मुंबई: राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
श्री. पाटील म्हणाले, देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्याच्या कोरोना विषाणू (कोव्हीड-19) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दि. 31 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी दि. 30 जून, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी मा. उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुन्हा पुढील तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत असेही श्री. पाटील यांनी संगितले.