लॉकडाऊन हा कोरोनासारख्या रोगावरचा उपाय नाही. तरीदेखील जगभरातल्या देशांनी तो आपल्या नागरिकांवर लादला. बहुतांश ठिकाणी तर दमनाचं एक हत्यार अशा पद्धतीने लॉकडाऊनचा वापर झाला. त्यातून माणसाच्या जगण्याचे-वागण्याचे अनेक गहिरे रंग समोर आले. भारतासारख्या देशात ते खूप स्पष्ट आणि प्रखरपणे जाणवले. शेजारी, नातलग, अप्तस्वकीय, अगदी कालपर्यंत एका घरात राहाणारे सख्खे अशा सर्वांनाच लोकांनी अनोळखी बनवलं. त्यामुळे कोरोनाचे बळी ठरलेल्या कित्येकांना आपले म्हणवणारे असे खांदेकरी भेटले नाहीत. जे स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहेत अशा डॉक्टर्स, नर्सेसना त्यांच्याच घरात येण्याची बंदी घालत लोकांनी प्रसंगी मारहाणही केली. कदाचित हे भीतीपोटी घडलं असावं असं म्हणावं तर दुसऱ्या बाजुला या परिस्थितीचा फायदा उठवत अनेकांनी नडल्या-आडलेल्यांना लूटलं, त्यांचं शोषण केलं. असं सारं अंगावर येणारं भडक चित्र सातत्याने समोर येत असताना काहीजण मात्र संवेदनशीलतेनं आणि अत्यंत प्रामाणिकपणे मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. खरं तर अशी अगणित माणसं आहेत, जी स्वयंस्फूर्तीने खारीचा वाटा उचलत धडपडत राहातात. म्हणून समाज समाज राहतो. त्यांना जपायला हवं, त्यांचा टक्का वाढवायला हवा अशा माणुसकीच्या बेटांविषयी…
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपेल. त्यानंतर देशातलं जनजीवन सुरळीत होईल, सरकार त्या दिशेनं प्राधान्याने प्रयत्न करेल अशी आशा आहे. तसं घडलं नाही, तर पुढचा काळ आणखी कठीण होऊ शकतो. अशा कठीण काळात तगून राहाण्याचं बळ मात्र माणुसकीशिवाय दुसरं कोणी देऊ शकणार नाही. त्यामुळे मधल्या काळात माणुसकीची जी काही बेटं समोर आलेली आहेत त्यांचं महत्त्व वाढतं.
आजवरच्या चार टप्प्यातील लॉकडाऊनच्या काळात प्रामुख्याने दोन गोष्टींची तीव्र गरज निर्माण झाली. ती होती भूकेल्या पोटांना अन्न देण्याची आणि शहरात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी, घरी तातडीने पोहोचवण्याची. लॉकडाऊन जाहीर करताना सरकार पातळीवर याचा बिलकूल विचार झाला नव्हता पण समाजातल्या काही संवेदनशील माणसांनी तो केला. त्यातून कम्युनिटी किचनची कल्पना पुढे आणत काही संस्था, संघटना आणि माणसांनी लाखो लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली. त्यातलीच काही प्रातिनिधीक उदाहरणं इथं घेतली आहेत. त्यापैकी एक संस्था होती ती पुण्यातली विद्यार्थी सहाय्यक समिती.
खरं तर राज्याच्या ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण विनाअडथळा पूर्ण करता यावं म्हणून सहाय्य करण्याचं काम ही समिती करते. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना प्रामुख्याने राहाणं, जेवणं आणि शैक्षणिक फी भरणं अशा तीन अडचणींचा सामना करावा लागतो. ही विद्यार्थी सहाय्यक समिती याच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक ऊर्जेचा वापर सकारात्मकतेनं करत हे प्रश्न सोडवते. त्यामुळे आजवर लाखो विद्यार्थी या समितीच्या सहाय्यामुळे आपलं आयुष्य घडवू शकले आहेत. असेच आपलं आयुष्य घडवलेले, सुखी जीवनाचा आनंद अनुभवणारे काही माजी विद्यार्थी कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीने तळमळू लागले. भूक काय असते याची जाणीव असलेला हा माजी विद्यार्थी वर्ग या अस्वस्थतेतून एकवटला आणि बघता बघता लक्ष भोजनाचा टप्पा त्यांनी पार केला. लॉकडाऊनमुळे अडकलेले विद्यार्थी, छोटे व्यवसायिक, कामगार यांना दोन वेळचं जेवण द्यायचं अशी कल्पना मांडली. त्याला विद्यार्थी सहाय्यक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दिली आणि एका दिवशी २५० गरजूंना जेवण देण्यापासून सुरू झालेला हा उपक्रम १ लाख लोकांपर्यंत त्याचा लाभ देणारी एक चळवळ बनला आहे.
केवळ फोनाफोनी करून हे माजी विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आले. प्रत्येकाने इतरांशी संपर्क केला. या संपर्कातून मदतीचा हात पुढे करणाऱ्याचं एक वर्तूळ तयार झालं. मग उपक्रम समन्वयक सुनील चोरे, गणेश काळे, जीवराज चोले, रत्नाकर मते, सचिन मोकाशी, समितीचे पर्यवेक्षक कुंदन पठारे यांनी प्रत्यक्ष रणांगणावरची आघाडी सांभाळली. त्यांना समितीच्या विश्वस्तांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठबळ पुरवलं आणि माणुसकीचं एक प्रेरणादायी बेट आपल्यापुढे प्रकटलं.
असाच उपक्रम कम्युनिटी किचनच्या माध्यमातून डिक्की या उद्योजकांच्या संघटनेने राबवत माणुसकीचं दर्शन घडवलं. टाळेबंदीत अडकलेले मजूर, कामगार, बेघर नागरिक तसेच विद्यार्थी यांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत या मानवतेच्या जाणिवेतून डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संघटनेमार्फत संघटनेचे अध्यक्ष मिलींद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना अन्न वितरण केलं जात आहे. पुणे शहरात उभारण्यात आलेल्या ७ निवारागृहातील बेघर नागरिकांना सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण या उपक्रमाद्वारे पुरवण्यात येत आहे. याशिवाय पुणे शहरातल्या १२९ वस्त्यांमधील १५ हजाराहून अधिक कुटुंबांना आणि भोर, वेल्हा, मावळ तालुक्यातील १००० आदिवासी कुटुंबांना किराणा माल पुरवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा आजवर दोन लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला आहे.
असंच आणखी एक छोटंसंच परंतु अधिक लक्षवेधी असं माणुसकीचं बेट दिसलं ते पुण्यातल्याच बिबवेवाडी परिसरातल्या कल्पकल्याण सोसायटीत. इथली एक महिला सभासद ज्योती प्रवीण गुंदेचा गरजूंना अन्न पुरवठा करण्याची कल्पना सोसायटीसमोर मांडते आणि सोसायटीतले सारेच लोक ती उचलून धरतात. सोसायटी मेंटेनन्स व्यतिरिक्त वर्गणी गोळा केली जाते आणि रोज २५० लोकांना दाळखिचडीची पाकिटं बनवून वाटली जातात. सामान आणण्यापासून दालखिचडीची पॅकबंद पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची कामं सोसायटीतले लोक अगदी घरचं कार्य असल्यागत वाटून घेऊन करतात. तेही लॉकडाऊनचे आणि कोरोनाला रोखण्याचे सारे नियम काटेकोर पाळत करतात. खूप कमी सोसायट्यांमध्ये असं सामोपचाराचं, सामंजस्याचं आणि मानवतेच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपणारं चित्र पाहायला मिळतं. कल्पकल्याणमध्ये ते अमोल शिंदे, निरज व अनिल पाठक, मंदार कारंडे, श्री व सौ बंकापूरे, पुरोहित, क्षीरसागर आणि सिद्धार्थ गुंदेचा यांनी दिलेल्या मोठ्या योगदानातून साकारलं आहे. म्हणूनच माणुसकीचं हे बेट मला अधिक महत्वाचं वाटतं.
अशीच माणुसकी शहरांमध्ये अडकलेल्या कामगारांना, कष्टकऱ्यांना आपल्या गावी जाणाच्या व्यवस्था करणाऱ्यांमध्ये दिसून आली. चित्रपट क्षेत्रातल्या काही कलावंतांनी तसेच काही संस्था-संघटनांनी मोठमोठ्या व्हॉल्वो गाड्यांची व्यवस्था करत हजारो मजुरांना मोफत आपल्या घरी पोहोचवण्याचं औदार्य दाखवलं. हे केवळ पैसा आहे म्हणून घडत नाही. पैशासोबत माणुसकीही असावी लागते. ती वाहिन्यांवरील बातम्यांमधून सर्वदूर झळकली. पण भूमीगत राहून कित्येकाने याकामी आपला खारीचा वाटा दिला आणि त्याद्वारे माणुसकीचा धाग्याने अनेकांची मनं जोडली. त्यातलं एकच उदाहरण इथं देतो जे मन हेलावून टाकणारं आहे.
जालन्याजवळ जेव्हा एका रेल्वे मालगाडीने पायी चालून चालून थकलेल्या सोळा कामगारांना निद्रीत अवस्थेतच चिरडले त्याच दरम्यान नाशिकमध्ये एक अवलिया रस्त्यात अचानक भेटलेल्या काही कामगारांचा प्रवास सुकर कसा होईल यासाठी धडपडत होता. केवळ धडपडत राहिला असं नाही, तर काही वेळातच त्याने त्या कामगारांच्या सुकर प्रवासाची त्याच्या परीनं व्यवस्था केली. त्याचं झालं असं की, चाकणच्या एमआयडीसीत कामाला असलेले काही तरुण कामगार लॉकडाऊन काळातली उपासमार टाळण्यासाठी पायी आपल्या गावी निघाले. त्याचं गाव होतं मध्यप्रदेशातल्या कटनी जिल्ह्यातलं. ते चाकणवरुन मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर या मार्गे नाशिकरोडला पोहोचले. तिथे हा अवलिया त्यांना भेटला. कुठून आले, कुठे निघालात असा संवाद झाला. मग एखाद्या ट्रकमध्ये आम्हाला बसवून द्या ना अशी विनंती त्या कामगारांनी केली. पण ते काही जमण्यासारखं नव्हतं. त्यामुळे ‘आप लोगो को ट्रक मिलना मुश्किल है.’ असं त्यानं नाईलाजास्तव सांगितलं. त्यावर एक कामगार म्हणाला, ‘साब, आप तो भाग्यवान है. इस लॉकडाऊन मे आप सायकल पे घुम रहे हो.’ तो अवलिया या वाक्याने अस्वस्थ होतो. आपली सायकल देऊन टाकूया यांना असं त्याच्या मनात येतं. परंतु सायकल एक आणि ते सहाजण, कसं जमणार? त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. आणखी काही सायकली जमवूयात. तो आपल्या मित्रांना फोन करतो. काही मदतीला धावून येतात. काहीजण मोठ्या मनाने पैसे पाठवतात. पुरेसे पैसेही जमतात, पण सायकली विकत कशा आणि कुठून घ्यायच्या. लॉकडाऊनमुळे सारंच बंद. तो एका ओळखीच्या सायकल दुकानदाराला फोन करतो. तोही धावून येतो. नफा वगळून मूळ किंमतीत काही सायकली तो गोडाऊनमधून काढून देतो. पायी चालत निघालेल्या कामगारांच्या पायाला दोन चाकं मिळतात. तो त्या कामगारांच्या हवाली करतो. कामगार आनंदानं आपल्या पुढच्या प्रवासाला निघतात आणि हा अवलिया आपल्या घराकडे. त्या नाशिककर अवलियाचं नाव आहे फ्रान्सिस मुरलीधर वाघमारे.
माणूस माणसाशी माणुसकीनं वागला की, समोरचा माणूसही आपल्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवतो. ते रस्त्यात अचानक भेटलेले कामगार मजल दर मजल करत आपल्या गावी पोहोचले. पण प्रत्येक टप्प्यावर ते वाघमारे यांना फोन करून आपल्या सुकर प्रवासाची वार्ता कळवत होते. वाघमारेंनी त्यातच आनंद मानला. याची बातमी यावी असा चुकूनही प्रयत्न त्यांनी केला नाही. कारण बातमीसाठी केलेली ती धडपड नव्हती. परिस्थितीने निर्माण केलेल्या अस्वस्थतेतून उचंबळून आलेल्या माणुसकीची ती प्रतिक्रिया होती.
अर्थात माणुसकीचं एक जागृत बेट आपल्या आत असावं लागतं तेव्हा अशी क्रियेला प्रतिक्रिया येत राहाते. सादेला पडसाद मिळत राहातो. म्हणून आशी माणुसकीची बेटं जपली पाहिजेत, प्रयत्नपूर्वक ती वाढवली पाहिजेत, जी आपल्या आसपास आहेत. मदत घेणाऱ्याने मदत देणाऱ्याविषयीची कृतज्ञता बाळगली तरी अशी बेटं निर्माण होतील. त्यासाठी गरज आहे ती, भीतीपोटी म्हणा किंवा स्वार्थापोटी म्हणा आपल्यात वाढणारी नकारात्मकता घालवण्याची. कोरोना संकटातून एवढा तरी धडा आपण घेऊया अशी आशा…
-विलास पाटील, पुणे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व मनोविकास प्रकाशनाचे संपादक आहेत.)
ईमेल: patilvilas121@gmail.com
मोबाईल: 9423230529
बऱ्याच ज्ञात-अज्ञात सेवाभावी संस्थांची आणि कार्यकर्त्यांची घेतलेली दखल!!!उत्कृष्ट लेख आहे. धन्यवाद!
Chhan zalay lekh. Kharach manuski japayla havi mansane
माणुसकी जिवंत आहे ह्याचं अलौकिक उदाहरणं