औरंगाबाद: विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता उद्या मंगळवार 25 जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य देऊन कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साप्ताहिक कोविड आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस उपायुक्त उज्वला बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पहिला डोस जवळजवळ सर्वांनाच देण्यात आला असून दुसऱ्या डोससाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे असून घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात पाठपुरावा सबंधितानी करण्याच्या सूचना देत श्री.चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद हद्दीतील सर्व सोईसुविधेने युक्त असे कोरोना केअर सेंटर सुरु करावे तसेच तत्काळ चार बालरोग तज्ज्ञ डॉक्टारांची तेथे नेमणूक करावी. महानगरपालिकेच्या धर्तीवर ग्रामीण भागात देखील गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांची वेळावेळी तब्येतीची फोनद्वारे चौकशी करावी.