पुण्यात शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार; १६ वर्षांखालील रुग्णांवर मोफत उपचार

पुणे: शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार करणारे, अशा स्वरूपाचे पहिलेच ‘सायबर नाईफ’ लेझर मशिन  रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह च्या वतीने  शनिवार, २९ जुलै रोजी  आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले.  

 या वेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. सायरस पुनावाला, बजाज उद्योग समूहाचे संजीव बजाज, शेफाली बजाज, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार अली दारूवाला, रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेज ग्रँट आणि रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .बेहराम खोदाईजी आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘रूबी हॉल क्लिनिकमध्ये कर्करोगात क्रांतिकारक उपचार करणाऱ्या नवीन लेझर प्रणालीमुळे पुणे उपचारांचे मोठे केंद्र होईल. ग्रामीण भागापासून मुंबईच्या रुग्णांना याचा फायदा होईल,’ असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

डॉ.परवेज ग्रँट म्हणाले,‘सायबर नाईफ’ लेझर मशिन कर्करोग रुग्णावर २० मिनिटांच्या कालावधीत वेदनारहित उपचार करेल. रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह कडून १६ वर्षांखालील कर्करोगग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील. साधारण रोज २०० कर्करोग रुग्णांवर या लेझर मशिनद्वारे उपचार करता येतील. या मशिनमुळे पुण्यातील वैद्यकीय पर्यटन वाढेल.’

मुस्लीम समाजातून अली दारूवाला, तर पारशी समाजातून डॉ. परवेझ ग्रॅंट यांची भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली. त्याबद्दल या कार्यक्रमात डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आयोगाच्या कामकाजात भरीव योगदान देऊ, असे अली दारूवाला, डॉ. परवेझ ग्रॅंट  यांनी यावेळी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *