मुंबई: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात अडकून पडलेल्या सर्व स्थलांतरित मजूरांच्या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उचलणार आहे. यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरु करून मजूरांची माहिती घेतली जाणार आहे व जिल्हाधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र लिहून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
या संदर्भात बोलताना श्री. थोरात म्हणाले की, मोदी सरकारने अचानक कुठलेही नियोजन आणि पूर्वतयारी न करता लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो स्थलांतरित मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. राज्य सरकार आणि काँग्रेस पक्षाने त्यांना अन्नधान्याचे वाटप करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. पण एक महिन्यापासून अधिक काळापासून काम नसल्याने त्यांच्याकडे पैसे नाहीत. विविध राज्यातील असे लाखो मजूर उपाशीपोटी शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या गावी जात आहेत. काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी लावून धरल्यामुळे केंद्र सरकारने या मजूरांसाठी रेल्वेची सोय केली आहे. मात्र, तिकिटाचे पैसे या गरीब मजूरांकडून वसूल करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने या लाखो मजूरांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या मजूरांचा प्रवास खर्च काँग्रेस पक्ष करेल अशी घोषणा केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत स्थलांतरित मजूरांच्या प्रवासाचे नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतरित मजूरांसाठी एक हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून त्याद्वारे मजूरांची माहिती घेतली जाईल. तसेच जिल्हाधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांना पत्र लिहून मजूरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उचलणार असल्याचे लेखी कळवून त्यांच्या मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे थोरात म्हणाले.