सध्याच्या अत्यंत जटिल परिस्थितीत नुकतेच 20 जवानांचे पेटीबंद देह त्यांच्या मूळ घरी परतले. येताना त्यांनी संपूर्ण भारतवर्षालाच नव्हे तर जगाला पुन्हा संदेश दिला की, चीन हा देश नुसता पाताळयंत्री नाही तर शिरजोरही आहे. स्वतःच्या देशात जन्मलेल्या एका संसर्गाने संपूर्ण जगाला ‘दे माय, धरणी ठाय’ करून सोडले, लाखो निरपराध लोकांचे बळी घेतले. हे देश, ते आहेत ज्यात आपले ग्राहक आहेत, आपल्या छोट्या मोठ्या वस्तू वापरून, विविध ऍप्स वापरून त्या देशातील जनतेने आपल्या तिजोरीत भर घातली आहे आणि आज तेच नाहक प्राणाला मुकत आहेत, याबाबत किंचितशीही नैतिक अपराधीपणाची भावना चीनच्या राज्यकर्त्यांच्या ना धोरणात दिसते ना कर्मात! उलट ही व्यापारातील संधी मानून त्यांनी औषधे, वापरलेले (?)मास्क आणि अनेक जीवनावश्यक वस्तूची विक्री जगभर केली. हा केवळ अर्थकारणाचा भाग होता किंवा नुसता व्यावहारिक फायदा लाटण्याचा प्रकार नव्हता तर, आमच्या देशातून आरिष्ट्य जन्माला येऊन जगभर पसरले, तरी काही गोष्टींसाठी आमच्यावरच काही देश अवलंबून कसे आहेत, असेही समाधान त्या देशाने घेतले असावे!
ह्या निर्दयी व निर्ढावलेल्या व्यापारी महाकाय देशाने नुकताच आणखी एक घृणास्पद प्रकार केला तो म्हणजे, सीमेवर वीस भारतीय जवान शहीद झाले. काही स्वत:चेही गमावले. मुळात, आपल्यापेक्षा किंचित कमी लोकसंख्या असलेल्या परंतु आपल्यापेक्षा तिपटीने लहान असलेल्या शेजारी देशाचा -ज्या देशाचा काही हजार चौरस किमी भूभाग स्वतः विश्वासघाताने गिळंकृत केला आहे, अशा भारत या देशाच्या पुन्हा पुन्हा कुरापती काढण्याचे कारणच काय? आंतरराष्ट्रीय लष्करी कृतीसमोर हा प्रश्न एक भाबडा प्रश्न वाटेल, परंतु म्हणून त्याचे मूल्य कमी होत नाही. त्यामुळेच, इतर काही बाबींना महत्व दिले नाही तरी मोदीजींनी लेह दौऱ्यात जवानांचे मनोबल वाढवताना ‘विस्तारवादाचे युग आता संपले आहे, असा अत्यंत रास्त विचार मांडला, तो थेट जिनपिंगच्या चेहऱ्यावर पोस्टर लावावे, असा दिसत आहे.
आता इथल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल! वीस जवानांच्या हौताम्यावर पोळी भाजून घेतल्यावर- (कारण बातम्या देण्यादरम्यानचे कमर्शिअल ब्रेक्स, संगीत, जाहिराती हा अपरिहार्य भाग वाईटातली वाईट बातमी देतांना प्रेक्षकांवर लादलेला असतो) आता त्यांनी चक्क दिवास्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे, ती स्वप्ने आहेत चीनचा परस्पर काटा निघण्याची! तो कुणाकडून तर रशियाकडून…! का, तर रशिया व चीनमधील अमुक शहराबद्दलचा दीर्घकालीन विवाद!याचा संदर्भ घेऊन, काही उत्साही वाहिन्यांचे म्हणणे असे आहे की, आता चीनचे काही खरे नाही! ‘ड्रॅगन का खातमा’, ‘चीन की आखरी साँस’,’ड्रॅगन होगा परास्त’, अशी आकर्षक, लक्षवेधी शीर्षके देऊन- अक्षरशः लुटुपुटुच्या लढाईच्या कथा भारतीयांच्या मनात भरवल्या जात आहेत! रशियापुढे चीन लोळणार व आपला प्रश्न कायमचा मिटणार, अशा ह्या भाकडकथा!
ह्या दोन्ही देशांच्या आपण खिजगणितीत आहोत का? काय म्हणून रशिया चीनला धडा शिकवेल?आणि शिकवलाच तर आपल्याशी चीन नरमाईने वागेल? उलट, युद्धाचा एक अलिखित नियम असा असतो की, शत्रू बलवान असेल तर त्याने केलेले नुकसान तुलनेने कमजोर असलेल्या शत्रूवर हल्ला करून भरून काढणे! म्हणजे, समजा वाहिन्यांनी रंगवलेले रशिया-चीन युद्ध झालेच व त्यात चीनचे आहे तेवढेही नाक रगडले तरीही तो देश भारताच्या सीमेवर हुंगतच राहणार व भारताला कायमच लक्ष्य करत राहणार!
