औरंगाबादः जगभरासह महाराष्ट्राचीही चिंता वाढवणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेले दोन रूग्ण औरंगाबादेतही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंड आणि दुबईहून औरंगाबादेत आलेल्या दोन व्यक्तींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे आज पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (एनआयव्ही) प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यातील एक रूग्ण म्हणजेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्याच्या निकटसहवासित आहे तर एकाने दुबई प्रवास केला आहे. त्यापार्श्वभूमीवर औरंगाबादच्या जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून कोणते निर्बंध लागू केले जातात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादेतील नातेवाईकांच्या लग्नासाठी लंडहून मुंबईत दाखल झालेल्या एका एनआरआय कुटुंबातील २१ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. या महिलेला मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेची आई, बहीण आणि वडिल अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे औरंगाबादेत दाखल झाले होते.
औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर त्या ओमायक्रॉनबाधित महिलेच्या ५० वर्षीय वडिलांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते. तो अहवाल आज शनिवारी प्राप्त झाला असून त्या ५० वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
औरंगाबादेत आणखी एकालाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईहून औरंगाबादेत आलेल्या या ३३ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या व्यक्तीच्याही स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. त्याच्याही स्वॅब नमुन्याच्या तपसाणी अहवाल आजच प्राप्त झाला असून याही व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे या दोघांचेही लसीकरण पूर्ण झालेले आहे. या दोनपैकी एक ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण लक्षणेविरहित असून दुसऱ्या रुग्णाला ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे आहेत.
औरंगाबादेत एकाच दिवशी दोन व्यक्तींचे ओमायक्रॉन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत औरंगाबादेत दोन, लातूरमध्ये एक, उस्मानाबादेत ५ असे एकूण ८ ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता ११० झाली आहे.