मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने जेव्हा संपूर्ण देश कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध लढत आहे, तेव्हा याची तयारी अगदी सध्या पद्धतीने करण्यात येत आहे. असे असले तरीदेखील या दिवसाचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येने एकत्रित जमू नये असा सल्ला देण्यात आल्याने, 6 वा आयडीवाय घरीच कुटुंबासमवेत साजरा करण्यासाठी आयुष मंत्रालयाने ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ याला प्रोत्साहन दिले आहे.
लाखो लोक याआधीच आयडीवाय-2020 मध्ये सहभागी होण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि योग सादरीकरणात सुसंवाद साधणे हे आयुष मंत्रालयाचे एक उद्दिष्ट आहे. 21 जून 2020 रोजी सकाळी 7 वाजता यात सहभागी होणारे स्वतःच्या घरातून प्रमाणित सामान्य योग प्रोटोकॉलवर आधारित योग सादरीकरणाला प्रोत्साहन देऊन हे साध्य करण्याचा प्रयत्न करतील. या व्यतिरिक्त, आयुष मंत्रालयाने प्रसार भारतीच्या सहकार्याने सुसंवादी योग सराव सुलभ करण्यासाठी डीडी नॅशनल वर प्रशिक्षकाद्वारे करण्यात येणारे योग सत्र प्रसारित करण्याची व्यवस्था केली आहे. दूरदर्शनवरील या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे योग दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण, जे सकाळी 6.30 वाजता प्रसारित होईल.
अनेक सेलिब्रिटी (नामांकित व्यक्ती) आणि प्रभावी व्यक्तींनी प्रेरणादायक संदेश आणि विचार सामायिक केले असून लोकांना 6 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. काही सेलिब्रिटींमध्ये अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, मिलिंद सोमण आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यासारख्या नामांकित चित्रपट कलाकारांचा समावेश आहे. आयुष मंत्रालयासोबत सामायिक केलेल्या आपल्या संदेशात त्यांनी, जीवन जगण्याचा एक शिस्तबद्ध आणि संयमित मार्ग म्हणजे योग, असे योगचे वर्णन केले आहे. योग हा एक असा सराव आहे जो जगभरातील लोकांना एका समान कारणासाठी एकत्रित आणतो आणि शांतता आणि सौहार्दाचा संदेश देतो. हे तसेच योग दिवसाचे इतर संदेश फेसबुक (https://www.facebook.com/moayush) आणि मंत्रालयाच्या इतर सोशल मीडिया हँडल्सवर पाहिले जाऊ शकतात.
लोकांना आयडीवायसाठी आधीच तयारी करता यावी यासाठी आयुष मंत्रालयाने योग पोर्टलसारखा डिजिटल मंच आणि युट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया हँडल्सवर विविध ऑनलाइन संसाधने उपलब्ध करुन दिली आहेत. दूरदर्शनवर अनेक सामान्य योग शिष्टाचार सत्रांचे प्रसारण करण्यात आले आहे ज्याचा लाभ देशभरातील हजारो लोकांनी घेतला आहे. या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल स्त्रोतांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अगोदर लोकांना त्यांच्या घरातून योग शिकण्याची भरपूर संधी उपलब्ध झाली.