राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा दस्तऐवज ठरावीत अशी ‘पायपीट समाजवादासाठी’ – पन्नालाल सुराणा, ‘लढे आणि तिढे’ – पुष्पा भावे आणि ‘फकिरीचे वैभव’ – विजय यशवंत विल्हेकर ही तीन आत्मकथनं मनोविकास प्रकाशनाकडून सप्टेबर २०२० मध्ये वाचकांच्या हाती सोपवली जात आहेत. त्यानिमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांच्या ‘लढे आणि तिढे – चिकित्सक गप्पा… पुष्पाबाईंशी’ या मुलाखत स्वरुपाच्या आत्मकथनातील स्त्रीवादाविषयीचा हा संपादित अंश…
गेल्या 15-20 वर्षांत स्त्री-पुरुष नातं बदललंय, बदलतंय. तुम्हाला काय दिसतं?
-एकीकडे पुरुष घरकामात, मुलांना सांभाळण्यात सहभागी होत आहेत, हे चांगलं आहे. तरी हिंसा, अल्पवयीन मुलगे मुलींवर करत असलेले लैंगिक अत्याचार हा काळजीचा विषय आहे. बलात्कारासोबत विकृत हिंसा आली आहे. नात्यांचं गृहीतकृत्य शिल्लक राहिलेलं नाही. नात्यातलेच पुरुष मुलींवर अत्याचार करतात, याची चिंता वाटते. सेक्सच्या दृष्टीने मुलं-मुली 13-14 व्या वर्षापासून जागरुक होतात, पण लग्न व्हायला तिशी उजाडते. नात्याचं सौंदर्य समजायच्या आतच त्यांच्याकडून असं विपरीत घडतं. हे गुन्हे रतिप्रेरणेतून नाही, स्त्रियांविषयीच्या असूयेतून घडतात. मित्राबरोबर बाहेर गेलेल्या मुलीवर हल्ले होणं, हे काय आहे? मुलींना मित्रसुद्धा आहेत, हे सहन होत नाही. मुलगे-मुली एकमेकांना सहजपणे भेटतील, अशा जागा, संधी उपलब्ध होत नाहीत. त्या निर्माण करणं गरजेचं आहे. पुरुष गोंधळलेले दिसतात. पुरुषांना त्यांच्या रतिप्रेरणेबद्दलही पुरेसं कळतंय, असं नाही. त्यांना त्यांची पुरुष प्रतिमा हिंसेतूनच व्यक्त होते, असं वाटतंय का? बाई आहे म्हणून सूड, स्पर्धेची भावना, असं दिसतं. वस्तूंचा हव्यास, लालसा यातून हे येतं का? सुख ओरबाडून घेणं यात आत्मसन्मान नाही, हे कळत नाही का?
पुरुष गोंधळलेले आहेत, तशाच स्त्रियाही समतेविषयी गोंधळलेल्या दिसतात. पुरुषांसारखा फेटा घालणं, तलवार घेऊन फोटो काढणं हे काय आहे? ही पुरुषी प्रतीकं हवी आहेत का स्त्रियांना? स्त्रीवाद दृश्यमान झाला तेव्हापासून सगळे राजकीय पक्षही अशीच प्रतीकं वापरायला लागले आहेत. दुर्गा, शक्ती अशा शब्दांत स्त्रीचं वर्णन करणं, हे जाणूनबुजून केलं जातं. धर्माचा वापरही खुबीने केला जातो. मुस्लिम पुरुषाला शत्रू किंवा खलनायक म्हणून उभं करण्यासाठी त्यांच्या स्त्रियांना सहानुभूती दाखवली जाते.
अशा वातावरणातही बोलत राहिलं पाहिजे. स्त्री चळवळीतला स्त्री-पुरुष संवाद सुरू राहिला पाहिजे. संततीनियमनाचे मार्ग कोणते यांसारख्या विषयांची मोकळी चर्चा सुरू झाली पाहिजे. कारण बाईच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीराला तिच्या नवऱ्यानेही स्पर्श करायला नको. युद्ध, राजकारण यातल्या मॅस्क्युलॅनिटीबद्दल बोलत राहिलं पाहिजे. खरं तर, याचसाठी empowerment या शब्दाला माझा विरोध आहे. कारण त्यात power चा सेन्स जाणवतो. कुणीच कुणावर आरूढ व्हायला नको. निर्मळपणे एकत्र जगायला शिकणं, नातं निरामय होणं हेच कुटुंबाला, समाजालाही सुखकारक आहे. स्त्री तत्त्वज्ञान हेच सांगतं. त्यामुळे ते समाजविरोधी वगैरे नाही.
