लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावठाण प्रकल्प ड्रोन सर्व्हे कार्यपध्दती प्रशिक्षण कार्यक्रम
लातूर: लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प (स्वामित्व योजना) ड्रोन सर्व्हे करत असताना सार्वजनिक मालमत्तेला बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक एस. चोक्कलिंगम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावठाण जमाबंदी प्रकल्प बाबत ड्रोन सर्व्हे कार्यपध्दती प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, प्रभारी उपसंचालक भूमी अभिलेख अभय जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोश जोशी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील महसूल, भूमी अभिलेख व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प अंतर्गत ड्रोन सर्व्हे काम करत असताना सार्वजनिक मालमत्तेला बाधा येऊ न देता सर्वांनी समन्वयाने काम केले पाहिजे. राज्यात शेतजमिनीचा सर्व्हे झालेला आहे. तसेच सिटी सर्वे पण झालेला आहे. शेत जमिनीला पुरावा आहे. मात्र, गावठाणमधील नागरिकांना पुरावा मिळालेला नाही. गावठाण भूमापण योजनेबाबत एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी संबंधितांना सखोल मार्गदर्शन करून या सर्व्हेमुळे गावठाण हद्दीतील प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होईल व प्रत्येक मिळकतीच्या सिमा निश्चीत होऊन क्षेत्र मार्किंग होईल. या योजनेमुळे सर्व संबंधित नागरिकांना सनद, मिळकत नकाशा व मिळकत पत्रिका मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्वामित्व योजना सर्व्हेसाठी सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपआपल्या जिल्ह्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प सर्व्हे अचूक व निर्दोष करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व उस्मानाबाद जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रारंभी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव यांनी लातूर व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती स्वाती लोंढे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उस्मानाबद जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महसूल, भूमी अभिलेख व ग्रामविकास विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडीकर यांनी केले, तर आभार भूमी अभिलेखच्या उप अधीक्षक सीमा देशमुख यांनी मानले.