औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्वतोपरी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद प्रशासनास दिले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री.ठाकरे यांनी औरंगाबाद येथील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी गुरूवारी संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती. तसेच मुंबईहून मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी आदी उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
औरंगाबादेत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या सर्व त्या उपाययोजना करा, शासन खंबीरपणे प्रशासनाच्या पाठीशी आहे, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी औरंगाबादेत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. ठाकरे यांना दिली. तसेच घाटीतील औषध पुरवठा, सुपरस्पेशालिटीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. खासदार डॉ. कराड यांनी घाटीतीतील सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली. तर खासदार जलील यांनी घाटीतील औषध पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केली. तसेच सर्व आमदारांनी विविध सूचना करत प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मत मांडले. यावेळी श्री. मेहता, डॉ. व्यास, डॉ. जोशी यांनीही मागदर्शन केले. तर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत श्री. केंद्रेकर यांनी माहिती दिली. तसेच श्री. चौधरी यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.