बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बीड शहरातील ४, गेवराई शहरातील १ ठिकाणांसह बीड, शिरूर व गेवराई तालुक्यातील ५ गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे. बीड शहरातील भगवान नगर बालेपीर, च-हाटे कॉलनी दिलीप नगर पाटीजवळ, बागवान गल्ली पांगरी रोड व गांधी नगर हनुमान मंदिराजवळ (नाळवंडीनाका), गेवराई शहरातील निकम गल्ली यासह बीड तालुक्यातील काळेगाव हवेली, मांडवजाळी, कामखेडा, गेवराई तालुक्यातील रांजणी आणि शिरूर तालुक्यातील बोरगाव या गावात व वरील संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.
परळी तालुक्यातील ३ गावांतील कंटेन्मेंट झोन शिथिल:
परळी तालुक्यातील नंदागोळ, ब्रह्मवाडी, नाथरा या ३ गावातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.