महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस परवा साठ वर्षे पूर्ण झाली. साठ वर्षाच्या कालावधीला कॅलेंडरच्या भाषेत हीरक महोत्सव म्हणतात. साठ हे प्रगल्भ आणि परिपक्व वय. या साठ वर्षाच्या काळात महाराष्ट्राने नेमकं काय मिळवलं? आणि काय गमावलं? याचे परिशीलन करायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात महाराष्ट्राने देशातील एक अत्यंत प्रगत राज्य अशी ओळख मिळवली. मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकासासह कृषी, शिक्षण, सहकार, क्रीडा या इतरही क्षेत्रात मोठा लौकिक मिळवला. देशाची आर्थिक राजधानी हे बिरुद मुंबईला मिळाले. महाराष्ट्राने देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत रोजगार आणि उदरनिर्वाहाच्या अधिक संधी निर्माण केल्या. त्यामुळे देशभरातून लाखो लोक मुंबई आणि महाराष्ट्रात आले. भारतीय चित्रपटसृष्टी किंवा बॉलिवूड म्हणजे मुंबई हे समीकरण तयार झाले. हे सगळे भौतिक स्तरावर घडत असताना महाराष्ट्राने पुरोगामी राज्य अशीही ओळख मिळवली. ही ओळख अर्थातच दहा पाच वर्षात आपल्या राज्याला मिळालेली नाही. तर यामागे शेकडो वर्षाची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.
तेराव्या शतकातल्या म. बसवेश्वर, चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम या थोर संत परंपरेने महाराष्ट्राला नवा दृष्टिकोन दिला. अध्यात्माच्या क्षेत्रात लोकशाही निर्माण केली. या परंपरेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल. त्यांनी हिंदवी स्वराज्याची केलेली स्थापना ही घटनासुद्धा आजच्या आधुनिक महाराष्ट्राचा आरंभबिंदू होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांनी रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले, ही जगाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. कारण हे स्वराज्य लोकशाहीवादी होते.
एकोणिसाव्या शतकातील लोकहितवादी, आगरकर, महात्मा फुले, ताराबाई शिंदे, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या प्रबोधन परंपरेने खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा उच्चार केला. या परंपरेने समाजाला सुधारणाविषयक एक महत्त्वाचा विचार दिला. मानवमुक्तीचा विचार दिला. हा विचार आजच्या प्रगत समाज निर्मितीचा विवेकी अध्याय होता. याचा अर्थच असा की आपल्या या सगळ्या विचार परंपरेने नवभारताच्या निर्मितीला नवा साज चढवला. निकोप असे राजकीय, सामाजिक पर्यावरण निर्माण करण्याबरोबरच सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने त्यांनी मांडलेले विचार आणि केलेले कृतिशील प्रयत्न देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे राहिले आहेत. अस्पृश्यता, अंधश्रद्धेत गुरफटलेल्या आणि शिक्षणाचा अभाव असलेल्या समाजात या लोकसेवकांनी साक्षरतेचे जागरण घडवले. कितीतरी अनिष्ट गोष्टींचे निवारण करून पारंपरिक भेदाभेदांच्या भिंती उद्ध्वस्त करण्याचे काम केले. आणि डोळसपणे बघण्याचा निकोप दृष्टिकोन दिला. म्हणूनच महाराष्ट्र हे राज्य विकासाच्या दृष्टीने प्रगतिशील आणि विचारांच्या दृष्टीने पुरोगामी ठरू शकले.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. अर्थात ही निर्मिती सहज झाली, असेही नाही. त्यासाठी महाराष्ट्राला मोठा संघर्ष करावा लागला. मोठी किंमत चुकवावी लागली. मराठी भाषिकांचे राज्य ही केवळ भौगोलिक गरज नव्हती, तर तो आपल्या अस्मितेचाही मुद्दा होता. केशवराव जेधे, प्रल्हाद केशव अत्रे, ना.ग. गोरे, एस. एम. जोशी, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमरशेख यांनी दिलेले योगदान आपल्याला विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या वर्धापनदिनाचा आणि हीरक महोत्सवी वर्षाचा विचार करताना हा सगळा संघर्ष आपल्याला आठवावाच लागेल.
स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर यशंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. त्यांच्यापासून ते अगदी आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राला लाभलेल्या सर्वच नेतृत्वाने विकासाचे एक सूत्र घेऊन महाराष्ट्राचा सार्वत्रिक लौकिक वाढवला. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. अर्थात या साठ वर्षात महाराष्ट्रावर अनेक संकटे आली. ही संकटे जशी नैसर्गिक होती तशीच मानव निर्मितही होती. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर किंवा बॉम्बस्फोट. या सगळ्या संकटाला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्राने शर्थीचे प्रयत्न केले. अर्थात संकटे काही संपलेली नाहीत. आता कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. त्याला महाराष्ट्र अपवाद नाही. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला कोरोनाने विळखा घातलाय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. उद्योगधंदे बंद आहेत. शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद आहेत. पर्यटन थांबले आहे. लाखो लोक आपला रोजगार गमावून बसले आहेत. सर्व व्यवहार ठप्प आहेत. प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. पुढे नेमके काय होणार आहे? याविषयी कोणतेही अंदाज बांधता येत नाहीयेत. असे असले तरी आज ना उद्या हे संकटही कदाचित संपेल असा आशावाद घेऊन माणसं घरात थांबलेली आहेत. कोरोनामुळे एकूणच आपल्या समाजजीवनावर, अर्थकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे. तो पुढील अनेक वर्ष कायम राहण्याची शक्यता आहे.
साठ वर्षाच्या काळात विज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, लोककला, संगीत, शिक्षण, नाटक, चित्रपट या क्षेत्रातली कामगिरी नक्कीच उल्लेखनीय राहिली आहे. या राज्याने देशाला अनेक भारतरत्न दिले. थोर लेखक, क्रीडापटू, अभिनेते आणि कलावंत दिले. विचारवंत आणि शास्त्रज्ञ दिले. प्रागतिक विचारांचे, भूमिकांचे कणखर राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात मात्र मागच्या काही वर्षात अनेक नकारात्मक गोष्टीही घडल्या. विशेषतः प्रगत राज्य ही ओळख मिरवतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या आत्महत्या आपल्याला थांबवता आल्या नाहीत. खेड्यापाड्यातल्या शेतकर्यांचे जगणे आजही अत्यंत बिकट आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी पाड्यावर, तांड्यावर अजूनही मूलभूत सुविधा आपण पोहोचू शकलेलो नाहीत. अभिमानाने पुरोगामित्व मिरवणाऱ्या आपल्या राज्याची ओळख बदलते की काय? ही भीती वाटत आहे. कारण काही वर्षात महाराष्ट्रात जातिभेदांमुळे झालेल्या हत्या, असोत किंवा परिवर्तनवादी विचारवंतांच्या वैचारिक मतभेदामुळे झालेल्या हत्या असोत – या सगळ्याच घटना आपल्या लौकिकाला बाधा आणणाऱ्या आहेत. आपले वैचारिक अधःपतन झाल्याचे निदर्शक आहेत. विघातक आणि पैसाकेंद्री राजकारणाचा वाढता प्रभाव ही आपल्या समोरील एक महत्त्वाची समस्या आहे. जातकेंद्री राजकारणाने महाराष्ट्राच्या निकोप वैचारिक परंपरेचा बळी घेतला आहे. मागच्या दशक दोन दशकात समाजात जी एक उभी फूट पडली ती सहजपणे बुजवता येणार नाही, इतकी ती दुभंगली आहे. ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी, भटके विमुक्त, मुसलमान, आदिवासी असे जातीय समूह एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत. टोकाची विरुद्ध संरचना तयार झाली आहे.
