मंगल कार्यालय चालकांनीही 50 पाहुण्यांची मर्यादा पाळावी, अन्यथा आयुक्तांचा कारवाईचा इशारा
औरंगाबाद: शहरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगल कार्यालय चालकांनी लग्न सोहळ्याला मंगल कार्यालय देताना 50 व्यक्तींपेक्षा जास्त गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी सूचना औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या तर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी एका बैठकीत केली.
शहरातील सर्व मंगल कार्यालय चालकांची बैठक मंगळवार, 24 नोव्हेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती. ही बैठक प्रशासक यांच्या वतीने डॉ.पाडळकर यांनी घेतली. या बैठकीत खालील प्रमाणे सूचना करण्यात आल्या.
1)मंगल कार्यालय लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी देताना शासन निर्देशानुसार फक्त 50 व्यक्ती त्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची मुभा द्यावी.
2)जर मंगल कार्यालयात एका कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्या तर संबंधित मंगल कार्यालय पुढील एक महिन्यासाठी सील करण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमांची पायमल्ली झाल्याचे निदर्शनास आले तर पुन्हा एक महिन्यासाठी मंगल कार्यालय बंद करण्यात येईल. तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
3) मंगल कार्यालय देण्यापूर्वी हॉल व परिसराचे निर्जंतुकीकरण करावे आणि कार्यक्रमाबाबत संबंधित पोलीस स्टेशन आणि वॉर्ड अधिकारी यांना सूचित करणे अनिवार्य राहील.
4)सोहळ्यात सहभागी होणारे संबंधित व्यक्तींनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे याची दक्षता मंगल कार्यालय चालकांनी घ्यावी.
5)जेवणासाठी टेबल खूर्ची देखील सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून लावावी.
6)सोहळ्यासाठी हॉल देताना हॉलचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. तसेच शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.