जीवघेण्या संकटातही वासनांध व्यक्ती स्त्रीच्या असहय्यतेचा फायदा उठवायला मागेपुढे पाहात नाही. याचा प्रत्यय आपल्याला सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही समोर येणाऱ्या बलात्काराच्या घटनांमधून येतो आहे. समाजात वावरणारा बलात्कारी वेताळ कधी, कुठे आणि कोणत्या रुपात समोर येईल काही सांगता येत नाही. जणू तो प्रत्येक मुलीच्या, महिलेच्या वाटेवर दबा धरून बसलेलाच असतो. त्यातूनच तो काहीजणींची हमखास शिकार करतो. त्यामुळे असंख्य कंगोरे घेऊन बलात्काराच्या घटना सुट्या सुट्या पण सातत्याने घडत राहातात. कोणाला या गुन्ह्यासाठी फासावर चढवलं काय किंवा कोणाचा थेट एन्काऊंटर केला काय या सातत्यात कधी खंड पडत नाही. अशा पार्श्वभूमीवर मुक्ता मनोहर यांचं ‘नग्नसत्य…बलात्काराच्या वास्तवाचा अंतवेर्ध’ हे पुस्तक नुकतंच वाचून काढलं. तेव्हा कळलं की, स्थळ-काळाच्या सीमा ओलांडून व्यापून उरलेल्या या समस्येचा आवाकाच किती प्रचंड आहे. पण तो सुट्या सुट्या प्रकरणातून आपल्या ध्यानात येत नाही. मात्र, बलात्काराची जी कीड समाजाला लागलेली आहे तिचं अत्यंत व्यापक आणि समग्र दर्शन मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक घडवतं. त्याविषयी…
रोजंदारीवर पोट भरणारं एक कुटुंब लॉकडाऊनमुळे शहरात अडकून पडलं. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही. दोन लेकरांसह जगायचं कसं? या विवंचनेत ते घराबाहेर पडलं आणि आपल्या गावी ते पायी निघालं. अकोला जिल्ह्यातल्या कुठल्याशा गावात त्यांना पोहोचायचं होतं. घराच्या ओढीनं मजल दरमजल करत निघालेल्या या कुटुंबाला रस्त्यात एक व्यक्ती भेटते. तुमची अकोल्यापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे. गाडी पुढे उभी आहे, तुम्ही या, असं सांगत ती व्यक्ती आपल्या बरोबर त्या कुटुंबातल्या एका अल्पवयीन मुलीला बरोबर घेऊन जाते. २७० किलोमीटर दूर नेऊन त्या मुलीवर अत्याचार करते आणि तिला तिथेच टाकून पसार होते…
लॉकडाऊनमुळे घरातच बसून राहाणारा बाप मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार करतो. त्यात मुलीची आई आपल्या नवऱ्याला मदत करते. मुलगी मोठ्या हिंमतीने आईबापाच्या तावडीतून स्वतःची सुटका करवून घेते आणि पोलिसात तक्रर देते. म्हणून हे प्रकरण उजेडात येतं…
जयपूरमध्ये अडकलेली एक महिला घरदार नसल्याने रस्त्यावर फिरत राहते. पोलीस तिची चौकशी करतात आणि एका शाळेत तिची राहाण्याची व्यवस्था करतात. तिथं तिच्यावर तिघांकडून बलात्कार होतो… याच पद्धतीने लॉकडाऊन काळातल्या सुनसानतेचा गैरफायदा घेत एका अंध महिलेलाही पुरुषी वासनेचं शिकार बनवलं गेलं…
या काही प्रातिनिधीक घटना आहेत लॉकडाऊन काळातल्या. अशा अनेक घटना मागील दोन-अडीच महिन्यात घडल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जीवघेण्या संकटाचा सामना आज प्रत्येक माणूस करतो आहे. या लढाईत जगभरात मरण पावलेल्यांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. असं असताना बलात्काराच्या एका मागे एक अशा घटना समोर याव्यात याला काय म्हणावं?
