नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून पदवी अभ्यासक्रम तीन वर्षा ऐवजी चार वर्षाचा झाला आहे. या आधीचे बारावी पर्यंत चे विभाग देखील काही प्रमाणात बदलले आहेत. पदवीचे शिक्षण हे क्रेडिट पद्धतीचे असून त्यात कोर्स, विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. शिवाय काही क्रेडिट कमावल्या नंतर गॅप घेऊन नोकरी चा अनुभव घेता येईल. एवढेच नव्हे तर नोकरी करता करता देखील शिकता येईल. म्हणजे शिक्षणाच्या खर्चाचा भार पालकांवर न पडता मुले स्वावलंबी व्हायला शिकतील. नव्या शैक्षणिक धोरणात आंतर शाखीय अभ्यासावर भर देण्यात आलाय. म्हणजे विज्ञान विषयाचे मेजर क्रेडिट घेऊन सोबत संगणक, कॉमर्स, व्यवस्थापन, आर्ट्स या शाखेचे आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य राहील. यामुळे शिक्षण, ज्ञान एकांगी न राहता, वेगवेगळे विषय अभ्यासता येतील. ही काळाची, भविष्याची गरज आहे.
चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम केला की पदव्युत्तर अभ्यास न करता देखील चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील. आर्थिक निकड म्हणून, घरची परिस्थिती म्हणून अनेकांना लवकर आर्थिक स्थैर्य हवे असते. अशा बहुसंख्य मुलांसाठी हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम निश्चित फायद्याचा ठरेल. यातही काही कालावधी नंतर अधिक क्रेडिट कमावत पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहेच. आपल्या परंपरागत शिक्षण पद्धतीत भिंती बांधून एका विषयाला दुसऱ्या विषया पासून दूर ठेवले जाई. आता नव्या पद्धतीत पूल बांधण्यावर भर आहे. निवडीत लवचिकता आहे. हे तरुण पिढीसाठी फायद्याचेच आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी व्हावे लागेल. स्पून फिडींग ची सवय सोडावी लागेल. जास्त मेहनत घ्यावी लागेल.
आता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी क्रेडिट बँक असेल. जसजसे विषय उत्तीर्ण व्हाल तसे तुमचे क्रेडिट तुमच्या खात्यात जमा होत जातील. अमुक संख्येचे क्रेडिट जमा झाले की डिप्लोमा, वाढीव क्रेडिट कमावले कि पदवी, आणखीन क्रेडिट वाढले तर ऑनर्स, नंतर पीजी डिप्लोमा, नंतर पदव्युत्तर पदवी असे चढत्या श्रेणीने , टप्प्या टप्प्याने शिक्षण घेता येईल. सर्वच क्रेडिट कमावण्यासाठी कॉलेजात, वर्गात, जाण्याची गरज राहणार नाही. काही विषय ऑनलाईन शिकून परीक्षा देता येईल. प्रोजेक्ट, उद्योग क्षेत्रातील कृती अनुभव, सेमिनार अशा माध्यमातून देखील क्रेडिट कमावण्याचे स्वातंत्र्य असेल.
विशेष म्हणजे एकाच शाखेचे विषय घेण्याचे बंधन राहणार नाही. स्पेशलायझेशन चा जमाना गेला आता. तुम्हाला विविध शाखाचे थोडे थोडे का होईना ज्ञान गरजेचे आहे. फिजिक्स मध्ये पदवी घेतलेल्या शास्त्रज्ञाला केमिस्ट्री त नोबेल परितोषिक मिळते. ते बायो केमेस्ट्री शिकवतात अन् बायो टेक्नॉलॉजी विषयात संशोधन करतात. (हे उदा अमेरिकेत स्थायिक भारतीय शास्त्रज्ञाचे आहे). यावरून काळ कसा बदलालाय, भविष्याच्या गरजा कशा असतील याची कल्पना यावी. आर्ट्स, कॉमर्स, सोशल सायन्स या क्षेत्रात देखील हेच तत्व लागू होते. म्हणजे फक्त मराठी, हिंदी साहित्याचे विषय घेऊन एमए करून उपयोग नाही. पत्रकारिता, मास कमुनिकेशन, इतिहास, राज्यशास्त्र या विषयाचे ज्ञान असेल तर नोकरीसाठी तुमची किंमत निश्चित वाढेल. नव्या शैक्षणिक धोरणात हे अंतर्भूत आहे.
हे सारे अमलात आणायचे तर शिक्षक, विद्यार्थी, प्रशासन अधिकारी सर्वांना मनोवृत्तीत बदल करावे लागतील. कॉलेजच्या दहा ते पाच अशा ठराविक वेळा चालणार नाहीत. आंतर शाखीय शिक्षण घ्यायचे तर वेळापत्रक तुमच्या सोयीचे नसेल. तुम्हाला स्वतःची वेळ मॅनेज करावी लागेल. प्रयोग शाळा, ग्रंथालय जास्त वेळ उघडे ठेवावे लागेल. आयआयटी सारख्या संस्थेत हे आधी पासून आहे. त्यामुळे अंमलबजावणीत अडचण काहीच नाही. फक्त हे क्रांतिकारक बदल आपण खुशीने स्वीकारले पाहिजेत. जास्तीत जास्त शिकवण्यापेक्षा जास्तीत जास्त शिकण्यावर भर हवा. मूल्यांकन पद्धतीत देखील अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. सतत मूल्यमापन व्हावे. सेमीस्टर शेवटी तीन तासाचा, शंभर मार्का चा पेपर, आठ पैकी पाच प्रश्न सोडविण्याचे ऑप्शन हे सारे जुने मॉडेल बदलावे लागेल. चुका शोधण्यापेक्षा काय किती समजले हे तपासावे लागेल. नियमित विषया बरोबर व्यक्तिमत्व विकास, नैतिकता, संवाद कौशल्य, टिमवर्क, जागतिक घडामोडी, पर्यावरण, समाजभान या वर्ग बाह्य विषयावर देखील तितकेच लक्ष केंद्रित करावे लागेल. ऐहे विषय क्रेडिट बँकेचे महत्वाचे भाग असतील.
नवे शैक्षणिक धोरण प्रत्येक स्तरावर इन लेटर अँड स्पिरीट अमलात आणले तर आपले एकूणच शिक्षण जागतिक दर्जाचे होईल हे निश्चित..
(जाता जाता..नवे बदल करताना विद्यापीठांनी फुकट पदव्या (सन्माननीय डॉक्टरेट, डी लिट) वाटणे बंद केले पाहिजे. व्यक्तीचे सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील काम कितीही मोठे असले तरी विद्यापीठाचे पदवी ग्रहणाचे नियम न पाळता पदवी दान करणे केव्हाही अयोग्यच आहे..)
-डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com