मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात काही भागात पावसाची शक्यता
पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली असून, किमान तापमानात सरासरीपेक्षा चार ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागात 21 नोव्हेबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, 22 नोव्हेंबरच्या आसपास हिमालयाच्या प्रदेशात थंडी वाढण्यासाठी आवश्यक असलेला पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. यामुळे उत्तर भारतासह राज्यात पुन्हा थंडी वाढणार आहे.
राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी पूर्णपणे कमी झाली आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील दक्षिण पश्चिम व पूर्व भागात चक्रीय स्थिती आहे. याबरोबरच कोमोरीन पर्यंत द्रोणीय स्थिती कार्यरत आहे. 19 नोव्हेंबरला दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार असून हा पट्टा पुढील 48 तासात अरबी समुद्राच्या मध्य आणि दक्षिण भागात कार्यरत राहणार असून, 21 नोव्हेंबरला पट्टा आणि चक्राकार वारे ओमानच्या दिशेने सरकणार आहे. या स्थितीमुळेच थंडी गायब झाली असून, शनिवारपर्यंत (दि.21) राज्याच्या जवळजवळ सर्वच भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे.
रविवारनंतर थंडी वाढणार:
अरबी समुद्रात चक्राकार वारे तयार झाले आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. यामुळे राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारपर्यंत ढगाळ वातावरण राहून किमान तापमानात वाढ राहिल. दरम्यान, रविवारी हे चक्राकार वारे ओमानकडे सरकणार आहेत. त्यानंतर थंडी वाढेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.