मुळात, आपल्याला म्हणजे भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाला ही माहिती कशी मिळाली? कधी मिळाली लाखोंची दिवसाढवळ्या झालेली घुसखोरी न रोखता येणारा हा आपला भारत देश, यातील टेलिव्हिजन मंडळाने रशियाच्या मनातला ड्रॅगनला धडा शिकवण्याचा कार्यक्रम ‘कोणत्या वर्षी व किती महिन्यात’ अशा कालावधीसह प्रेक्षकांना द्यावा??? ऐकत आहेत म्हणून काहीही ऐकवायचे? पाहत आहेत म्हणून काहीही दाखवायचे, रशियाच्या आणि चीनच्या गुप्तहेर संघटनांच्या पोटात ह्या वाहिन्या कधी शिरल्या? आम्ही हात धूत होतो, त्यावेळी ह्या मिटिंग्ज झाल्या की काय ?? कोणत्या सरकारी सूत्राचा हवाला देतात ह्या कंड्या पिकवताना या वाहिन्या?
दिवाळीतल्या फटाक्यांसारखे आवाज, प्रचंड वेगाची लढाऊ विमाने, आग ओकणारे रणगाडे, संग्रहित फोटो, राखून ठेवलेल्या क्लिप्स यांचा आलटून पालटून मारा केला की यांनी दाखवलेल्या स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या होतात की काय? आम्हा भारतीय प्रेक्षकांचीही अवस्था वाहिन्यांना पूरक अशीच. अशा बातम्यांचा मारा झेलून दुसऱ्या दिवशी आपल्या स्वप्नग्रस्त जनतेची चीनच्या असंभाव्य अध:पतनाची फोनवर हीss चर्चा! प्रसंगी पाकिस्तानमधून कांदा, साखर घेणारे, नियमितपणे सिमेंट घेणारे, नेपाळसारख्या राष्ट्राने आगळीक केली तरी घंट्याऐंशी चॅनेलिय चर्चा करणारे आपण, निघाले आपले वाहिन्यांना अंपायर करून पुतीन आणि जिनपिंग. ची आखाड्यात कुस्ती लावायला आणि पुतीनच्या बाजूने शिट्या फुंकायला, फेटे हवेत फेकायला!
सांगायचा मुद्दा हा की, आपण सोडून इतर देशांकडून चीनचा कथित निःपात म्हणजे, वाहिन्यांकडून फुंकर मारण्याचा प्रकार! अर्थातच, तो सत्यापासून दूर नेणारा असल्यामुळे नुकसानदायी आहे.
जाहिरातींतून अव्याहतपणे कमाई करत करत लहान मुलाला आरसा देऊन चंद्र मिळवून देणे किंवा दूरचे ‘हरण दाखवणे’ व कालहरण करणे, यापेक्षा वाहिन्यांचा कार्यक्रमाचा वेगळा अर्थ लागत नाही.
याचा अर्थ, मी भारतीय लष्कर, सैन्याची कर्तव्यदक्षता, निष्ठा, हौतात्म्य यांच्यावर कुठलीही टीका किंवा संदेह व्यक्त करत नाही. निश्चितच 1962 चा भोळेपणा आणि आजची आपली सज्जता यात खूप तफावत आहे. वेळ आल्यावर आपण चीनचा सक्षमपणे सामना करूच! शिवाय, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, आणि अनेक ज्ञात अज्ञात बाबी गेल्या पन्नास वर्षात बदललेल्या आहेत. मैत्री, व्यापार यांची समीकरणे बदललेली आहेत.
परंतु याचा अर्थ रशिया, अमेरिका आपल्या सीमेच्या संरक्षणार्थ चीनशी लढा देतील, त्याचा सूड घेतील, हा शुद्ध भ्रम वाटतो. रशिया-अमेरिकेने भारताला देऊ केलेली विमाने, लष्करी मदत हा मुख्यत्वे व्यापाराचा भाग असतो. हा व्यापारही करायचा आणि तो करून चीनशी दोन हात करताना भारताचाच प्यादे म्हणून वापर केला जाऊ शकतो! अन्यथा भारताचे भले पाहणाऱ्या अमेरिकेसारख्यांनी पाकिस्तानला शस्त्रे, पैसा पुरवलाच नसता! आणि रशियानेही आधी भारताचा चीनने बळकावलेला भाग परत द्यावा, अशी भूमिका शक्य तिथे लावून धरली असती! आणि तसेही, रशिया-अमेरिका यांनी भारताच्या भल्यासाठी चीनविरुद्ध काही केलेच, तर त्याची काही ना काही किंमत आपल्यालाच नव्हे तर मानवजातीला मोजावी लागणारच!
अशावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर क्षेत्रांत सक्षम, स्वावलंबी होत होत कूटनीती करत राहणे याला पर्याय नाही. भारतीयांनी किमान सत्यतेची कास धरावी, सैन्याचे मनोबल वाढवत राहावे, गावातल्या हुताम्यांच्या कुटुंबियांच्या मागे जनतेने सरकारी मदतीव्यतिरिक्त उभे राहावे. स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी,’टिक-टॉक’ न वापरण्याबद्दल नुसतेच ‘टॉक’ करत राहू नये, हे ओघाने आलेच! थोडक्यात, जे जे शक्य आहे, ते ते करावे.
…..अन् कुठल्याही परिस्थितीत फटाकड्यांच्या लडी लावल्याप्रमाणे आवाज करणाऱ्या, धूळफेक आणि धूरफेक बातम्या कानामनात ठासून भरणाऱ्या वाहिन्यांपासून तर दूरच राहिले पाहिजे…!
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 9767202265
surendrakul@rediffmail.com