औरंगाबाद: कोरोनाने शहरात थैमान घातले असून आजाराचा फैलाव वाढत असल्याने १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना कठोर कारवाई केली जाणार आहे. साथरोगाच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक क्षेत्रामध्ये काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परवानगी दिलेले बिगर अत्यावश्यक कार्ये व नागरिकांच्या संचार करण्यावर आवश्यक ते निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शहरात जनता कर्फ्यू लावण्याचा सर्वानुमते निर्णय झाला आहे. ही संचारबंदी १० ते १८ जुलै या काळात असणार आहे. या संचारबंदी काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. विनाकारण शहरात फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
या सेवा राहतील बंद: सर्व किराणा दुकान, किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, सर्वप्रकारचे उद्योग उपाहारगृह, लॉज, हॉटेल्स, डान्स, रिसोर्ट, मॉल, बाजार, मार्केट; सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागेत सर्वसामान्यांचा वावर. केशकर्तनालय, सलून, स्पॉ, ब्युटी पार्लर. किरकोळ व ठोक विक्रीचे आडत भाजी मार्केट, फळ विक्रेते, आठवडी व दैनंदिन बाजार, जाधवमंडी, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, दोन चाकी, तीन चाकी व चारचाकी. सार्वजनिक व खासगी बससेवा. ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी मालवाहतूक करणारी वाहने. सर्व प्रकारचे बांधकाम कन्स्ट्रक्शनची कामे. चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह. सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ. सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना कार्यालय. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, सभा. धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे. फ्रूड डिलेव्हरी, होम डिलेव्हरी सेवा.
अत्यावश्यक बाबी मर्यादित स्वरूपात व निर्बंधासह सुरू: दूध विक्रेते यांना घरपोच दूध वितरणासाठी सकाळी ६ ते सकाळी ८. ३० वाजेपर्यंत परवानगी. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. सर्व रूग्णालये व रूग्णालयाशाी निगडीत सेवा, आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रूग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. अन्यथा संबंधित रूग्णसेवा संस्था कारवाईस पात्र राहील. सर्व मेडिकल दुकाने २४ तास सुरू राहतील.
सर्व मा. न्यायालये व राज्य शासनाचे, केंद्र शासनाची कार्यालये तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्रमांक चार नुसार २९ जून २०२० च्या आदेशानुसार मर्यादित कर्मचारी वर्गासह सुरू राहिल. शासकीय पेट्रोलपंप व कंपनी संचलित पेट्रोल पंप सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील. केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहनास इंधन पुरवठा करतील. खासगी संचलित पेट्रोल पंप बंद राहतील. एलपीजी गॅस सेवा घरपोच, गॅस वितरण नियमानुसार सुरू राहिल. शासकीय स्वस्त धान्य दुकाने नियमित वेळेनुसार व नियमानुसार सुरू राहतील. कृषी, बि-बियाणे, खते, किटकनाशक औषध, चारा दुकाने सुरू राहतील. याची वाहतूक चारचाकी वाहनातून करण्यास परवानगी राहिल. दुचाकी वाहनास परवानगी असणार नाही. निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरू राहिल. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहिल. कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. वर्तमानपत्र प्रिंटींग व वितरण, डिजिटल, प्रिंट मिडिया कार्यालय, शासकीय नियमानुसार सुरू राहतील. संस्थात्मक अलगीकरण, विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता मनपाने ताब्यात घेतलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरू राहतील. सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका नियमानुसार सुरू राहतील. परंतु कोणतेही ग्राहक बँकेत जाणार नाही. बँकेचे इतर ग्राहकसेवा जसे आॅनलाईन, घरपोच कॅश डिलिव्हरी सेवा, बँकेची एटीएम सेवा सुरू राहील.
न्यायालय कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, शासकीय राज्य-केंद्र शासनाचे कर्मचारी, शासन अंगिकृत संस्था कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टर, नर्स, अंगणवाडीतील कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजिटल मिडियाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधित मेडिकल शॉपचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा जसे कृषी, बि-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा व स्वच्छता महापालिकेचे कर्मचारी, पोलिस विभागातील कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तसेच कन्टेन्मेंट झोन करिता नियुक्त कर्मचारी, माझी हेल्थ माझ्या हाती (एमएचएमएच)अॅननुसार सर्वेक्षण करीता नियुक्त कर्मचाऱ्यांना चारचाकी व दुचाकी (फक्त स्वत:साठी) वाहन वापरण्यास परवानगी राहिल. सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी स्वत:चे कार्यालयाचे ओळखपत्रे, शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवावे. वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे. या सर्वांना वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांच्या कामाच्या जबाबदारीनुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.
कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील स्थानिक किराणा दुकानदार हे किराणा व अत्यावश्यक वस्तूची घरपोच व्यवस्था पायी किंवा चारचाकी वाहनातून करण्यास परवानगी राहिल. यासाठी त्यांनी त्यांचे संपर्क क्रमांक आपआपल्या गल्लीतील ग्राहकांना कळविण्यात यावेत. कन्टेन्मेंट झोनमध्ये काम करणारे मुख्य समन्वयक, सहसमन्वयक, नोडल अधिकारी, गस्ती पथकातील कर्मचारी हे त्यांच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये नियमित कार्य करतील. कन्टेन्मेंट झोनमधील नागरीकांना काही अत्यावश्यक गरजा, मागणी असल्यास त्याची पूर्तता करतील. औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग, त्यांचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. यासाठी एमआयडीसी पोर्टलवरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानगी ग्राह्य धरण्यात येईल. औरंगाबाद शहरातून परवाना असलेल्या उद्योगांना उद्योग क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आणि परतीसाठी फक्त कार (चार चाकी वाहन) किंवा निश्चित केलेल्या बसमधूनच प्रवासाला परवानगी राहिल. चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन, एमआयडीसी व औरंगाबाद शहरा व्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खासगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक ते पास देऊन कामगारांची वाहतूक निश्चित बसने करता येईल. जे उद्योग कामगाराची दहा दिवस फॅक्टरीमध्ये निवास व्यवस्था करणार, त्यांना उद्योग सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही. शेतमाल, कृषी निगडीत प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालू राहतील.