अंबाजोगाई: अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हाॅस्पिटलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई येथून आलेल्या धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथील रहिवासी असलेला हा रुग्ण अलिकडेच मुंबई येथून परत आला होता. त्याची प्रकृती बिघडली असल्यामुळे त्याचेवर १ ते ४ जून असे सलग चार दिवस माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्याची प्रकृती बिघडत चालल्यामुळे त्यांना ४ जून रोजी अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती धारुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.
अंबाजोगाई येथील स्वारातीच्या कोविड हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असतांना या रुग्णात कोरोनाची लक्षणे आढळून आली असल्यामुळे त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. आज या रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात या संशयित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांचा आणि इतर नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर अंबाजोगाई शहरातील नागरिकांत आता कोरोनाची भीती निर्माण झाली आहे.