# कोरोना संसर्गाची लढाई ही दीर्घकाळ चालणारी -पालकमंत्री छगन भुजबळ.

 

नाशिक:  कोरोना संसर्गाची लढाई ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे, यात शासन, प्रशासनासमोर दोन प्रकारची आव्हानं आहेत. पहिले संसर्ग नियंत्रणात आणने त्यालाठीचे उपचार व दुसरे म्हणजे कोरोना असूनसुद्धा व्यवहार सुरू ठेवून अर्थचक्र चालू कसे राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील येवल्यासह ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना आज गुरूवारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आरोग्य उपसंचालक पठ्ठणकोट शेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, सुरूवातीला आपल्या जिल्ह्यात एकही कोरोना संसर्गित नव्हता; आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग आज तालुकास्तरावर ग्रामीण भागातही जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपसातील समन्वय बळकट करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब अहवाल लवकरात लवकर निकाली काढून पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांवर तत्काळ इलाज कसे करता येतील यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार स्वॅब अहवाल हे स्थानिक लॅब, आंध्र प्रदेशातील कीट पुरवठादार, जे.जे. रूग्णालयात नव्याने कार्यान्वित होणाऱ्या लॅबच्या माध्यमातून तत्काळ कसे प्राप्त करून घेता येतील याचे नियोजन करावे. जेजेमध्ये होणाऱ्या लॅबमध्ये दिवसाला ३०० नमुन्यांच्या तपासणीची क्षमता राखीव ठेवण्यात आली आहे, त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी. इतर आजारांचे पेशंट हे कोरोना संशयीत नाहीत, ज्यांना घरीच विलगीकरण, अलगीकरण शक्य आहे त्यांचा व ज्यांना शक्य नाही त्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्यात यावा, शासनाच्या मार्गदर्शक सूचना गरज लक्षात घेवून अंमलात आणाव्यात.

मालेगावपाठोपाठ आता जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मालेगाव त्यापाठोपाठ येवल्याची रूग्णसंख्या चिंतेचा विषय असून तेथे एका स्वतंत्रपणे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची घटना व्यवस्थापक अथवा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात यावी. संसर्ग ग्रामीण भागात जास्त पसरणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणावर काळजी घेण्यात यावी. दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांबाबत जिल्ह्यात एकसारखेपणा व सुसूत्रता कशी राहील याची काळजी घेण्यात यावी. जेवढ्या अधिक संख्येने दुकाने उघडतील तेवढी कमी गर्दी, जेवढा वेळ जास्त दुकाने सुरू राहतील तेवढी गर्दी कमी याबाबत सारासार विचार करून सर्व यंत्रणांनी सर्व आपआपसात संमतीनेच निर्णय घ्यावा. मुंबई, ठाणे येथून मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर नाशिकच्या दिशेने येत आहेत, महिला, मुली, लहान बालके त्यांच्यासोबतच आहेत. ते जात असतील तर त्यांना जावू द्यावे, ज्यांना निवारा गुहांमध्ये राहायचे आहे त्यांना थांबू द्यावे. जाणाऱ्यांसाठी अशासकीय संस्थांच्या माध्यमातून खानपान उपलब्ध करून द्यावेत. ते या देशांचे नागरिक आहेत, त्यांच्याशी मानवतेने प्रशासन व जनतेने व्यवहार करावेत, असे आवाहनही यावेळी श्री. भुजबळ यांनी केले.

या बैठकीत झालेल्या चर्चेत प्रामुख्याने विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलिस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आरोग्य उपसंचालक पठ्ठणकोट शेट्टी, जिल्हा शल्यचिकत्सक सुरेश जगदाळे, यांनी जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजनांची माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *