प्रतिकात्मक छायाचित्र
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देशभरातील 3,000 शाळा मूल्यमापन केंद्र म्हणून सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. सीबीएसईद्वारे घेतल्या गेलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे वेळेत मूल्यमापन होऊन निकाल लावता यावा, या दृष्टीने ही परावानगी देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निःशंक’ यांनी ही माहिती दिली असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
देशभरातील 3,000 सीबीएसई संलग्न शाळा केवळ पेपर तपासणीच्या मर्यादित कामांसाठी सुरु केल्या जातील, असेही रमेश पोखरीयाल ‘निःशंक’ यांनी सांगितले. या निर्णयामुळे सुमारे 1.5 कोटी उत्तरपत्रिकांचे लवकरात लवकर मूल्यमापन करणे शक्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, बोर्डाचे उर्वरित पेपर्स झाल्यावरच या दोन्ही परीक्षांचे निकाल लावले जातील. हे पेपर्स एक जुलै ते 15 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत.