावकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं. कारण हे पुस्तक या रितीला, पर्यावरणाप्रती माणसाने बाळगलेल्या कोडगेपणाला छेद द्यायला भाग पाडणारं आहे. वाचकाला ते केवळ पाणवठ्यापर्यंत घेऊन जात नाही, तर हीच संधी आहे पाणी पिण्याची, नसता सर्वनाश अटळ आहे याचं भान ते सतत देत राहतं. हे पुस्तक सुरू होतं ते ग्रेटा नावाच्या फुलपाखराने घडवलेल्या चक्रीवादळापासून आणि त्याचा शेवट आहे तो ग्रेटाचा वैचारिक प्रवास दाखवणारा, तिची वैशिष्ठ्ये सांगणारा. मात्र, या दोघांच्या मधला भाग हे केवळ ग्रेटाचं चरित्र राहत नाही, तर पर्यावरणाची, त्या संदर्भातल्या विविध प्रश्नांची सखोल आणि विश्लेषणात्मक तरीही वाचनीय अशी मांडणी अतुल देऊळगावकर करत राहतात.

ग्रेटा थुनबर्ग हे नाव गेल्या वर्षभरात, जगभरातल्या ज्यांना हवामान, पर्यावरण या विषयांची आस आहे, त्या सर्वांच्या तोंडी तर आहेच; पण त्याचबरोबर जगातल्या संवेदनक्षम अशा सर्व माणसांच्या तोंडी आहे. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे जगभरातल्या लाखो शाळकरी मुलांनी तिच्यापासून प्रेरणा घेतली आहे.

हे केवळ वर्षभरात घडले त्यामागे समाज माध्यमांची भूमिका आहेच, पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे या चिमुकलीने जगातल्या प्रबळ सत्तांना मनापासून तडफेने केलेले आवाहन आहे आणि पर्यावरणाच्या प्रश्नांची स्पष्टपणे करून दिलेली जाणीव आहे.

पर्यावरणाच्या जागतिक व्यासपीठावर एखाद्या शाळकरी मुलीला बोलावलं जातं आणि आपल्या भाषणातून जगातल्या सगळ्या नेत्यांना ती खडे बोल सुनावते हे दृश्य तसं दुर्मिळ पण महत्वाचं. एक तर पर्यावरणविषयक जागतिक व्यासपीठाला तिची दखल घ्यावीशी वाटली आणि त्या निमित्ताने जग ढवळून निघालं. पर्यावरण प्रश्नांची तीव्रता जगासमोर आली. समाजातले सर्व घटक आणि ज्यांचं भविष्यच काळवंडलेलं आहे अशी शाळकरी मुले या मुद्यावर एकत्र आली. त्यातून नवं असहकार आंदोलन सुरू झालं – आमच्या भविष्यासाठी शुक्रवार!

खरं तर ग्रेटाने पर्यावरणाचा हा लढा तिच्या एकटीच्या बळावर उभा केला. सुरुवातीला घरच्यांचा विरोध पत्करूनही ती स्वीडनच्या संसदेबाहेर धरणे धरून बसली. शाळेत न जाणे हा दंडनीय अपराध असतानासुद्धा ‘हवामानासाठी शाळा बंद’ अशी मोहीम तिने सुरू केली. कारण एकच, जगाचे लक्ष या मूलभूत प्रश्नाकडे वेधणे, हा लढा मानवाच्या अस्तित्वाचा लढा आहे हे भान जगाला, त्यातही जगातल्या विकसित राष्ट्रप्रमुखांना आणून देणं हा तिचा हेतू होता. त्यातून जगाला व्यापून टाकणारं असं आंदोलन उभं राहिलं.

ग्रेटा आणि तिच्या आंदोलनाचा पट मांडतानाच अतुल देऊळगावकर या पुस्तकाद्वारे पर्यावरणाच्या ऱ्हासाची जाग आणणारी भीषणता आपल्यासमोर मांडतात. विविध पुस्तकं, अभ्यास, अहवाल यांच्या संदर्भांनी सजलेल्या ‘मुलांच्या खांद्यावर कोणाचं ओझं’ या प्रकरणात एके ठिकाणी ते लिहितात, २०१८च्या ऑक्टोबर महिन्यात ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)’ चा विशेष अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात जग वाचवण्यासाठी केवळ १२ वर्षे बाकी आहेत असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. “भारत हे हवामानबदलामुळे परिणाम होणाऱ्या सर्वाधिक असुरक्षित राष्ट्रांपैकी एक आहे. आताच भारतातील काही भागात १.२ ते २ अंश सेल्सियसने तापमान वाढले आहे. त्याचा परिणाम म्हणून अवर्षण, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, महापूर, वादळ अशा संकटांना वारंवार सामोरं जावं लागेल. त्यातून सकल उत्पादनात १.५ टक्क्यांनी घट होईल आणि २०३० पर्यंत किमान ५ कोटी जनता दारिद्र्याकडे ढकलली जाईल. इतकंच नाही, तर उष्णतेच्या लाटा व समुद्रपातळीत वाढ ह्या धोक्याची टांगती तलवार भारतावर असणार आहे,” असंही हा अहवाल सांगतो.

