कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी जगभरात एक लढाई सुरू आहे. या लढाईचा मानवी जीवनावर अत्यंत विपरित परिणाम होतो आहे. त्यातून सर्वत्रच अस्वस्थतेचा काळोख पसरू लागला आहे. अशातच दिल्ली एनसीआरमधून एक बातमी आली. इन्स्टाग्रामवर चालवल्या जाणाऱ्या ‘बॉईज लॉकर रुम’ या ग्रुपच्या संदर्भातील या बातमीने शाळकरी मुलांच्या मनात सुरू असलेली खदखद, घृणास्पद विकृती आणि आपण काय करतो आहोत याचं सुटत चाललेलं भान असं सारंच चव्हाट्यावर आणलं आहे. यानिमित्ताने समाज म्हणून आपण सारे आता नैतिक दारिद्र्याच्या कोणत्या पातळीवर येऊन ठेपलो आहोत याविषयी…
दहावी-बारावीची परीक्षा देऊन निकालाची वाट बघत असलेली मुलं. कोरोना टाळेबंदीमुळे त्यांना ना खेळायला बाहेर पडता येतंय ना मित्रांना भेटता येतंय. अशा स्थितीत या मुलांकडून करमणुकीचं साधन म्हणून मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात न झाला तरच नवल. यातूनच काही मुलांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘BoysLockarRoom’ असा एक ग्रुप सुरू केला. मग त्यावर सोशल मीडियातूनच आपल्या परिसरातल्याच शाळांमध्ये शिकणाऱ्या काही मुलींचे फोटो घेऊन ते अपलोड केले जाऊ लागले. त्या फोटोवर कॉमेंट येऊ लागल्या. तिचे कपडे.., तिचं दिसणं… इथपासून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याच्या इच्छेपर्यंत आणि त्याविषयीच्या नियोजनापर्यंतचे संवाद या ग्रुपच्या माध्यमातून ही मुलं करू लागली.
हाती वेळच वेळ असणाऱ्या या मुलांना आपले आंबट शौक पूर्ण करण्याचं एक माध्यम मिळालं. सहाजिकच या ग्रुपवर इतरही काही मुलांना सहभागी करून घेतलं जाऊ लागलं आणि एका टप्प्यावर या सर्वांचं भांड फुटलं. म्हणजे ग्रुपमधल्याच एका मुलानं ते फोडलं. कारण त्याच्या एका मैत्रिणीचा फोटो अत्यंत घाणेरड्या पद्धतीने कुणीतरी या ग्रुपवर अपलोड केला आणि त्यावर तितक्याच घाणेरड्या कॉमेंट्स सुरू झाल्या. ते पाहून संबंधित मुलाने त्याचे स्क्रिनशॉट्स काढले आणि थेट त्या मुलीला पाठवले. मग मुलीने थेट पोलिसांकडे याची तक्रार केली. प्रकरण मीडियातून पुढे आलं. दिल्ली महिला आयोगाने त्याची दखल घेतली आणि पोलिसांनी या ग्रुपचा अॅडमीन असलेल्या एका शाळकरी मुलाला ताब्यात घेतलं. इतकंच नव्हे, तर ग्रुपवरच्या इतरही २७ जणांना शोधून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याचं काम सुरू आहे.
कदाचित या सर्व मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बालसुधारगृहात ठेवलं जाईल. ही केस कोर्टात जशी उभी राहिल तशी त्यांना शिक्षाही होईल. किंवा पालकांच्या दबावामुळे त्यात राजकीय हस्तक्षेप होऊन हा मामला दाबून टाकण्याचाही प्रयत्न होईल. कारण ही मुलं दिल्ली-एनसीआरमधल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा स्कूलमधली आहेत. विशेष म्हणजे ती मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातली आहेत. त्यामुळे पालकांकडून त्यांना वाचवण्याचा, प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न निश्चित होऊ शकतो. या प्रकरणात अश्लिल चॅटिंगच्या पलिकडे सनसनाटी असं फारसं काही नाही. त्यामुळे माध्यमांकडूनही या प्रकरणाचा फारसा गाजावाजा केला जात नाही.
