नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या आणि 1 ते 15 जुलैदरम्यान होणाऱ्या सीबीएससी बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. याबरोबरच आयसीएसई बोर्डानेही दहावी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. ही माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सुप्रीम कोर्टात दिली. तसेच अशा आशयाचे ट्वीटही त्यांनी केले आहे.
सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशा या राज्यांनी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, ते नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात. सीबीएससीप्रमाणे आयसीएसई बोर्डाने देखील परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविल्याने या बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.