अतुल देऊळगावकर असे संदर्भ जागोजागी पेरत ‘एका फुलपाखरामुळे चक्रीवादळ’, ‘शहरे मोटारींसाठी की माणसांसाठी?’, ‘मुंग्यांचे महाभारत’, ‘शिरजोर प्रदूषकशाही’, ‘संस्कृतीला झाला नफ्याचा उदर…’, ‘त्यांनी गिळावे सूर्यासी’, अशा सात प्रकरणांद्वारे पर्यावरणाशी संबंधित विविध प्रश्नांच्या मुळाशी आपल्याला घेऊन जातात. त्याचबरोबरीने विविध कंपन्यांची मुजोरी, विविध गोष्टींचं प्रयोजकत्व घेऊन समाजात उभी केली जाणारी खोटी प्रतिमा, पर्यावरणाचा नाश करून केली जाणारी नफेखोरी, सामाजिक कार्यामागचा दडलेला भेसूर चेहरा या सर्व बाबी ते उलगडून दाखवतात.

एका बाजूला पर्यावरणाचा विचार न करता नफेखोरीला वाव दिला जातो, तर त्याच्या परिणामातून विनाशाकडे निघालेल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी परिषदांवर परिषदा जागतिक पातळीवर भरवल्या जातात. अशा परिषदांमधून समोर येणारे निष्फळ निष्कर्ष मांडताना देऊळगावकर हवामान बदल, पर्यावरणाचा ऱ्हास याकडे माणूस किती तुच्छतेने बघतो हे जागोजागी अधोरेखित करत राहतात. त्यामुळे आपल्या समोर काय भविष्य वाढून ठेवलं आहे याची जाणीव या पुस्तकाचं प्रत्येक पान आपल्याला करून देतं.

सध्या प्रत्येक प्रश्नावर राष्ट्रा-राष्ट्रांत परस्परांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू आहे. जो तो एकमेकांना शह देत पर्यावरण प्रश्नांवर हात वर करतो आहे. या खेळात कोणी तेलाचे भाव पाडत आहेत, तर कोणी प्रायोजकासाठी खेळ खेळत आहे. पर्यावरणाची नासाडी करणाऱ्या कंपन्या प्रायोजकत्व स्वीकारून स्वतःची सकारात्मक प्रतिमा जगासमोर ठेवत आहेत. त्यातून प्रचंड पैसा निर्माण केला जातो आणि तो चैनीसाठी वापरला जातो, हे आजच्या जगाचं वैशिष्ट्य बनलं आहे.

अशा पार्श्वभूमीवर ‘संपूर्ण मानवजातीकरता पृथ्वी हा एकमेव ग्रह उपलब्ध आहे. ह्या पृथ्वीला जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे’ ही जाणीव करून देण्याकरता २२ एप्रिल १९७० ला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला गेला. याच उद्देशांकरता ५ जून १९७४ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’, ९ ऑगष्ट १९९२ रोजी ‘स्थानिक जनतेचा म्हणजे आदिवासींचा हक्क दिन’, २२ मार्च १९९३ ला ‘जल दिन’ आणि २२ मे २००२ रोजी ‘जागतिक जैवविविधता दिन’, असे अनेक दिन अस्तित्वात आणले गेले.

वास्तविक पाहता असे सार्वजनिक दिन प्रतिकात्मक असतात. आपली हरवलेली सजगता जागी व्हावी, बोथट झालेल्या जाणिवांना धार चढावी, अधाशीपणे जगण्यात हरपून गेलेल्या माणसाला भोवतालचं भान यावं म्हणून अशा दिनांचं एक वेगळं महत्व मानवाच्या आयुष्यात आहे. पण तेही लक्षात न घेता आपण अक्षेप येऊ नये म्हणून पूर्तता करणे, उरकून टाकणे, कागदी मेळ दाखवणे, प्रदर्शनीय इव्हेंट करणे या पातळीवर तो साजरा करतो. पण तो अधिक अर्थपूर्ण व पुढील टप्पा गाठण्याकरता कल्पकपणे साजरा केला जाऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन जगातील बालके रस्त्यावर उतरत आहे. सरकारच्या विरोधात न्यायालयाची दारेही ठोठावत आहेत. शक्य तितक्या प्रयत्नांची पराकष्टा करून विनवत आहेत की,

“आपल्या घराच्या भिंती पडू लागल्या आहेत. त्या सावरायला आधी सुरूवात कोण करणार, या प्रश्नावर काथ्याकूट करणे व्यर्थ व अक्षम्य आहे. आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही तुमच्या मुलांचा व नातवंडांचा विचार करून मत द्या. मानवजात व जीवसृष्टी लुप्त होण्याच्या मार्गावर असताना पैसा व सर्वकाळ होणाऱ्या आर्थिक विकासाच्या परिकथा सांगणाऱ्यांना धडा शिकवा. त्यासाठी वैज्ञानिकांच्या इशाऱ्याकडे आणि भविष्यासाठी लढणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करू नका. आजूनही काही पर्यावरण शिल्लक आहे. तेव्हा शेवटचे झाड तुटेपर्यंत, प्रत्येक थेंब विषारी होईपर्यंत आणि श्वास गुदमरेपर्यंत सवड आहे. त्याआधी काही पावलं उचला.”

प्रलयकारी घटना घडेपर्यंत आपल्याला निसर्गाची हाक ऐकायला येत नाही, पण शास्त्रज्ञ आणि आता जगभरातली मुलं ग्रेटा थुनबर्गच्या बरोबर ओरडून सांगत आहेत. त्यांची किंचाळी तरी ऐका आणि कृती करा, असं सांगणारं हे पुस्तक नवी दृष्टी देईल आणि पर्यावरणाच्या अंगाने जगण्याकडे बघायला शिकवेल. त्यासाठी तरी ते वाचा.
-समर निंबाळकर
aksharsamwad@gmail.com
पुस्तकाचे नाव: ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना
लेखक: तुल देऊळगावकर
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन
पृष्ठ संख्या: २०८, मूल्य: २५० रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *