डॉक्टरांप्रति आपल्या मनातील आदर लख्खपणे उजळून निघावा, अशी घटना समोर आली आहे. डॉ.आनंद देशपांडे (कोथरूड पुणे, मूळ अंबाजोगाई) यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेची अगदी आवर्जून नोंद घ्यायला हवी…!
डॉ.आनंद देशपांडे यांच्याबद्दल लोक नेहमीच कौतुकाने बोलतात. आमच्या कितीतरी परिचितांनी त्यांच्या व त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांचे आरोग्य डॉ.आनंदकडे सोपवले आहे. डॉ. आनंदने, अविनाश धुमाळ या मूकबधिर रुग्णावर- ज्या रुग्णाने आधीच एक डोळा संपूर्णत: गमावला आहे, त्याच्या दुसऱ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याची जोखीम पत्करली. या यशस्वी शस्त्रक्रियेने तर डॉ.आनंदने स्वतःचे नावच सार्थ ठरवले आहे. कारण कौतुक, आदर, धन्यवाद, अभिमान या पलीकडेही, रुग्ण धुमाळ यांच्या कुटुंबियांचे हर्षभरित हसूच डॉ.आनंदच्या नावे जमा झाले आहे!
ही घटना ऐकून एक क्षण वाटले की, नेत्रदानाहून तसूभरही कमी महत्व या शस्त्रक्रियेला मिळायला नको….पण विचार करू लागलो तसे वाटले की, ही शस्त्रक्रिया नेत्रदानापेक्षाही श्रेष्ठ आहे! असे लिहिण्याचे धैर्य होण्याचे कारण, ह्या शस्त्रक्रियेने डॉ. आनंदने रुग्णाला नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या दातृत्वाच्या ओझ्यातून मुक्त केले आहे. दृष्टी असण्याची स्वतःचीच निसर्गदत्त क्षमता त्या रुग्णाच्या शरीरातच होती. परंतु, संपूर्ण अंधत्वाच्या खाईत लोटल्या गेलेल्या रुग्णाला ती क्षमता डॉ. आनंदने ‘पाहू शकण्या’च्या शक्यतेत रूपांतरित करून दिली, म्हणून तिचे मूल्य जास्त आहे! शिवाय नेत्रदान करू शकणारी संभाव्य व्यक्ती रुग्ण- धुमाळ सोडून दुसऱ्या अंध व्यक्तीला नेत्रदान करू शकेल…!
शैक्षणिक पात्रता आणि पदव्यांच्या ओळींची लांबी तेव्हाच सिद्ध होते, जेव्हा त्या पदव्या प्राप्त केलेली व्यक्ती इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणते, बदल घडवते कलाटणी देते…अन्यथा, त्या अर्हतांचे मिरवण्यापलीकडे महत्व नसते! पु. ल. देशपांडेंचे एक वक्तव्य प्रसिद्ध आहे. त्या वक्तव्यानुसार जगातील कुठल्याही संतापेक्षा भूल देऊन शस्त्रक्रिया वेदनाहीन करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांनी थोर ठरवले आहे!
एक क्षण विचार करा,’केले तेवढे प्रयत्न केले, आता नेत्रपटलावर यापेक्षा उपचार होऊ शकत नाहीत ‘,असे त्याने कुटुंबियांना सांगितले असते तर त्या रुग्णाच्या व कुटुंबियांच्या नशिबी नशिबाला दोष देणे एवढेच आले असते. रुग्ण कितीही अशिक्षित असला तरी ‘एकदा डोळ्यांचा पडदा कामातून गेला की संपले’ अशी माहिती सर्वसाधारणपणे अनेक रुग्णांना असते. त्यामुळे एका डॉकटरने ‘काही होऊ शकत नाही’,असा एकदा नकारात्मक निर्वाळा दिला की, रुग्ण व त्याच्या कुटुंबियांना दुसरे मत घेण्याचेही बळ उरत नाही व रुग्ण कायमचा असहाय होऊन बसतो.
पण प्रत्येक रुग्ण ही एक सेवेची संधी आहे, असे मानून सेवा देणारे डॉक्टर्स हे अशक्यतेच्या पलीकडे जाऊन व ज्ञान पणाला लावून प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. तसेच, एका रुग्णासाठी अवलंबलेल्या यशस्वी उपचार पद्धतीचा अनुभव दुसऱ्या रुग्णाचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी जतन करत आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचे सोने करतात आणि रुग्णाच्या व स्वतःच्याही आयुष्यात दिव्य घडवून आणतात…!
शस्त्रक्रियेद्वारे डॉ.आनंदने रुग्ण धुमाळ यांना जग पाहण्याची, स्वतःचे नवजात बाळाचे त्याच्याकडे झेपावणारे हात झेलण्याची, त्याच्याबरोबर खेळण्याची, त्याचे दिवसेंदिवस मोठे होणे पाहण्याची आयुष्यभराची संधी देऊन त्यांचा पुनर्जन्मच घडवून आणला आहे….!!निर्व्यंग व्यक्ती असली तरी शरीराची छोटीशीदेखील सदोषता स्वीकारायला तयार नसते. म्हणून इथे मूकबधिर व्यक्तीच्या आयुष्याला सुखद वळण दिले गेले, म्हणून या शस्त्रक्रियेची उंची काकणभर वाढते!!! नवजात बाळ त्याच्या दोन्ही डोळ्यांनी जग टीपताना पाहता येणे, हा कशातही न मांडता येणारा ‘आनंद’ धुमाळ यांच्या आयुष्यात आल्यामुळे म्हणावे वाटते, …..त्या बाळाच्या शैशवाकडूनही डॉ.आनंदला आशीर्वाद मिळतील!!!
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
मोबाईल: 9767202265
ईमेल: surendrakul@rediffmail.com