याला चंगळवादाचा विकृत आविष्कार म्हणता येईल…, सत्तेचा माज म्हणता येईल…, पौरुषत्त्व दाखवण्याची भेकड कृती म्हणता येईल…, नडलेल्या, आडलेल्यांना आधार देण्याचं सोंग म्हणता येईल…, भांडवली, सरंजामी वर्चस्व गाजवणारी वृत्ती म्हणता येईल… कारण व्यापक सामाजिक संदर्भात बलात्कार या प्रश्नाची मांडणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला असल्याचा दावा करणाऱ्या लेखिका मुक्ता मनोहर आपल्या मनोगतात म्हणतात, “स्त्रियाच पुरुषांना मोहात पाडतात किंवा केवळ पुरुषी विकृतीतून बलात्कार होतात हे खरे नाही. टोळीवाद, गणवाद, जातवाद, धर्मवाद, देशवाद, बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद, जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी हे सगळेच बलात्काराचे खास दोस्त आहेत.” त्यांचं हे मत पुस्तकाच्या पानोपानी येणारे संदर्भ, माहितीचे तपशील खरे ठरवतात. इतकंच नाही, तर बलात्काराचा इतिहासही माणसाच्या इतिहासाइतकाच पुरातन, जुना आहे हे लक्षात येतं. माणूस जसा उत्क्रांत होत गेला तसा बलात्कारही अनेक कंगोरे घेऊन पुढे येत राहिला. म्हणूनच सगळ्या काळाला पुरून तो अनेकविधी रुपांमध्ये उरलाय हे पुस्तक वाचत असताना सतत जणवत राहतं.
मोठमोठ्या शहरांमधले चकाकते रस्ते, त्यावरून धावणाऱ्या अत्याधुनिक मोटारगाड्या, अशा शहरांच्या रक्तवाहिन्या बनून सळाळता वेगवान प्रवासाचा अनुभव देणारी मेट्रो, एकाच छताखाली सारं विश्व वसवणारे मॉल्स, आयटी कंपन्यांचे चकाकते टॉवर असं सारं दाखवत विकासाचं एक भव्यदिव्य चित्र रंगवलं जातं. पण डोळे दिपवणाऱ्या या चित्रात भयंकर असा चंगळवाद फोफावतो आणि तो बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्यातून प्रकटत राहतो. बंगरूळूची प्रतिभा मूर्ती बलात्कार केस, पुण्यातल्या ज्योतिकुमारी चौधरी, नयना पुजारी बलात्कार केसेस, गुडगाव, दिल्लीतली काही प्रकरणे ही त्याची उदाहरणे. अशी उदाहरणं देत वेताळ पंचवीशीच्या रुपात ही कहाणी सुरू होते.
आयटी हब म्हणून ओळख मिरवणारं बंगळूरू असो की पुणे, मोठ्या विश्वासानं अनेक मुली आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न घेऊन या शहरात येतात. परंतु चंगळवादात बुडालेली ही शहरं अशा मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, संपवतात हे प्रतिभा, ज्योती, नयना यांच्या रुपानं आपल्या समोर येत राहातं. अशाच केसेसमधून गुडगाव हे गुंडांचं शहर म्हणून जसं समोर येतं तसंच दिल्ली देशाची ‘रेप कॅपिटल’ म्हणून पुढे येतं. अशा मोठ्या शहरांमधून वारंवार घडणाऱ्या गँगरेपच्या घटनांची एक मालिकाच बलात्कारी वेताळ या पुस्तकात आपल्यासमोर मांडतो. तो नुसता घटनाक्रम सांगत नाही, तर त्या घटनेमागचे व्यापक असे सामाजिक संदर्भही देत राहतो.
यातून शहरी विकासाच्या रंगीत चित्रामागचं एक भयकारी नग्नसत्य जसं समोर येतं तसंच ते रक्षकातल्या भक्षकाचंही दर्शन हे पुस्तक घडवतं. त्यासाठी बलात्कारी वेताळ पोलिसांकडून केल्या गेलेल्या अत्याचाराच्या एकेक गोष्टी सामाजिक संदर्भासह सांगतो. दलित, गरीब, आदिवासी, पीडित अशा मुली-महिलांना हेरून पोलीस आपल्या वासना भागवतात. मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या कोठडीत कोवळ्या मुलीवर सुनील मोरे याने केलेला बलात्कार, भंगार वेचणाऱ्या पंधरा वर्षाच्या मुलीला सहार विमानतळाच्या परिसरात गाठून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा चंद्रकांत पवार, त्याचप्रमाणे चंद्रपूरची मथुरा, हैदराबादची रमीझाबी यांच्यावर झालेला गँगरेप अशा काही उदाहरणांमधून खाकी वर्दीतल्या भक्षकांचा गुन्हेगारी चेहरा समोर येतो. पण जेव्हा ही प्रकरणे कोर्टासमोर येतात तेव्हा तर अतिशय संतापजनक घटना घडत राहातात. अशा पीडित महिलांकडे वेश्या म्हणून पाहिलं जातं आणि वेश्येशी संग करायला तिच्या संमतीची गरजच काय अशा स्वरूपाच्या चर्चा कोर्टापुढे निर्ढावल्यागत झडू लागतात. अशी प्रकरणं पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थादेखील कशी अत्यंत असंवेदनशीलतेने हताळतात याचंही वर्णन या कहाणीतून पुढे येत राहतं.
