पुणे: बंगालच्या उपसागरात वारंवार तयार होत असलेले कमी दाबाचे पट्टे आणि वादळे यामुळे दक्षिण भारतामधील राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या वादळामुळे हवामानात बदल होत आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणामुळे थंड वातावरण तयार होत आहे. दरम्यान, राज्यात ढगाळ वातावरण 5 डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे. असे असले तरी थंडीसाठी जानेवारी महिन्याची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यापासून वारंवार कमी दाबाचे पट्टे तसेच वादळे तयार होत आहेत. अगोदर गती नावाचे वादळ तयार झाले. या वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर लागलीच निवार नावाचे दुसरे वादळ तयार झाले. या वादळांमुळे अगदी अंदमान, निकोबार बेटासह दक्षिण भारतामधील केरळ, तामिळनाडू ते आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टी पर्यंत जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्रात झाला असून, बहुतांश भागात ढगाळ वातावरण, थंड वारे आणि पाऊस पडत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानाचा समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागार त्याचबरोबर हिंदी महासागर या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 48 तासात या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबरला हा तीव्र कमी दाबाचा पट्टा दक्षिण तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. याच्या परिणामामुळे तामिळनाडू, केरळ, दक्षिण आंध्रप्रदेश, दक्षिण रॉयलसीमा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. तर उत्तर भारतात बिहार, उत्तरप्रदेश, हिमालयीन भाग, राजस्थान, दिल्ली, ईशान्य भारतामधील राज्यांमध्ये दाट धुके वाढणार असून, किमान तापमान सरासरीपेक्षा खाली म्हणजेच उणे 1.6 ते 5.1 अंश सेल्सिअस एवढे घसरण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, तामिळनाडू राज्यातही पावसामुळे दाट धुके वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हळूहळू ढगाळ वातावरण वाढले आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली असून, विदर्भाच्या काही भागात गेल्या चोवीस तासात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यत 2 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापामानात वाढ राहणार आहे. तर लागलीच वातावरणात बदल होऊन थंडी देखील जाणवण्याची शक्यता आहे.