पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन रापतवार यांची मागणी
रखडलेल्या बुट्टेनाथ साठवण तलाव मंजुरीसाठी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र द्यावे; वाण खोऱ्यातून वाहून गेलेल्या मोठ्या पाण्याची नाशिक कार्यालयाने नोंद घ्यावी
अंबाजोगाई: यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच गोदावरी खोऱ्यातील वाण उपखोऱ्यात मोठा दमदार पाऊस झाला. या खोऱ्यातील सर्व धरणे तुडुंब भरुन शेकडो दलघमी पाणी वाया गेले. या वाया गेलेल्या पाण्याची नोंद घेऊन गेली अनेकवर्षे पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी अडवणूक करणाऱ्या नाशिक येथील जलसंपदा विभाग कार्यालयाने बुट्टेनाथ साठवण तलावाच्या मंजुरीसाठी अडकवून ठेवलेले पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तातडीने देऊन या साठवण तलावाच्या उभारणीसाठी अडवून ठेवलेला रस्ता मोकळा करुन द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन रापतवार यांनी केली आहे.
दरम्यान, वाढत्या लोकसंख्येनुसार अंबाजोगाई शहराची तहान भागवण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती होणे ही काळाची गरजआहे. यासाठी विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी मतभेद विसरुन व्यापक जन आंदोलन करण्याची गरज असल्याचे ही सुदर्शन रापतवार यांनी म्हटले आहे.
या संदर्भात यांनी असे म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरातील दीड लाख लोकांची तहान भागवण्यासाठी शहर वासीयांच्यावतीने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडे गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी खोऱ्यातील वाण उपखोऱ्यातील वाण नदीवर साठवण तलाव बांधण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठीचा पहिला प्रस्ताव साधारणपणे २०१० साली राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला असून अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस अंदाजे २ किमी अंतरावरील नागनाथ मंदिराच्या वरील बाजूस वाण नदीवर २१५.१४ चौकिमी पाणलोट क्षेत्र दाखवण्यात आले असून हा साठवण तलाव निर्माण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या नियोजित साठवण तलाव स्थळी ५०% विश्वासहार्यतेने प्रकल्पस्थळी एकूण उपलब्ध येवा ५१.०४६ दलघमी दाखवण्यात आला असून साठवण तलावासाठी फक्त १४.५० दलघमी जलसंपत्तीचा वापर प्रस्तावित करण्यात आला आहे.
गोदावरी मंडळ कार्यालयानेही केली होती शिफारस:
या साठवण तलावाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी हा संपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाच्या एकमेव असलेल्या नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात या साठवण तलावाच्या ब्रहत आरखड्यासह अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाने औरंगाबाद येथील गोदावरी मंडळ पाटबंधारे कार्यालयाकडे व या कार्यालयाने गोमपावमि/तां-४/मगो/पाणी उपलब्धता/८२८ दि. २१/०१/२०१२ रोजी सादर करण्यात आला होता. सदरील प्रस्ताव या कार्यालयाने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठवला आहे, तो आजपर्यंत प्रलंबित आहे. किंबहुना वाण उपखोऱ्यातील पाणी उपलब्ध नसल्याचे सांगत संबंधित कार्यालयाने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र अद्दापही दिले नसल्यामुळे या साठवण तलावास मंजुरी मिळू शकली नाही.
तत्कालीन आ.पृथ्वीराज साठे यांनी मिळवली होती तत्वतः मान्यता:
मध्य गोदावरी खोऱ्यातील वाण उपखोऱ्यातील वाण नदिवरील या साठवण तलावास मंजुरी मिळण्यासाठी केज विधानसभा मतदार संघाच्या तत्कालीन आमदार तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री डॉ.सौ. विमल मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ.प्रा. सौ.संगीता ठोंबरे यांनी आजपर्यंत विशेष प्रयत्न केले आहेत. या प्रकल्पास राज्य शासनाकडून तत्वत: मान्यता मिळवून आणण्यात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना यश ही आले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात या साठवण तलावास शासन पत्र क्र. २०१०/१४५१/(८/२०१०) जसअ दि.३/०४/२०१३ अन्वये तत्वत: मान्यता मिळवल्याचे व जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि. २३/०७/२०१२ रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार पाणी उपलब्धते बाबत मंजुरी देण्यासंदर्भात आदेशीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही फक्त राजकीय खेळीच ठरली. याबाबत पुढील काळात ठाम अंमलबजावणीच होवू शकली नाही.
राव समितीचे निकष वापरा:
वरील सर्व संदर्भ लक्षात घेता व पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी १९६० पूर्वी केरळ राज्यातील डॉ.केरळ राव यांनी घालून दिलेल्या ७५% विश्वासार्हता ग्राह्य धरुन पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देण्याची चुकीची पध्दत कालबाह्य ठरवून प्रत्येक पाच वर्षात होणाऱ्या एका वर्षातील सर्वाधिक पावसाच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी अडकून पडलेल्या या बुट्टेनाथ साठवण तलावास तातडीने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देऊन या साठवण तलावास तातडीने मंजुरी देण्यात यावी व पुढील काळात वाण उपखोऱ्यातून वाहून जाणाऱ्या शेकडो दलघमी पाण्याची साठवणूक करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन रापतवार यांनी केली आहे.