बीड: बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे १४ ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत. दरम्यान, १५ ठिकाणी कंटेन्मेंट झोन शिथील करण्यात आले आहे.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था करणे आवश्यक आहे. या परिसरामध्ये अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१),(३) लागू करण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यामुळे बीड शहरामधील पंचशील नगर, रोशन पुरा (बालेपीर) व फुलाई नगर, परळी शहरातील स्नेहनगर, गांधी मार्केट, सावतामाळी मंदिर जवळ व बसवेश्वर कॉलनी, अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर, केज शहरांमधील कानडी रोड भन्साळी बिल्डिंग, धारूर शहरातील क्रांती चौक मेन रोड व लक्ष्मी नगर. तसेच परळी तालुक्यातील कन्हेरवाडी, माजलगांव येथील पोलीस वसाहत, भाटवडगाव व केज तालुक्यातील साळेगाव या ठिकाणी संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पंधरा ठिकाणी कंटेन्मेंट झोन शिथील:
बीड शहरातील १०, परळी शहरात १, केज शहरातील १ यासह पाटोदा तालुक्यातील २ व केज तालुक्यातील १ असे एकूण १५ ठिकाणी प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
बीड शहरातील काळे गल्ली, लोहार गल्ली, शिवनेरी कॉलनी, काळे गल्ली कोरडे गणपती, चंपावती नगर, ऋतुजा अपार्टमेंट, चौधरी कॉम्प्लेक्स, भद्रा मारुती, गणपती मंदिर शाहूनगर व हाफिस गल्ली या १० ठिकाणी, परळी शहरातील गोपानपाळे गल्ली, केज शहरातील आनंदनगर तसेच पाटोदा तालुक्यातील करंजवन व काकडहिरा व केज तालुक्यातील कळंबअंबा असे जिल्ह्यात एकूण १५ संबंधित परिसरातील कंटेन्मेंट झोन शिथील करण्यात आले आहे व संबंधित परिसरातील परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.