अर्थात या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा झाली म्हणजे प्रश्न मिटला असं होणार नाही. कारण या प्रकरणाने केवळ मुलांच्या बिघडत चाललेल्या वर्तनाचा प्रश्न पुढे आणला आहे असं नाही, तर याने पुन्हा एकदा समाजाचा नैतिक दरिद्रीपणा चव्हाट्यावर मांडला आहे. आपल्याच वयातल्या मुलींचे ‘तसले’ फोटो टाकून सामूहिक बलात्कार करण्यासंबंधी ग्रुपवर चर्चा करणाऱ्या या मुलांना आपण काय करतो आहोत याचं भान त्यांच्या लहान वयामुळे नसेल असं आपण म्हणू शकतो. परंतु हे भान मोठ्यांकडेही नसते. त्यामुळे वयाचा प्रश्न इथे गौण ठरतो. समाजाच्या एकूण धारणा काय आहेत आणि त्या कशा प्रकारे समोर आणल्या जातात, बळकट केल्या जातात हा खरा तर कळीचा मुद्दा आहे.
यातली एक धारणा आहे ती महिला, मुलगी यांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम स्थानाविषयीची. एका पातळीवर आपण स्त्रीला समानतेचा दर्जा देण्याविषयी आग्रही असतो पण त्याचवेळी तिच्याकडे माणूस म्हणून न बघता मादी म्हणून बघतो. हा दृष्टिकोनातला फरक समाजाच्या धारणेतून आलेला असतो. या धारणेत बाईवर वर्चस्व दाखवण्याचा संबंध पुरुषत्वाच्या संकल्पनेशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे बाईशी, मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, त्यात तिच्या संमतीचा विचार न करता बळजबरी करणे आणि उपभोगाचा आनंद लुटणे हा तमाम पुरुषांना आपला हक्क वाटतो. त्यातूनच बलात्काराच्या विकृत घटना वारंवार घडताना दिसतात.
पाशवीपणाची सीमा ओलांडणारी एखादी घटना समोर आली, की लोक समूहाने त्या विरोधात रस्त्यावर उतरतात. अशा समूहाच्या तावडीत गुन्हेगार सापडला तर त्याला ठेचून मारण्याचा गुन्हा करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. ते शक्य झालं नाही, तर गुन्हेगाराला मृत्यूदंडापासून त्याचे लिंग कापण्यापर्यंतच्या विविध शिक्षांची मागणी करतात. अशा पद्धतीने पीडितेला आधार देण्याचा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे सांगण्याचा मोठा ड्रामा करणाऱ्या या समाजातलेच अनेकजण अशा पाशवी घटनांचे व्हिडिओ मिळवण्यासाठी इंटरनेटवर धडपड करतात. यासंदर्भातली काही आकडेवारी आपण पाहिली, तर लक्षात येईल, की नैतिकतेचा आव आणणारा आपला समाज अनैतिकतेच्या कुठल्या टोकावर पोहोचला आहे.
हैदराबादमधल्या बलात्कार प्रकरणाचं उदाहरण आपण इथं बघूया. बलात्कार करून पीडितेला मारून टाकण्यात आलेल्या या घटनेत पोलिसांनी आरोपीला चोवीस तासांच्या आत पकडले. त्यानंतर त्या चौघांनाही इन्काऊंटरमध्ये मारण्यात आलं. हा इन्काऊंटर घडवून आणल्याच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच नागरिकांनी मात्र पोलिसांचं फुलं उधळून अभिनंदन केलं. सागायचा मुद्दा की भारतीय समाजाचा हिस्सा असलेल्या नागरिकांच्या दृष्टीने पोलिसांनी योग्य तोच न्याय केला. अशा नराधमांना अशीच शिक्षा व्हायला हवी अशी त्यामागची संतापजनक भावना होती. ही भावना केवळ हैदराबादमधूनच व्यक्त झाली असं नव्हे. संपूर्ण भारतभरातल्या सर्वसामान्यांची ही भावना होती. कायदा हातात घेणाऱ्या पोलिसांच्या पाठिशी स्त्रिया जशा होत्या तसेच पुरुषही आघाडीवर होते. परंतु कधीच कोणापुढे येणार नाही अशी धक्कादायक बाब म्हणजे या बलत्काराची व्हिडिओ क्लिप कुठे बघायला मिळते का म्हणून सुमारे ९० लाख भारतीयांनी इंटरनेटवर त्याचा शोध घेतला आहे. इतकंच नाही, तर घटना घडलेल्या दिवसापासून पुढे काही दिवस या घटनेत मृत पावलेल्या भगिनीच्या नावाचा हॅशटॅग पॉर्न साईटवर ट्रेंड करत होता.
