जालना: म्हशींच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका पठ्ठ्याने शेतात गांजाची लागवड करून, गांजाचा खुराक म्हशींना देत असल्याची आश्चर्यकारक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या करवाईतून पुढे आली आहे. याप्रकरणी घनसावंगी तालुक्यातील राहेरा शिवारात केलेल्या कारवाईत 2 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
म्हशींना गांजाचा खुराक डोस दिल्यानंतर त्या जास्त प्रमाणात चारा खातात, त्यानंतर त्या सुदृढ आणि तंदुरुस्त होतात, त्यानंतर त्यांच्या विक्रीतून मोठा नफा मिळतो, या आशेने राहेरा येथील शेतकरी केवळ म्हशीसाठी गांजाची शेती करीत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घनसावंगी तालुक्यातील राहेरा शिवारातील धांडगे नामक शेतकऱ्याच्या शेतात धाड टाकली. यावेळी पपईच्या शेतात दोन मोठी झाडे तर जनावरांच्या गोठ्याच्या छपरावर वाळू घातलेला गांजा पथकास आढळून आला. हा सर्व गांजा अंदाजे 10 किल्लो 2 लाख रुपयांचा असण्याची शक्यता आहे.