कुठलीही विद्याशाखा असेल, तर काही काळानंतर त्यातल्या विचारांची पुनर्मांडणी करावी लागते, असं तुम्ही नेहमी आग्रहाने म्हणता…
-हे करत राहावंच लागतं. तुम्ही जर प्रवाही राहिला नाहीत तर तुम्ही पूर्वी कधी तरी मान्य केलेले, लोकांना अगोदरच सांगितलेले सिद्धांत परत परत बोलत राहाता. त्या अर्थाने तुमचं त्या सिद्धान्तांशी असेल किंवा विषयांशी, जिवंत नातं नाही राहात. तात्त्विक बाजूने तर हे फारच खरं असतं की, केवळ तुम्ही एका टप्प्यावर अडकून राहून चालत नाही. कुठलाही विषय, ज्याला आपण विद्यापीठाच्या भाषेत ‘डिसिप्लिन’ (discipline) म्हणतो, त्याचा विचार दोन पद्धतीने करावा लागतो. एक, ज्ञानाच्या सिस्टिम्स (systems)) बदलत असतात आणि दोन, आसपासची परिस्थिती बदलते, त्याबरोबर नवे प्रश्न निर्माण होतात त्या विषयामध्ये. त्या नवीन प्रश्नांना सामोरं जायला तुम्हाला काही वेळा नवीन पद्धतीशास्त्र शोधावं लागतं. त्यामुळे ज्याला आपण ‘डायनॅमिक्स’ (dynamics) म्हणतो, ते प्रत्येक विषयाचं आणि प्रत्येक पद्धतीशास्त्राचं असतं.
स्त्रियांना पुरुषसत्तेने जे शिकवलं, ते त्यांनी आत्मसात केलंय. आता ते विसरण्याची गरज आहे; पण ते विसरायला अजूनही वेळ लागतो. प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आहे. ‘कमला’ नाटकात विजय तेंडुलकर काही काही गोष्टी फार बारकाईने सांगतात. नाटकात कमला नावाची कोल्हापूरहून आणलेली मोलकरीण आहे आणि त्या पत्रकाराची बायको सरिता आहे. दोघींच्या पातळीत फरक कसा दाखवलाय बघ. सरिता कोणत्या पातळीवर आहे? घरात पुरुष जेवायला असेल, तरच ती करंडीतले हापूस आंबे, फ्रिजमधून फ्लॉवर काढते. ही तिने आत्मसात केलेली गोष्ट आहे की, पुरुषाला चांगलं खायला घालायचं आणि हेही तिने आत्मसात केलेलं आहे की, पुरुष नसतील तर बायकांना काय घरातलं काहीही चालतं. यातून बाहेर यायला सरिताला वेळ लागणार आहे. आणि कमला? ती अशा पातळीवर आहे की, स्वत:ला विकत घेतलं गेलंय ते बरोबरच आहे असं तिला वाटतं. पुरुषाच्या फायद्याचा व्यवहार व्हायला हवा, ही कमलाने आत्मसात केलेली गोष्ट आहे.
दोघी जणू गुलामीच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर आहेत; पण दोघींनी ते ते आत्मसात केलेलं आहे. त्यामुळे नाटकातला सर्वात महत्त्वाचा भाग नाटकाचा शेवट नाहीये; तर कमला आणि सरिताचं संभाषण आहे. एक अतिशय सुशिक्षित असलेली बाई आणि एक विकत आणलेली बाई. दोघींचं स्त्रीत्वाचं आकलन त्यातून दिसतं. आणखी एक दाखवतात तेंडुलकर. घरात नेहमी काहीसा पुरुषी घमेंडखोर असणारा ‘तो पत्रकार’ स्वत:च्या कामाच्या ठिकाणच्या मालकापुढे नोकर म्हणून एकदम गलितगात्र झालेला आहे! आणि आता हाच माणूस घरात रात्री पत्नीचा मालक असतो. इथेही मालक-गुलाम संबंधच आहेत. हे समजून घेण्यासारखं आहे.
आज अनेक मुली बघताना प्रश्न पडतो की, आपण गोलाकार फिरून परत मागे गेलो आहोत का? त्यांना दोन-तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांसह केलेलं लग्न छान वाटतं. त्या म्हणतात, आम्हाला लग्न झाल्यासारखं (romantic) वाटलं आणि तुमचं ते ‘सही’चं लग्न (नोंदणी पद्धतीने) हे लग्न झाल्यासारखंच वाटत नाही. हे कोणी शिकवलं त्यांना? एक तर माध्यमांनी शिकवलं, घरातल्या-बाहेरच्या वातावरणाने आणि बाजारपेठेने शिकवलं. आता हे त्यांच्या कुठे न कुठे तरी लक्षात आणून दिलंच पाहिजे आणि हे काम नियतकालिकांचं, माध्यमांचं आहे खरं तर!
मी तुला सांगते, मी अनेक बायकांशी बोललेय. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. सुस्थित, सुशिक्षित, स्वत:चं व्यक्तित्व असणाऱ्या बायका. जर नवरा आपल्याला मारतो तर आपलं नक्कीच काही तरी चुकत असणार, याच अपराध-भावनेतून त्या सगळ्या प्रश्नाकडे बघतात आणि आपण एखाद्या जखमी बाईला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तर ‘कुछ तो वजह होगी’ असं पोलीस विचारणार. कायद्याचंही जेंडरिंग करणं आवश्यक आहे. मी सांगते ती ही परिदृष्टी.
आता आई-मुलीच्या नात्याचंच बघ. आई-मुलीच्याही नात्याचे प्रश्न आहेत. किचकट आहेत ते प्रश्न. कारण आईने आत्मसात केलेल्या काही गोष्टी आहेत. त्या चष्म्यातून ती बघते आणि तिची आपल्या मुलीकडून तशीच अपेक्षा आहे. तर मुलगी माध्यमातून किंवा समवयीन गटातून तिने जे आत्मसात केलं आहे, त्या चष्म्यातून बघत असते. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. असा तो गुंता आहे सगळा.
म्हणून मी म्हणते की, जागतिकीकरण झाल्यावर आम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करणं भाग आहे. आता सौंदर्यप्रसाधन कंपन्या 8 मार्च साजरा करतात. मात्र, आम्हाला मिरवणूक काढायला परवानगी नाही आणि शासन आझाद मैदानाच्या पलीकडे जायला देत नाही म्हणून आम्ही आपआपल्या छोट्या छोट्या समुदायांमध्ये चर्चा करत बसतो. हे जे बदल घडवून आणले जातायत त्याचं विश्लेषण करण्याची शक्ती आपल्याजवळ पाहिजे. स्त्री प्रश्न इतके जटिल आहेत. स्त्री अभ्यास ते समजून घ्यायला मदत करतो. कारण जिचे प्रश्न आहेत तिला नेहमीच ते समजलेले असतात असं मला नाही वाटत. ती त्या प्रश्नातून जात असते, पण तिला ते समजलेले असतातच असं नाही. प्रश्न समोर आल्यावर तो किती गुंतागुंतीचा आहे हे समजायला तुमचा अभ्यासच तुम्हाला मदत करतो. समाजात काही लोक समजावून घेतात आणि काही लोक इतरांना समजावून सांगतात. या प्रक्रियेतही तुमचा अभ्यास असला की, तुम्हाला समजावून सांगणं सोपं जातं. मी जर रमाबाई रानड्यांचं आत्मचरित्र वाचलेलं असलं, तर माध्यमातल्या रमाबाई रानडे पाहताना मला धक्का बसतो. त्या काळाचा विचार करता आजारी रमाबाई खोलीच्या मध्यभागी झोपणं ही शक्य गोष्ट नाही. त्या काळी आजारी बाई स्वत:ला अपराधी वाटून कोपऱ्यातच लपत असे. त्या काळात आजारपण लपवण्याची आणि बाळंतपण ही केवळ काळोखात उरकण्याची गोष्ट. मालिकेत ती भिंतीजवळ असते आणि तिच्या आसपास एवढे पुरुष बागडत असतात, ही शक्यताच नाही. त्यामुळे केवळ तुम्ही त्या काळानुरूप भांडी आणि दागिने घेतले आणि तो काळ मांडला असं होत नाही. तो काळ खरोखर मांडायचाय म्हणून हे दाखवलं जातंय की, भांडी आणि दागिने ह्याच्यात स्वारस्य आहे म्हणून? याचा विचार आपण प्रेक्षक म्हणून करायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी रोज होताहेत आता. तुमच्या लक्षात येईल की, जुन्या कपड्यांमधलं जुन्या वातावरणातलं एकत्र कुटुंब दाखवताना अनेक गोष्टी लपवल्या जातात. रमाबाईंच्या आत्मचरित्रामध्ये इतक्या वेदना आहेत! त्या मालिकेमध्ये नाही आल्या. म्हणजे त्या नाही आल्या की, त्या दाखवायच्याच नव्हत्या असा प्रश्न पडतो. असं प्रत्येक बाबतीत होत राहातं. त्याचा आपण विचार केला पाहिजे.