काही अभ्यासकांनी शोधलेली ही माहिती प्रत्यक्ष घटनेपेक्षाही धक्कादायक म्हणावी लागेल. समूहात वावरताना माणूस म्हणून आपलं एक रुप समोर येत असतं. तेच खरं समजून समोरचा व्यक्ती आपल्याला जज करत राहतो. वास्तवात मात्र व्यक्ती म्हणून स्वतंत्र जगताना आपलं रुप निराळंच असतं. हे प्रत्येकाने जरा स्वतःशी ताडून पाहिलं तरी लक्षात येईल. ८०-९० लाख लोक जेव्हा एखाद्या बलत्काराच्या घटनेसंदर्भातला व्हिडिओ शोधू लागतात तेव्हा त्यामागची त्यांची छुपी इच्छा काहीतरी वेगळीच असली पाहिजे. तसं काही नसतं, तर पॉर्न इंडस्ट्रीसाठीचा सर्वात मोठा ग्राहक भारत बनला नसता.
भारतीय समाजात सेक्सबद्दल उघड काही बोलणं, लिहिणं, चर्चा करणं हे निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे कोणीच कुठेही याबाबत उघडपणे काही बोलत नाही. किंबहुना तसं न बोलणं ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट बनली आहे. असं असताना पॉर्न बघण्याच्या जागतिक क्रमवारीत भारत सातत्याने दुसरा-तिसरा क्रमांक पटकावून आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, तो म्हणजे आपलं सामाजिक आरोग्य टोकाचं बिघडलेलं आहे. ते तसं बिघडण्याला आपल्या धारणाही कारणीभूत आहेत. कोणताही पुरुष दणकट, राकटच असायला हवा आणि प्रत्येक स्त्री कमनीयच असायला हवी, हे समाजमनातले समीकरण आहे. त्यातून पुरुषी अहंकार जोपासला जातो, लैंगिक भावनांचे आविष्कार पुरुषत्वाशी जोडले जातात. यातून नकळत माणसाचं वस्तूकरण होतं.
त्यामुळेच सहकुटुंब चित्रपट बघतानाही त्यातला बलात्काराचा, स्त्रीवरील अत्याचाराचा प्रसंग आपण कळत-नकळत एन्जॉय करत असतो. घरात टीव्हीवरच्या मालिका बघतानाही तेच घडतं. मुलं हे सारं कळत न कळत टीपत राहतात आणि वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलाचे परिणाम विकृत स्वरुपात बाहेर पडू लागतात. बॉईज लॉकर रुम हे त्याचंच एक रुप आहे.
तेव्हा हे सारं टाळायचं असेल, समाज सजग, सुदृढ आणि समृद्ध बनवायचा असेल, तर चित्रपटाच्या निमित्ताने, टीव्हीवरील मालिकांच्या निमित्ताने, समाजात घडणाऱ्या घटनांच्या निमित्ताने घराघरात साधक चर्चा व्हायला पाहिजेत. काय योग्य, काय अयोग्य, न्याय्य काय, अन्यायकारी काय, नैतिक काय अनैतिक काय याची समज सर्वांमध्येच वाढवायला हवी. स्वतःच्या तसेच इतरांच्या शरीराचा, मनाचा आदर करायला शिकवायला हवं. तशा दृष्टीने सामाजिक वातावरण निर्माण व्हायला हवं, ज्यातून अभिजातपणे सभ्यता व्यक्त होईल. नसता समाजाच्या नैतिक दारिद्र्याचं असं वंगाळ दर्शन वारंवार होत राहील.
-विलास पाटील, पुणे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व मनोविकास प्रकाशनाचे संपादक आहेत.)
ईमेल: patilvilas121@gmail.com
मोबाईल: 9423230529