# एकतरी प्रामाणिक मित्र हवाच… -सुरेंद्र कुलकर्णी.

 

काल एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच कारवाई करून सुटका करून घेतली ….त्याआधी पुण्यात अख्ख्या कुटुंबाने वेगळ्या तऱ्हेने एकत्र राहण्याचे ठरवले …..परवा ऐकले आईने टीव्ही बघण्यास विरोध केला म्हणून एक शाळकरी मुलाने तिला रडते ठेवले…काही दिवसांपूर्वी एका उगवत्या पण बऱ्यापैकी प्रस्थापित अभिनेत्याने काही प्रश्न टांगते ठेवले तर त्या आधी त्याच्या महिला मॅनेजरनेही स्वतःला झोकून देऊन काही प्रश्न जन्माला घातले..!

कितीही अस्वस्थ झालो, तरीही आयुष्ये एवढी ‘स्वस्त’ असतात का? कदाचित ‘संपवून’ घेणाऱ्याच्या दृष्टीने त्याची, तिची सुटका होत असेलही पण तो किंवा ती आजवर ज्यांच्यासाठी जगले आहेत, त्यांच्यासाठी आघात, चौकशा, अर्धकच्चा संसार आणि त्यांचे विव्हळते भावविश्व यांना मागे ठेऊन, किती वेळा ‘मरणे’ सोडून जातात?

करोडोंची कमाई असताना आणि आयुष्य समोर पडलेले असताना माणसाने आयुष्य संपवावे?करमणुकीचे इतर पर्याय असताना, मुलाने आईबद्दलचा राग इतका मनावर घ्यावा? घरदार, मुलेबाळे, सर्व काही नजरेसमोर असताना एका जबाबदार पोलिसाने स्वतःचे जीवन संपवणारा चाप ओढावा? सगळंच अनाकलनीय!

…ऐकून, वाचून माहीत झालेले असंख्य देह आठवून ‘चर्र..’ होते…वाटते ह्या दुर्दैवी मानसशास्त्रीय परिणामाबद्दल आपण लिहू तरी शकतो का? पराकोटीची असहायता, ‘संपले सगळे’असा आभास करणारे अपयश, चरफडत ठेवणारा अपमान, शरीरभर दाह करणारा एखादा झोंबलेला शेरा किंवा अप्रिय गोष्ट, पोटात धरतीएवढा खड्डा पाडणारा अपेक्षाभंग आणि सतत डावलले जाण्याची जाणीव झाल्याशिवाय का व्यक्ती आयुष्य आपणहून संपवण्याच्या टोकाला जात असेल?

लिहिताना वाटते, अशी किती दुःखे आपण हाताळली, पाहिली? त्या पातळीपर्यंत जाणाऱ्या एखाद्याला कधी बोललो आहोत? त्याच्याकडून कधी काही जाणून घेतले आहे? जर यापैकी काही केले नाही तर ते टोकाला नेणारे दुःख तरी कसे कळणार? श्वास थांबवणारा तो दोर नेमका कशाने पिळवटलेला असतो, ह्याबद्दल काय कल्पना करणार?

प्रत्येकाची भूक वेगळी, विचारसरणी वेगळी, दृष्टिकोन वेगळा, तशी प्रतिकारशक्ती वेगळी ! त्या अनुषंगाने त्याच्याकडून येणारी प्रतिक्रिया वेगळी! अमुक व्यक्तीच्या डोक्यात, छातीत होणारे स्फोट आपण ‘त्याची सहन करण्याची क्षमता नव्हती’ अशा निष्कर्षाला येऊन लपेटून टाकू शकतो का?आपणहून मृत्यूला कवटाळलेल्या शरीराने मागे ठेवलेल्या ‘नेमके काय झाले असेल’ याचे उत्तर आपल्याला मिळते का? की पंचनामे, तर्क-वितर्क, कुजबुज, शक्यता, आरोप हे त्या निश्चेष्ट देहाभोवती आणि स्मृतीभोवती घोंगावत राहणार..?

काही प्रश्नांची उकल झाली तरीही आणि कितीही अचूक कारण सापडले तरी, जाणारी व्यक्ती त्याने निवडलेला पर्याय शोधून मार्गस्थ झाली असते…!  शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा तर स्वतंत्र विषय आहे. त्यात मानसशास्त्रापेक्षा अर्थशास्त्र येते.

‘हे थांबले पाहिजे’ असे म्हणून न थांबणारे हे विषय… या संदर्भात तुटलेल्या व्यक्तीला आधार न मिळणे व अंतर्मुख करणारे शिक्षण मिळण्यात कमतरता येणे, ही दोन कारणे प्रामुख्याने संभवतात.

याही पलीकडचे सर्वात महत्वाचे कारण संभवते ते मित्र किंवा मोकळे होण्यास तशा विश्वासाची व्यक्ती न मिळणे..! सध्याच्या अनेक पातळ्यांवर असहाय करणाऱ्या वातावरणात ना कुठले शिक्षण, ना कुठली योजना, ना कुठली घोषणा आपल्यासाठी धावून येणार…एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे आपल्याला प्रामाणिक मित्र असण्याचा! विश्वासाचा मित्र हाच अशा ठिकाणी पर्याय असतो जो त्याचे दुःख वाटतो किंवा….. आपले दुःख वाटून घेतो…! मित्र केवळ स्पर्धा, खेळ, करमणूक, पर्यटन, पार्ट्या, पैशांची देवाण घेवाण व भागीदारी यासाठी नव्हे, तर तो हवा आहे…. आपली आपल्या आयुष्याशी मैत्री कायम राहण्यासाठी..!
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 9767202265
surendrakul@rediffmail.com

17 thoughts on “# एकतरी प्रामाणिक मित्र हवाच… -सुरेंद्र कुलकर्णी.

  1. व्वा, सुरेंद्रजी !
    तुम्ही प्रत्येक विषयाला मनापासून भिडता. म्हणूनच तर तुमचा प्रत्येक शब्द मनामनात उतरतो !
    कदाचित तुमच्या अशा एखाद्या लेखामधूनही कुणाला एकटेपण दूर करणारा आधार गवसेल !

    1. सर,तो सर्वोत्तम परिणाम असेल ,तुम्ही म्हणता तसे झाले तर!

      Let us hope so..

      Thanks for kind words..

      Surendra.

  2. अप्रतिम मनाला चटका लावणार वास्तविक लिखाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *