पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता पुन्हा हळूहळू सक्रीय होत आहे. पुढील काही दिवसांत कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात तसेच मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात 9 ऑगस्टपासून सुरू झालेला पाऊस सुमारे 15 दिवस सुरू होता. नुकताच पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, आता पुन्हा पाऊस हळहळू सुरू होऊ लागला आहे. कोकणासह मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
भीमा खो-यात सर्वाधिक टेमघर धरण परिसरात 2 हजार 494 मिमी पाऊस:
भीमा खो-यात गेल्या पंधरा दिवसांपासून बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 हजार 494 मिमी एवढा झाला आहे. सर्वात कमी पाऊस विसापूर धरण परिसरात केवळ 216 मिमी एवढाच पाऊस आतापर्यंत पडला आहे.
भीमा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जून आणि जुलै महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा सरासरीपेक्षाही कमी झाला होता. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते की काय अशी स्थिती झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून खडकवासला साखळी धरणातील पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या धरणासह गु़ंजवणी, मुळशी, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.
भीमा खो-यात एकूण 26 धरणे आहेत. त्यामध्ये जून महिन्यापासून आतापर्यंत सर्वात अधिक पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 हजार 494 मिमी एवढा पडला असून, त्या खालोखाल मुळशी धरणात 2 हजार 391 मिमी पाऊस पडला आहे. तर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 हजार 868 मिमी तर गुंजवणी 1 हजार 785 मिमी, निरा -देवघर 1 हजार 681 मिमी, वडिवळे 1 हजार 782 मिमी, पवना 1 हजार 408 मिमी एवढा पाऊस पडला आहे. उर्वरित धरणामध्ये अगदी दोनशे मिमी पर्यंत पाऊस पडला आहे. मात्र, अजुन सुमारे सात ते आठ धरणामध्ये 500 मिमी हून कमी पाऊस पडला आहे. भीमा खो-यातील अजुनही ब-याच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या धरणाचा पाणीसाठा ऐन पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी आहे.