स्त्रियांनी खूप लिहिलं. तिचं साहित्य निर्माण झालं; पण ती लिहिणारी, व्यक्त होणारी बाई स्वत:च्या दु:खाकडे मानवजन्माची दशा, जगण्याचा ताप (human predicament) म्हणून बघते की, ते वैयक्तिक, खासगी माझ्याच वाट्याला आलेलं दु:ख म्हणून बघते याचाही विचार करणं आवश्यक ठरतं. तुम्ही जेव्हा ते मानवी तापाशी निगडित करता तेव्हा तुम्ही इतरांशी अधिक संवाद साधू शकता. त्यामुळे या दृष्टीने तुम्ही पुस्तकं वाचत गेलात तर तुम्हाला वेगळ्या गोष्टी दिसतात.
किंवा अमुक बाई अमुक का बोलते आणि अमुक का लपवते, याचीही चिकित्सा करण्याजोगी असते. त्यातून तुम्हाला खूप गोष्टी कळतात. यासाठी स्त्रीवादी वाचन करणं आपण शिकलं पाहिजे. स्त्रीवादी वाचन म्हणजे केवळ सतत स्त्रियांवरचा अन्याय शोधत जाणं असं नाहीये, तर काय बोललं जातं आणि काय नाही याचं विश्लेषण करणं.
सुलोचनाबाईंची मुलगी कांचन घाणेकर तिच्या आत्मचरित्रात, काशिनाथला कसा मुलगा झालेला होता, हे आवर्जून सांगते. त्याचं खरं-खोटं मला करायचं नाही; पण तिने ज्या पद्धतीने ते मांडलंय, त्यावरून ही बाई त्या सगळ्या पुरुषी कल्पना आत्मसात करून लिहितेय, कसा होता त्याला मुलगा, असं आपल्याला सांगतेय हे लक्षात येतं. काशीनाथला स्वत:ला आपल्याला पुरुष असून मूल नाही ह्याची भयंकर खंत होती. याविषयी तो वेगवेगळ्या ठिकाणी बोलत असे.
सुनीताबाई देशपांडेंसारखी बाई मला मूल होणार होतं… असं जेव्हा आपल्याला मुद्दाम सांगायचा प्रयत्न करते, त्या वेळेला मूल होणं या भावनेभोवतीची चौकट अधिक घट्ट होते. असं जर आपल्याला वाचता आलं, तर स्त्रीवादी वाचनाला अर्थ आहे. असं पुरुषांनी लिहिलेल्या पुस्तकांचंही स्त्रीवादी वाचन, विवेचन करता येईल. तसं केलं पाहिजे. अमेरिकेत ‘ओल्ड मॅन अँड द सी’ (Old man and the Sea) चं तशा प्रकारे विश्लेषण झालं आहे.
अमेरिकन ‘माचो’ (macho) म्हणजेच मर्दपणाच्या प्रतिमा त्या कादंबरीत आणि एकूणच हेमिंग्वेच्या साहित्यात कशा आल्यात याचं विश्लेषण अमेरिकन स्त्रियांनी प्रबंध लिहून केलेलं आहे. आपल्याकडे असे प्रबंध लिहिले जात नाहीत. मुली ज्या वेळेला एखाद्या प्रबंधाला किंवा प्रबंधिकेला विषय घेतात, ‘अमुक पुस्तकातील स्त्रिया’, ‘अमुक कादंबरीतल्या स्त्रिया’… तर त्यांना वाटतं की, त्या स्त्रियांचं वर्णन केलं की झालं पण ते पुरेसं नसतं. त्या स्त्रिया काय बोलतात, पुरुष त्यांच्याविषयी काय बोलतात, ते कुठल्या “camera eye’ मधून बघितलेलं आहे याचा विचार केला, तर ते स्त्रीवादी विवेचन होईल.