पुस्तकात पुढे राजस्थानमध्ये भवरीदेवी प्रकरणापासून गुजरातमधल्या दंगलीत, बोस्नीया, रवांडा इथल्या यादवीत आणि पहिल्या तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेल्या बलात्कारांचेही भयावह तपशील येतात. ते नुसते येत नाहीत, तर टोळीवाद, गणवाद, जातवाद, धर्मवाद, देशवाद, बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद, जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती, युद्धखोरी आणि या साऱ्यातून बळावत जाणारी वंशविच्छेदनाची भावना ही सारी बलात्काराची मुळं आहेत अशा संदर्भासह हे सारे तपशील येत राहातात.
खरं तर व्यापक सामाजिक संदर्भासह एक एक घटना सांगताना ती अधिक भडक किंवा अति हळवी होण्याचा धोका होता. तो मुखपृष्ठापासून टाळला आहे. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ असून त्याद्वारे त्यांनी अश्लिलतेला थारा न देता विषयाचा आशय भेदकपणे मांडला आहे. त्याचप्रमाणे वेताळ पंचवीशीचा कूट परंपरेतला फॉर्म हाताळत लेखिकेने हा अत्यंत संवेदनशील, नाजूक आणि तितकाचं गंभीर विषय वाचकांसमोर ठेवला आहे. थोडक्यात सांगायचं तर, लेखिका बलात्कारी वेताळाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडते आणि एका स्मशानात तिचा हा शोध पूर्ण होतो. तिथे ती त्याला प्रश्न विचारते आणि तो त्याची उत्तरे देताना एक एक घटना आणि त्याचे सामाजिक संदर्भासह तपशील देत उलट प्रश्न विचारतो. असा हा सलग २५ रात्रींमध्ये झालेला संवाद म्हणजेच हे पुस्तक होय.
१९९१ ते १९९५ या पाच वर्षांत बोस्नियात ५० हजार बलात्कार झाले. गुजरातमध्ये तर याचा हिशेबच लागला नाही. रवांडामध्ये १०० दिवसांच्या यादवीत पाच लाख बलात्कार झाले. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी त्यांच्या सैनिकांना अधिकृतपणे कम्फर्ट वुमन पुरवल्या होत्या. त्यात ११ वर्षांच्या कोवळ्या मुलीही होत्या! बांग्लादेश स्वातंत्र्य युद्धात झालेल्या बलात्कारांमधून गरोदर राहिलेल्या महिलांची संख्या २५ हजार होती. असे अनेक तपशील या पुस्तकात दिले आहेत आणि ते वाचताना आपण हादरून जातो.
कोणत्या जगात आपण राहातो आहोत असा प्रश्न पडतो, इतकी भीषणता या प्रश्नात आहे. त्याची जाणीव करून देणारं हे पुस्तक प्रत्येकाने पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. त्याचं पहिलं कारण या पुस्तकाच्या निमित्ताने बायकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या पुरुषी हत्याराचं हे अनादी रूप मराठीत प्रथमच आणलं गेलं आहे. दुसरं कारण पुस्तकाच्या लेखिका मुक्ता मनोहर या पुरोगामी, डाव्या चळवळीतल्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यकर्त्या आहेत. तरी देखील हा विषय चळवळीच्या अंगानं न माडता त्यांनी या पुस्तकाद्वारे एक वेगळा प्रयोग आपल्यापुढे ठेवला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं दाहक वास्तव सौम्य पद्धतीने मांडलं गेलं आहे. पण तरीही त्यातलं गांभीर्य कमी झालेलं नाही. ही कहाणी अत्याचार टाळण्यासाठी काय करावं किंवा अत्याचार झाल्यानंतर न्यायासाठी काय केलं पाहिजे हे सांगत नाही. परंतु जातीयवाद, वंशवाद, बाजारीकरण, टोळीवाद, धर्मवाद, दहशतवाद आणि युद्ध ही सारी दमनाची हत्यारं आहेत. यातून अमानवी हिंसक पार्श्वभूमी तयार होते आणि बलात्कार हा अशा दमनाच्या यंत्रणांना घेऊनच फोफावत राहतो याचं व्यापक दर्शन हे पुस्तक आपल्याला घडवतं.
aksharsamwad@gmail.com
पुस्तकाचे नाव: नग्नसत्य -बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध
लेखिका: मुक्ता मनोहर
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे: ३२० मूल्य: ३००