# पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची जिल्हाधिकारी यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकारी यांच्याकडून पाहणी.

 

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व साखर आयुक्त सौरभ राव यांनी संयुक्तपणे नवीन मोदीखाना व भीमपुरा क्षेत्रातील उपाययोजनांबाबत पाहणी केली. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनेप्रमाणेच पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना करून कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील पाहणीवेळी मेजर जनरल नवनीत कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोंमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. गायकवाड यांच्यासह पुणे कॅन्टोनमेंट, पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील लगतच्या भवानीपेठ क्षेत्रात सुरू असलेल्या उपाययोजनेप्रमाणेच कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना राबवा, गरजेप्रमाणे प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून या ठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूची निकड भासू नये यादृष्टीने भाजीपाला, दूध यासारख्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध होतील, या दृष्टीने समन्वय करून व्यवस्था करण्याबाबतच्या सूचनाही सबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *