विधानपरिषदेत डॉ. परिणय फुके यांचा जोरदार हल्ला
मुंबई: राज्यात विशेषत: विदर्भात धान खरेदीतल्या प्रचंड भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी विधानपरिषदेचे सदस्य आणि माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी केली. भंडारा जिल्ह्याचे उदाहरण समोर ठेवत त्यांनी धान खरेदीतली विभागाची मनमानी, भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. सरकारातर्फे कृषी राज्यमंत्र्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. फुकेंनी आकडेवारीसह विषय मांडला, अखेर वेगळी बैठक घेवून विषयाची सखोल चर्चा करुन निर्णय घेण्याचे निर्देश सभापतींनी दिले. या निर्देशामुळे धान खरेदीतील अपप्रवृत्ती मुळासकट समोर येतील, अशी अपेक्षा आहे.
विधानपरिषदेतील प्रश्नोउत्तरात धान खरेदीच्या प्रश्नावर डॉ. परिणय फुके यांनी आकडेवारी सादर करत नेमके प्रश्न विचारले. भंडारा जिल्ह्याचे उदाहरण समोर ठेवत त्यांनी विषय मांडला. सरकारने जिल्ह्यात आतापर्यंत 26 लाख क्विंटल धान्य खरेदी केल्याचे मान्य केले, तो धागा पकडत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, खरेदी केलेला सर्व माल कोणत्या गोदामात ठेवण्यात आला आहे आणि जिल्ह्याची पूर्ण गोदाम क्षमता ही किती क्विंटलची आहे. तसेच खरेदी करण्यात आलेल्या एकूण 26 लाख क्विंटल पैकी किती धान्य हे ‘ए’ ग्रेड आणि ‘सी’ ग्रेड आहे, यापैकी किती मालाची मोजणी ही डिजिटली आणि हात काट्याने केली आहे. सरकारतर्फे यावर कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उत्तर दिले. कदम यांनी दावा केला की 26 लाख क्विंटल धान खरेदी केले ते गोडावून मध्ये सुरक्षित ठेवले आहे. याबाबत त्यांनी काही आकडेवारी समोर ठेवत गोड़ावून संख्या वाढवल्याचे नमूद केले. मात्र, या माहितीवर सभागृहातच असहमती व्यक्त करत डॉ. फुके यांनी वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिली. फुके यांनी स्पष्ट आरोप केला की सरकारकडे असलेली आकडेवारी ही दिशाभूल करणारी आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे बाहेरच्या राज्यातून आलेल्या सी ग्रेड धानाची खरेदी होत असून त्या माध्यमातून सुरु असलेला प्रचंड भ्रष्टाचार, यावर उच्चस्तरीय चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली.
भंडा-यासह संपुर्ण जिल्ह्यात 8 लाख क्विंटल पेक्षा जास्त साठवणूक करण्याची कुठेही क्षमता नाही, तरीही 26 लाख क्विंटल धान्यांची खरेदी करण्यात आल्याचा दावा कसा होऊ शकतो. 1 लाख क्विंटलचा डिओ देण्यात आलेला आहे, तर 25,39,319 क्विंटल माल हा उघड्यावर पडलेला आहे, हे ही डॉ. फुके यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणले. तसेच जवळपास 10 लाख क्विंटल माल यावेळेस अवकाळी पावसाने खराब झालेला आहे. आणखी ही जवळपास 25 लाख क्विंटलची खरेदी बाकी आहे आणि जुनी जी खरेदी करण्यात आली आहे त्यात जवळपास 100 कोटी रुपये 2 महिन्यांपासून थकित आहेत, ही वस्तुस्थितीही मांडली.
भंडारा जिल्ह्यात ‘ए’ ग्रेड धान्यांची निर्मिती होत असताना ही मोठ्या प्रमाणात ‘सी’ ग्रेड धान्य खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे ‘सी’ ग्रेड धान्य माल शेजारच्या राज्यांतून येते आणि ते येथील धान्य खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केले जाते. अशाप्रकारे धान्य खरेदीत मोठ्या प्रमाणात होणार्या या भ्रष्टाचारावर उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी माझी मागणी आहे. यावर कृषी राज्यमंत्र्यांनी विभागाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. माहिती पटलावर ठेवण्याचा मंत्र्यांचा प्रयत्नही फुके यांनी हाणून पाडला. फुके यांच्या आकडेवारीसह आक्रमकपणे केलेल्या हल्ल्यापुढे मंत्री हतप्रभ झाले. अखेर सभापतींनी मध्यस्थी करत वेगळी बैठक घेऊन सर्व प्रश्नांची सखोल चर्चा करुन निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला दिले.