मुंबई: राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र, गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.
पुणे जिल्ह्यात 317 ग्रामंपचायतीतील 503 जागांसाठी होणार पोट निवडणूक:
पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 65 जागा, भोर 71 ग्रामपंचायती 121 जागा, पुरंदर 16 ग्रा.पं.-27 जागा, दौंड 6 ग्रा.पं.-6 जागा, बारामती 10 ग्रा.पं.-13 जागा, इंदापूर 6 ग्रा.पं.-8 जागा, जुन्नर 31 ग्रा.पं.-55 जागा, आंबेगाव 33 ग्रा.पं.-55 जागा, खेड 36 ग्रा.पं.-49 जागा, शिरुर 8 ग्रा.पं.-12 जागा, मावळ 15 ग्रा.पं.-19 जागा, मुळशी 35 ग्रा.पं.च्या 63 जागांसाठी तर हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या 10 जागा अशा एकूण 317 ग्रामंपचायतीतील 503 जागांसाठी पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.