औरंगाबाद: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात वर्गसंघर्ष, जातअंताचा लढा याचे चित्रण प्रभावीपणे केलेले आहे, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व राजर्षि शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे शनिवार, १ ऑगस्ट रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला घेण्यात आली. या अंतर्गत शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे व गझलकार प्रा. मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई) यांनी विचार मांडले. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी ऋषिकेश कांबळे म्हणाले, अण्णा भाऊ साठे हे केवळ शाहीर, लेखकच नाही तर ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील झुंजार सैनिक होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही अण्णा भाऊंनी राजकीय क्षेत्राविषयीची मोठी जागृती केली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती चळवळीत त्यांचे योगदान असून तलवारीचे काम अण्णा भाऊंच्या लेखणीने केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. १९४४ साली लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून ‘माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली’ ही छक्कड संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणारी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णा भाऊंनी रशियात पोवाडा गायला. रशियाच्या राष्ट्राध्यक्षाने अण्णा भाऊंच्या साहित्याचा गौरव केला. ‘जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव असं सांगणारा अण्णाभाऊ ‘ हा तर मांडणारा अण्णा भाऊ खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचा पाईक होता, असेही डॉ. कांबळे म्हणाले.
अण्णा भाऊंची जीवन हीच मोठी परीक्षा -डॉ राजपंखे:
यावेळी डॉ. मुकुंद राजपंखे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी लघुकथा, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटिका, नाट्य असे अनेक साहित्य कलाप्रकार लिहिले आहे. अण्णा भाऊंच्या लेखणीने हा सगळा साहित्यप्रकार समृद्ध केला. अण्णा भाऊ हे चालतं बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या साहित्यावर अनेकांनी संशोधन केले. शाळेचे तोंड न पाहिलेला साहित्यिक जीवनाच्या शाळेमध्ये मोठ्या प्रखरतेने शिकत राहिला. शाळा-महाविद्यालयात अभ्यासक्रम असतो, तीन तासाची परीक्षा असते परंतु जीवनाच्या शाळेमध्ये परीक्षा नसतानाही अभ्यासक्रम नसतानासुद्धा अण्णा भाऊ साठे हे जीवनाच्या शाळेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. साहित्यामध्ये जगण्यासाठी मरणारी माणसे अण्णा भाऊंनी पाहिली. प्रतिभा झोपडीत असती तरी एक ना एक दिवस निश्चितपणे चमकत असते तसेच अण्णा भाऊविषयी ठरले आहे, असेही डॉ. राजपंखे म्हणाले.
लोकसाहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात अण्णा भाऊंचे योगदान -कुलगुरू:
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, अण्णा भाऊंना बालपणापासूनच लोकगीताची आवड असल्यामुळे ते साहित्याकडे वळले. अण्णा भाऊंनी शाहिरी, कथा, कादंबरी, लोकनाट्य, वग, गवळण, चित्रपट, प्रवास वर्णन अशी सशक्त आणि समृद्ध साहित्य निर्मिती केली. तमाशा या लोककलेला पूर्वी आपला समाज वेगळ्या नजरेने पाहत होता त्या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं खूप मोठं काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले आहे. १६ ऑगस्ट १९४७ साली शिवाजी पार्क येथील मोर्चामध्ये अण्णा भाऊंनी, ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी हे, असा नारा देऊन ज्या व्यवस्थेत आमचं पोट भरत नाही ती व्यवस्था आमच्या कामाची नाही असा विचार मांडला तो विचार आजही समाजाच्या आठवणीत आहे. अण्णा भाऊंच्या कादंबरीवर सात चित्रपट निघाले अण्णा भाऊंनी अनेक कादंबऱ्या अनेक कथासंग्रह लिहिले आणि त्यांच्या सात कादंबरीवर नामांकित असे महत्वपूर्ण चित्रपट निर्माण झाले. नामवंत दिग्दर्शकांनी या चित्रपटांची निर्मिती केली आहे. फकिरा कादंबरीला १९६१ साली महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्:मय निर्मिती पुरस्काराने अण्णा भाऊंच्या साहित्याचा गौरव केला, असेही डॉ. येवले म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी करून दिला. तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.