संसर्गाचे हे संकट असे आहे की सर्वात गोची झाली, दिखाऊ समाजसेवकांची! कारण ‘हे केले’, ‘ते केले’,’हे करतांना यांच्या सोबत’,’ते करतांना त्यांच्यासह’ असे फोटो काढायची सोयच राहिली नाही!! असे काही करायला जावे, तर आपलीच बिनखांद्याची शासकीय पालखी निघायची, या भीतीने दिखाऊ समाजसेवक वेगवेगळ्या रंगाच्या चोचीचे पोपट होऊन फिरताहेत…!
या पोपटांना मास्कचा फायदा दुहेरी!एक विषाणू (यांच्याइतकाच घातक) पासून संरक्षण आणि दुसरे असे की, ओळखू न आल्यामुळे कुणी हाकाही मारत नाही, ‘जरा आमच्याकडे बघा न, कालपर्यंत तर उकरू-उकरू विचारत होते, काय ‘हवं-नको’ म्हणून! अन् आता काय झालं?फिरकायचं नाव नाय घेत!
हे झालं ‘शो बाज’ समाजसेवकांचं!
आता आमच्यासारख्याचं! लॉकडाऊन उठण्याचं कौतुक आणि ‘धंदा कम सेवा’ करावी म्हटलं आणि सॅनिटायझेशन डिस्पेन्सर घेतलं करायला! जेमतेम 15 गेले ही! कुठून कुठून फोन येऊ लागले! 500 लागतील, 100 घेतो, 200 चा प्लॅन करा, उद्या किमान 350 चं कन्फर्मशन देतो..!
प्रत्यक्षात एक ना दोन! हे कस्टमर कुठे गेले कुणास ठाऊक? हे म्हणजे ते कोरोनाची लस आली ‘आली, आली’ असे वाटेपर्यंत कुठे जाते, ते न कळण्यासारखंच! आमच्याही लाईनमध्ये कस्टमरला व आपला माल घेऊन विकणाऱ्या ट्रेडरला ‘आय आम सॉरी’ची बाधा झाली काय की काय…?बरं, आम्ही बोलावलं नव्हतं बरकां कुणाला की, आम्ही कसं बनवतो डिस्पेन्सर ते या बघायला म्हणून! त्यात ज्यांनी ऑर्डर दिल्या ते डिस्पेन्सर तयार झाले की ‘आणून द्या’ म्हणू लागले! काहींनी 5 ची ऑर्डर दिल्यावर तेही करायला काही वाटले नाही, पण ‘एक पाहिजे’ म्हणणारेही व्हाटस् एप वर लोकेशन टाकू टाकू पत्ता सांगायला लागले! म्हणजे आता हे डिस्पेन्सर घेऊन न पोहचावे तर आपला मोबाईल जुना असण्याचा समज किंवा नवा असेल तर आपल्याबद्दल ‘अँड्रॉइडचा वापर करता येत नाही वाटतं’ असं समजायची शंका! त्यामुळे, लक्षात आलं की, हा सॅनिटायझेशन डिस्पेन्सर तयार करायचा हा धंदा खरोखरच ‘कम’ (कमी) आहे आणि सेवा जास्तय्! शेवटी अगदी वाजवी किमतीत देऊन निदान सेवा देऊ, म्हणून सहकाऱ्याला एका शाळेत विचारायला लावले! तोही शाळेच्या गेटवर जाऊन म्हणाला ‘घ्या दहा-एक आणि एकेका वर्गासमोर ठेवा…’तर गेटवरूनच तिथल्या सेक्युरिटी कम प्यूनने संगितले, ‘आमच्या शाळेत 15 पडून आहेत, भरल्या बाटल्या सकट!! वाटले, लॉकडाऊनच्या काळात शाळांनी गुपचून कार्यानुभवचा तास घेऊन पोरांकडून बनवून घेतले की काय डिस्पेन्सर्स?
….शेवटी आम्ही करोनाची भीती कमी होत आहे, यातच समाधान मानले!! एक डिस्पेन्सर बनवून ठेऊन दिले शॉपवर ‘लॉकडाऊनची आठवण’ म्हणून अन् लागलो मूळच्या कामाला! कारण कोरोनालाच लोक घाबरणे बंद झाले तर डिस्पेन्सरच्या ऑर्डर तरी कशा मिळायच्या?
तिसरे अस्मानी संकट उभे ठाकले ऑनलाइन शाळा कॉलेजचे! इकडे पुस्तके मिळणार- तिकडे वह्या मिळणार असे वारे सुरू झाले. आता एकदा ऑनलाइन शिक्षण म्हटल्यावर पुस्तके कशाला? तरी घरातील जबाबदार मंडळीनी वह्या पुस्तके आणून ठेवली व तो पडलेला ‘सॉफ्ट’ प्रश्न वाया गेला….!
आता कामावरच्या सहकाऱ्यांचे! कामगारांचे म्हटल्यावर आणि या काळात राग आला तर ?म्हणून सहकाऱ्यांचे! त्यांच्याकडे ‘आरोग्यसेतू’ पेक्षा जास्त माहिती! काम चालू झाले की वेल्डींग ते करता करताच खालच्या मानेने…
“सर,आमच्याकडे रात्री दोन सापडले!”
आपण लगेच “ऑ?”
तो ‘ऑ ‘मिटायच्या आत ,
“मला पण ताप आल्यासारखं वाटलालतं काल! पहाटं झोप लागली!”
हे ऐकलं की आपल्या मास्कवर काळजीची एक सुरकुती चढते व त्या रात्रीची झोप उडते!
आता घरचे! परीक्षा टळून ‘ऑनलाईन’ पुढे गेलेले मुलेसुद्धा म्हणतात, ‘अहो बाबा, बघा न, सोसायटीतील सगळे रोज कामावर जातात…17 तारखेपासून एकदाही घरी नाहीत…!’ यांची बोलवती धनी कोण आहे हे आपल्याला चांगले समजते. शेवटी दोन तीनदा ऐकल्यावर आणि आपण कामाला जातो. कामावरून आलो, सोफ्यावर बसणार, एवढ्यात “थांबा…थांबा,….आत कुठे निघालात? बाहेरच थांबा!” आम्हाला वाटते, आधीच ‘अवेअरनेस’ च्या नावाने असंतसं! त्यात पेपर बंद!त्यामुळे संसर्गात बाहेर गेलेला माणूस घायाळ होऊन घरी येतो, असे वाटले की काय हिला? आणि तशी समजूत झाल्याने हातीपायी धड आल्यामुळे ‘दृष्ट काढते की काय ही’असे वाटते न वाटते तोच…तर ही बादली घेऊन येते!
“इथेच स्वच्छ व्हा आणि मगच आत या!!!! ”
आता मात्र ही काळजी व ज्ञान पाहून घायाळ होतो आम्ही!
कसं बसं आत येतो,… एका इलेक्ट्रॉनिक चौकटीचे चालूच असते-
“24 तासांत एवढे बाधित. ,….तेवढे बरे… आजवर एकूण एवढे, आजवर एकूण तेवढे!
एकूण एवढे खाली- म्हणजे जमिनीत
…एकूण तेवढे वर- म्हणजे आकाशात !” …..घेतो आपला ऐकून-हे सगळे एकूण!
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 9767202265
surendrakul@rediffmail.com
योग्य समर्पक विवेचन..
This is something very good & practical thoughts by the Author.