प्रत्येकाच्या डोळ्यात इतरांविषयी द्वेष भरून वाहतो आहे. प्रत्येकाला आपले जातीय वर्चस्व सिद्ध करायचे आहे. मोर्चे, दंगली या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. खरेतर हे सगळे प्रश्न का निर्माण झाले? याचे उत्तर शोधायला हवे. सध्याच्या काळात प्रत्येक जाती-धर्माच्या अस्मिता एवढ्या टोकदार का झाल्या? याचाही विचार करायला हवा. विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या रॅलीचे स्वरूप बदलले आहे. जयघोषाच्या नावाखाली एक दुसऱ्यावर कुरघोडी करणे आणि स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. सरकार आपली पक्षीय विचारधारा लोकांवर लादत आहे. देशाच्या पातळीवर तर राष्ट्रवादाची व्याख्याही बदलली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. झुंडीने मारहाण करण्याचे प्रकारही अधूनमधून घडत आहेत. स्त्रियांवरील अत्याचार थांबता थांबत नाहीत. बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे. तरुण पिढीच्या हाताला जर आपण काम देऊ शकलो नाही तर शिक्षित पिढीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न पाण्याचे मूलभूत प्रश्नही अनेक ठिकाणी अद्याप कायम आहेत. रोजगाराची, जगण्याची शाश्वती सरकारला द्यावी लागणार आहे. आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि लोकांच्या हितासाठी आपण निवडून आलेलो आहोत, ही मूल्यात्मक जाणीव प्रत्येक राजकीय नेत्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सतत प्रामाणिक विकासाचे ध्येय असायला हवे. त्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही.
विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांना पुरेसे आर्थिक बळ दिल्याशिवाय या क्षेत्रात संशोधन घडणार नाही. किंवा नवीन संशोधकांना प्रोत्साहन मिळणार नाही. यापुढच्या काळामध्ये आपल्याला अनेक सामाजिक संकटांचा मुकाबला करावा लागणार आहे. जागतिक पातळीवर मोठी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आपल्याला मोठी प्रगती करावी लागेल. भाषा, साहित्य, कला किंवा एकूणच सांस्कृतिक क्षेत्राविषयी अनास्था झटकून टाकायला हवी. कोरोनामुळे ही सर्वच क्षेत्रे कमालीची बाधित झाली आहेत. सामाजिक, आर्थिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक पुनरुज्जीवनालाही प्राधान्य द्यायला हवे. साठ वर्षाच्या काळात आपण नक्कीच देदिप्यमान झेप घेतली आहे; पण त्याचबरोबर वर उल्लेखित घटनाही नजरेआड करता येत नाहीत. दहशतवाद, नक्षलवाद यासारखे आंतरराष्ट्रीय प्रश्नही आपल्याला छळत आहेत. अशावेळी अत्यंत जबाबदारीने आणि समंजसतेने राज्याचा गाडा पुढे चालवावा लागेल. द्वेषाचं राजकारण कुणाच्याही हिताचं असत नाही, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. पारंपरिक द्वेषाची मानसिकताही बाजूला ठेवावी लागेल. हे सगळे घडले तरच आपली आश्वासक वाटचाल होण्याच्या दृष्टीने रस्ता तयार होईल.
महाराष्ट्राने नेहमीच देशाला एक विकासाची दृष्टी आणि दिशा दिली आहे. विचार दिला आहे. पुढच्या काळातही आपला प्रवास अधिक गतिमान व्हायला हवा. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठवाडा, विदर्भाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आपण जसे उद्योगपतींचे हित पाहतो, तसेच गोरगरिबांचे हीत पाहावे लागेल. जातीय, धार्मिक सलोखा निर्माण करावा लागेल. त्यादृष्टीने आपण सर्वांनी सकारात्मक विचार करायला हवा. या देशाचे, राज्याचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांची ती नैतिक जबाबदारी आहे. सध्या सुरू असलेली संकटाची मालिका लवकरच खंडित होईल अशी आशा बाळगूया. सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा!
-डॉ. पी. विठ्ठल, नांदेड
(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)
इमेल: p_vitthal@rediffmail.com>
संपर्क: ९८५०२४१३३२
भूतकाळाची आठवण
वर्तमानातील परिस्थिती
आणि भविष्तील आव्हाने यांचा संपूर्णआढावा…!
संग्रहणीय लेख!!
धन्यवाद..अर्थातच संग्रहणीय आहे.