महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवार, 12 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून, तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का? असा प्रश्न विचारला आहे. याबरोबरच राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्याच्या सूचनाही केल्या आहेत. राज्यपाल महोदयांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी उत्तर दिले आहे. ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की,
“केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का”? असा प्रतिप्रश्न केला आहे.
याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दल केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, “महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही”. असे उत्तर दिले आहे. वाचकांसाठी आम्ही राज्यपाल महोदयांचे पत्र व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तरादाखल दिलेले पत्र येथे देत आहोत…
माननीय राज्यपालमहोदय,
महाराष्ट्र राज्य यांसी –
जय महाराष्ट्र ,
महोदय,
आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डाॅक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.
महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.
Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated?
असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का?
मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.
जय हिंद,
जय महाराष्ट्र.
आपला नम्र –उद्धव ठाकरे.