# नवनिर्मितीची हाक..! -सुरेंद्र कुलकर्णी.

 

अखेर 17 मे आला..!
18 मे पासून काही बंधनात का होईना पण कामे चालू होतील..
नुकतेच सोडून गेलेले कारागीर त्यांच्या गावी स्थिरावले असतील. नेमक्या ह्याच गोष्टीचे शल्य वाटत आहे. अवघ्या 12 दिवसांत ह्या विरोधाभासाला तोंड द्यावे लागत आहे!

केवळ ‘कब तक रुकेंगे’ और ‘सारे निकल रहे है’ या व अशा गोष्टीमुळे त्यांनी ना मागे पाहिले ना पुढे! आता तिकडे त्यांना काम नाही आणि इकडे आम्हाला कामगार नाहीत…

पण आता पुढचा विचार केला पाहिजे. जे झालं ते झालं. कारण दिवसेंदिवस प्राथमिकता कशाला द्यायची हे सरकारपासून ते एका नागरिकाला संभ्रमात पाडणारे हे संकट आहे. अर्थात यावर खूप तज्ज्ञ मंडळींनी भाष्य केले आहे.

आपण आता, कामे चालू करू..! पहिले दोन तीन दिवस आवराआवरीत जातील, कामात व पद्धतीत बदल करण्यात जातील..’पाहिजे’च्या पाट्या लावण्यात जातील.., कामगारांच्या उपलब्धतेच्या चौकशीत जातील. आहेत त्या कामगारांना कामासंदर्भात नवीन नियम समजून देण्यात व त्यांची सवय करून घेण्यात जातील.

बँकेतून नेमकी काय मदत मिळते ते आधी पाहू. त्याचे नियोजन क्रम calculated रिस्क घेऊन ती मदत गुंतवावी लागेल.

इथल्या लोकांना घेऊन किंवा आपल्या नातेवाईकामधील कुणी हुंदडत असेल तर त्याला इथे आणून, सांभाळायची तयारी ठेवून त्याला ट्रेनिंग द्यावे लागेल.. मध्येच तुमच्याकडे कोणी extra आहे का किंवा दोन तासांसाठी माणसे मिळतील का असे काही calls येतील किंवा करावे लागतील…याला पर्याय नाही…! ही गुंतवणूकच आहे!!!

यासाठी बळ, धीर, मनस्ताप सहन करण्याचे बळ कुठून आणावे ? आटलेल्या cash flow मध्ये पोहण्याचे बळ कुठून आणावे? हे बरोबर आहे पण….

…..आपण या संसर्गातून उरलो आहोत, हीच जाणीव आपल्याला बळ देईल… आपण आपल्यासाठी, कुटुंबियांसाठी उरलो आहोत ही केवढी उपलब्धी आहे…? आणि शेवटी आपण आपल्यासाठीच करतो ना? हेच जिवंत राहणे महागडे हॉस्पिटल्स, त्याहून महागडे उपचार, व्हेंटिलेटर्स, आपल्याला ठेण्यासाठी करावी लागलेल्या स्वतंत्र व्यवस्थेचा अधिभार, कितीतरी पथ्ये पाळून मिळाले असते तर…?तेव्हा आपण काय म्हटले असते?… चला, जीव वाचला!!

मग आज ते सर्व न करता आपण धड आहोत आणि काळज्या घेतल्या तर आणखी धडधाकट राहू, मग हे कामाचे काय.., अन् कामगार असल्या नसल्याचे काय? कित्येक लोक तर सुरुवात करतानाच त्यांच्यावर ही धाड आली असेल…
कुणाच्या PO तयार होत असलेल्या थांबल्या, कुणाचे अॅडव्हान्स पेमेंटचे चेक्स, पे ऑर्डर्स थांबले असेल… त्यात आपलेही काही इकडे तिकडे झाले असेल… पाण्यात बुडत असताना फक्त आधार लागतो, मग आता हातपाय गाळण्याएवढी विपरीत परिस्थिती आज का? आणि असेल तर आपल्या गरजांवर काही विचार आहे का? इतके दिवस आपण आणि आपला फायदा हे एकवेळ व्यवहार्य होते…पण आजवर आपण कोणते काम केले आहे की चार जणांनी आपला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांच्या हातातली कामे सोडून यायला हवे…?

पण तरीही आपण नवी सुरुवात करू..
कमावणे गमावणे काय असते हे प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना विचारू.. तेव्हा लक्षात येईल की आपले ‘वाटणे’ हे सापेक्ष आहे….. कुणाच्या दुःखाच्या तुलनेत ते क्षुल्लक आहे!

इतके दिवस मिळत नव्हते तेव्हा या पन्नाससाठ दिवसात असे काय गेले आणि मिळत होते तर थोडा ब्रेक घ्यावा लागला, पुढेही मिळेल..! ज्याने लोकांची आयुष्ये काढून घेतली पण त्या संसर्गाने तुमची पुढे जाण्याची इच्छा व तयारी कुठल्याही प्रकारे काढून घेतलेली नाही…

सरकार, यंत्रणा जे देतात, ते नेहमीच तुम्ही आम्ही काम करतील ही अपेक्षा ठेवून देतात. तेव्हा काम न करता त्या योजनांचा फायदा मिळणार नाही..!

आपण नवनिर्मिती चालू केली तर हे सारे सारे भरून निघेल, अस्वस्थता संपेल, नवीन पथ्ये पाळल्यामुळे आपल्या इतरही व्याधी जातील.. जसे दोन शौक कमी केले तर आरोग्याचे संभाव्य नुकसान टळेल…

शेवटी एकच -आपला पन्नास लाख कोटींचा जीव वाचला आहे, आपल्याला आकाश मोकळे आहे…!
तेव्हा करू या ना नवीन सुरुवात…
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 9767202265
surendrakul@rediffmail.com

One thought on “# नवनिर्मितीची हाक..! -सुरेंद्र कुलकर्णी.

  1. Nice one! If we take it positively, no matter we will do every impossible. Best wishes ahead! 👍💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *