जालना: जालना जिल्हा सरकारी रुग्णालयातील 28 वर्षीय महिला डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आज गुरुवारी सायंकाळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 झाली आहे. असे असले तरी यापैकी 5 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील पारध येथील 17 वर्षीय तरुणीचा सलग दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर अन्य एका रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या या 28 वर्षीय तरुणीच्या लाळेचे नमुने काल बुधवारी प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला असून, महिला डॉक्टर पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.