अनिश्चत कालावधीसाठी संचारबंदी लागू
बीड: बीड जिल्ह्यात काही परिसरात कोरोना पाझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले असल्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे तालुक्यात व इतर गावामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
बीड शहरातील काझी नगर, पांगरी रोड नंदकुमार रामराव रोहीटे यांचे घर ते रवींद्र राजाभाऊ चौधरी यांचे घर, मंत्री कन्स्ट्रक्शन काकूमळा शनि मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील धावज्याची वाडी येथे कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यामुळे धावज्याची वाडी हे गांव व परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
परळी शहरातील पदमावती कॉलनी, नाथनगर. शिवाजी नगर व जलालपूर, अंबाजोगाई शहरातील मनियार गल्ली, मियाभाई कॉलनी तसेच अंबाजोगाई तालुक्यातील निरपना हे गांव व परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील निबोंरे वस्ती, पिंपळा. पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी व गारमाथा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्यामुळे हे गांव व परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
केज तालुक्यातील नांदुरघाट येथील कंटेन्मेंट झोन शिथील:
केज तालुक्यातील नांदुरघाट या गावातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.